रविवार, २९ नोव्हेंबर, २००९

पणजी

'माई', माझी पणजी. म्हणजे बाबांची आजी, त्यांच्या वडिलांची आई.

लहानपणापासूनच माझ्या मनात तिची काही फार चांगली प्रतिमा नव्हती. शेवटच्या दिवसांत अंथरुणाला खिळलेली. माझे आई, बाबा, आजी, आत्त्या सगळ्यांना तिचं करावं लागे. सगळ्यांशी सतत तिचे वाद होत. मी तिची फारशी आवडती नव्हते. कारण तिला मुळात मुलीच विशेष आवडायच्या नाहीत. कदाचित 'स्त्री' म्हणून आयुष्यात तिने जे भोगलं त्याचा परिणाम असेल!

या सगळ्यामुळे माझ्या मनात 'पणजीला मी आवडत नाही' आणि 'तिच्यामुळे घरातल्या सगळ्यांना त्रास होतो' ह्याच दोन गोष्टी घर करून बसलेल्या! तिच्या पुर्वायुष्याबद्दल आई-आजीकडून बरंच काही ऐकलेलं. पण ते लक्षात घेऊन त्यावर विचार करून तिची बाजू समजून घेण्याचं माझं तेव्हा वय नव्हतं.

मी ९-१० वर्षांची असताना ती गेली, ८२-८३ वर्षांची होऊन. म्हणजे साधारण १९९२ साली. त्यानंतर इतक्या वर्षांनी परवा मला तिची प्रकर्षाने आठवण झाली. निमित्त होतं 'लोकसत्ता' मधील एक सदर! नवर्‍याने टकलेल्या किंवा त्याच्या मॄत्युपश्चात चरितार्थ चालविण्यासाठी घराबहेरपडून धडपड केलेल्या आणि हे करतानाच नावारूपाला आलेल्या काही स्त्रियांच्या आत्मचरित्राची ओळख करून देणारं हे सदर. दर शनिवारी 'चतुरंग' मधे न चुकता वाचते. पण एका शनिवारी मात्र ते वाचताना माझी पणजी डोळ्यासमोर उभी राहिली. वाटलं, आपण जे तिच्याबद्दल ऐकलंय ते फार काही वेगळं नाही! पण फरक इतकाच की ती प्रसिद्धीच्या झोतात आली नाही आणि लोकांच्या कौतुकाचा विषय ठरली नाही. उलट टीकेलाच सामोरी गेली............

१९१०-११ सालचा जन्म असवा तिचा. त्या काळी मुलगी होणं हीच मुळात आनंदाची बाब नव्हती. त्यातून ही दिसायला बेताची आणि काळी. म्हणजे दुष्काळात तेरावा महीना! हिचं लग्नं कस होणार ही घरच्यांना काळजी. म्हणून बिजवराशी लग्नं लावलं; म्हणजे माझ्या पणजोबांशी. दोघांमधे जवळ जवळ २० वर्षांचं अंतर. पण ते नाटककंपनीवाले आणि त्यातून विधुर आणि ही काळी आणि दिसायला बेताची. असा योग (?) जुळून आला आणि त्यांचं लग्नं झालं. १२-१३ वर्षांची असेल माझी पणजी तेव्हा. लग्नं आणि नवरा म्हणजे काय हे ही न कळण्याच्या वयाची. नवरा जवळ आला तरी भीती वाटत असे म्हणायची!!

तर असा तिचा संसार सुरु झाला. घरात खायला-प्यायला काही कमी नव्हतं. नाटककंपनीही छान चालू होती. पणजोबाही कष्टाळू होते. याच दरम्यान माझ्या आजोबांचा जन्म झाला आणि ते जेमतेम ८-१० वर्षांचे असताना माझे पणजोबा गेले......पणजी तेव्हा जेमतेम २४-२५ वर्षांची असेल. हल्ली ज्या वयात मुलींची लग्नं होतात, त्या भावी आयुष्याची स्वप्नं रंगवतात, त्या वयात ती विधवा झाली आणि पदरात एक लहान मूल!

चुलत्यांनी तिला नेसत्या वस्त्रानिशी बाहेर काढलं. हातावर एक छदामही न ठेवता.....काय अवस्था झाली असेल तिची तेव्हा? पण ती डगमगली नाही. माझ्या आजोबांना दूरच्या एका नातेवाईकाकडे ठेवून तिने नर्सिंगचा कोर्स पूर्ण केला आणि एका हॉस्पिटलमधे नोकरी मिळाली. चरितार्थाचा प्रश्न सुटला!

पण तिच्या आयुष्याचं काय झालं? तिला आयुष्यात तसं काहीच सुख मिळालं नाही, पण तिच्याकडे धडाडी होती. ती एकटी जवळ-जवळ अख्खा भारत फिरली. अगदी अमरनाथ यात्रा सुद्धा केली तिने. त्या काळी बेलबॉटमची फॅशन होती. तिने ती घालूनही एक फोटो काढून घेतला होता म्हणे! एकटी हॉटेलमधे सुद्धा जात असे ती.

आमच्या काही नातेवाईकांना, आजूबाजूच्या लोकांना तिचं हे वागणं असभ्य, बेलगाम वाटायचं. तिच्याबद्दल कोणी कधी फारसं चांगलं बोलल्याचं मला आठवत नाही. कदाचित`'विधवा' स्त्री ही सुद्धा एक माणूस आहे, तिलाही तिच्या भावभावना आहेत हे त्यांना मान्यच नसावं. किंवा मान्य असलं तरी फक्त 'विधवा' म्हणून तिने स्वतःला सर्व बंधनांत अडकवून घेऊन एक चाकोरीबद्धं आयुष्यं जगावं ही त्यांची मानसिकता असावी.

पण या सगळ्याचा आता तिच्या बाजूने विचार केला तर वाटत की तिचं नक्की काय चुकलं??

वयाच्या २४-२५व्या वर्षी नवरा गेला ही तिची चूक होती? नातेवाईकांनी आधार द्यायचा सोडून बेघर केलं ही तिची चूक होती? मग त्यांना तिच्यावर टीका करायचा काय अधिकार?

तिला तिच्या इच्छा, आकांक्षा, भावना काहीच नसतील का? त्या तिला पूर्ण कराव्याश्या वाटल्या तर काय बिघडलं? तिला फिरायला चल म्हणणारं कोण होतं? किंवा तिची आवड लक्षात घेऊन कोण काही आणून देणार होतं?

त्या काळी बायकांनी दुसरं लग्नं करणंही सोपं नव्हतं आणि केलं तरी आपल्या मुलाला तिथे स्विकारतील की नाही, नीट वागवतील की नाही ही दुसरी चिंता!

असं सगळं असतानाही ती खंबीरपणे उभी राहीली. रडत न बसता परिस्थितीतून मार्ग काढला. 'लोक काय म्हणतील?' हा विचार तिने कधीच केला नाही. कारण लोक एकवेळ मदतीला पुढे येणार नाहीत पण टीका करण्यात मात्र अजिबात मागे राहणार नाहीत हे तिला कधीच उमगलं असावं......

अशी माझी पणजी अतिशय स्वावलंबी होती. रिटायर्ड झाल्यानंतरही कोणी आजारी असेल तर इंजेक्शन वगैरे द्यायला ती जात असे. अगदी अंथरूणाला खिळेपर्यंत स्वतःची सगळी कामं स्वत: करत असे. आयुष्यात एवढे वाईट दिवस बघूनही तिच्याकडे सकारात्मक दॄष्टीकोन होता. माझ्या भावाला खेळवताना म्हणे ती म्हणायची, माझा मुलगा मॅट्रिक झाला, नातू इंजिनिअर झाला, पणतू आणखी शिकेल.....खूप मोठा होइल.......

आता या सगळ्याचा विचार केला॑ की तिचं खूप कौतुक वाटतं आणि तिच्या खंबीरपणाला, धडाडीला दाद द्यावीशी वाटते.

रडत न बसता आणि कोणाच्या मदतीची अपेक्षा न करता तिने परिस्थितीशी सामना केला. आपलं आयुष्यं मार्गी लावलं. कुठून आलं असेल हे बळ तिच्यात? खरंच आश्चर्यं वाटतं. आणि मनोमन कबूल केलं जातं की भले तिने काही समाजकार्य केलेलं नसूदे, प्रसिद्धीच्या झोतात आलेली नसूदे परंतु तिला प्रतिकूल अशा या समाजात, खंबीरपणे उभं राहून तिने तिच्या आयुष्याचा प्रश्नं सोडवला होता. हे ही काही कमी नव्हतं!!

रविवार, २२ नोव्हेंबर, २००९

John, Dog, Dog............?

"John, Dog, Dog.....", फोनवर बोलता बोलता मी जरा वरच्याच पट्टीत म्हणाले. माझ्या केबिनचं दार उघडंच असल्याने, बाहेरच्या क्युबिकलमधे बसलेल्या माझ्या कलीगला माझा आवाज अगदी सहज ऐकू गेला. मी फोन ठेवण्याचीच जणू काही ती वाट बघत होती. ती पोट धरून खो-खो हसू लागली। मला कळेना, आत्तापर्यंत ही बरी होती, हिला अचानक झालं तरी काय? मी तिला खुणेनेच विचारलं, "काय झालं? एवढी फिदी, फिदी का हसते आहेस?"
हसणं थांबवून माझ्याजवळ येत ती म्हणाली, "कोण आहे हा जॉन? त्याला शिव्या का देत होतीस?" खरं तर तिला माहीत होतं मी कोणाला फोन केला होता आणि माझं काय काम होतं। पण माझ्याही लक्षात आलं की आपण काहीतरी मूर्खासारखं बोललेलं आहोत आणि या बाईसाहेब आपली फिरकी घेतल्याशिवाय रहाणार नाहीत.
खरंतर थोडेच दिवसात मी annual leave वर जाणार होते आणि बहारीन-मुंबई फ्लाईट बुकिंगच्या संदर्भात ट्रॅव्हल एजंटला मी फोन लावला होता। माझ्या तिकिटाची व्हॅलिडिटी मला वाढवून घ्यायची होती। 'JDDARY' असा काहीसा माझा PNR नंबर होता आणि ३-४ वेळा सांगूनही, बुकिंग करणार्‍या मुलीला तो काही ऐकू जात नव्हता. JDD च्या पुढे आमची गाडी सरकतच नव्हती. डी च्या ऐवजी सारखं तिला बी ऐकू जात होतं. शेवटी मी अक्षर कळावं म्हणून शब्दांचा आधार घेतला आणि "John, Dog, Dog......" असं जरा वरच्या पट्टीत बोलले. माझं काम एकदाचं झालं. पण त्यातून एवढं हसण्यासारखं काय घडलं मला काही सुधरेना.
माझ्या कलीगने मग खुलासा केला की जॉन हे त्या ट्रॅव्हल एजन्सीच्या मॅनेजरचं नाव होतं। मी कपाळावर हात मारून घेतला. आता मला काय स्वप्नं पडलं होतं हे माहीत असायला?? माझी कलीग आमच्या CFO ची PA असल्यामुळे आणि तो बरेचदा विमान प्रवास करत असल्याने तिला वरचेवर तिकिट बुकिंग करावं लागतं. त्यामुळे तिला या ट्रॅव्हल एजन्सी मधले लोक चांगलेच माहीत होते. त्यामुळे माझे शब्द ऐकून तिला हसू आवरेना.मग ती मला म्हणाली, "अगं, प्रत्येक गोष्टीचे काही संकेत असतात. तसे तिकिट बुक करतानाही असतात." मी म्हटलं, "तिकिट बुक करताना कसले आलेत संकेत? तिला अक्षरं कळत नव्हती, ती कळावीत म्हणून मी शब्दं वापरले! आता ह्यात काय चुकलं?" ती मला म्हणाली, "अगं, ही अक्षरं ने कळणं हे अगदी कॉमन आहे आणि त्यासाठी शब्दं वापरणं हे सुद्धा. म्हणूनच यासाठी कुठले शब्द वापरावेत याचे काही संकेत आहेत." असं म्हणून तिच्याकडे असलेली एक लिस्ट तिने मला दिली. आणि म्हणाली, "ही लिस्ट तुझ्याकडे ठेव आणि इथून पुढे कधी तुला बुकींग करायची वेळ आली तर ती वापर." बरं म्हणून ती मी माझ्याकडे ठेवली.
माझ्या मनात आलं खरंच, प्रत्येक वेळी कसं बोलावं, काय बोलावं, काय बोलू नये या सगळ्या गोष्टींचे काही नियम असतात. आणि ते जर आपल्याला माहीत नसतील तर माझ्या बाबतीत घडला तसे प्रसंग घडू शकतात. माझ्यासारखी बाकी कोणाची फजिती होऊ नये म्हणून ती लिस्ट तुम्हा सर्वांसाठी इथे देत आहे. बघा कधी उपयोगी पडली तर...................

A-Alpha B-Bravo C-Chairs D-Delta E-Echo F-Fox G-Gulf H-Hotel I-India J-Juliet K-King L-Lima M-Mother N-November O-Oscar P-Papa Q-Queen R-Rameo S-Sugar T-Tango U-Uniform V-Victory W-Wisky X-X-Ray Y-Young Z-Zoo

गुरुवार, १९ नोव्हेंबर, २००९

कहानी गुडिया की........

गुडिया..... एका सामान्य मुस्लिम कुटुंबातील सामान्य मुलगी. अगदी चारचौघींसारखी.....२०-२२ वर्षांची. भावी आयुष्याची स्वप्नं रंगविणारी.........तिचं लग्नं होतं सैन्यातील एका जवानाशी. मोठा दीर, जाऊ, सासू असं तिचं छान, सुखी कुटुंब असतं. लग्नानंतर जेमतेम १५-२० दिवसांत तिच्या नवर्‍याला सीमेवर रुजू होण्यासाठी बोलावलं जातं, युद्धाला तोंड फुटलेलं असतं.....तिचा निरोप घेऊन आणि लवकर परतण्याचं वचन देऊन नवरा जातो आणि........... आणि गुडियाचं आयुष्यं एक वेगळीच कलाटणी घेतं...... युद्धाच्या बातम्या रोज येत असतात. नवर्‍याची हाल हवाल तिला कळत असते. पण एक दिवस..........एक दिवस त्याची खबर येणं बंद होतं. त्याचा पत्ता काय... जिवंत आहे की मेला...काही कळेनासं होतं...आणि एक दिवस तो बेपत्ता असल्याचं सैन्यातून कळतं. गुडियाचं चित्तं थार्‍यावर रहात नाही.. पण गुडियाला आशा असते की तिचा नवरा आज ना उद्या नक्की सापडेल......पोलिस, सैन्यातील वेगवेगळे अधिकारी यांच्या ऑफिसचे खेटे घालणं सतत चालू असतं. पण कुठूनच तिच्या नवर्‍याचा काहीच पत्ता लागत नाही. असं करता करता ४ वर्ष जातात........तिचे आई-वडील आणि इतर नातेवाईक तिला दुसर्‍या लग्नासाठी सुचवू लगतात. पण तिचं मन तयार नसतं. पण शेवटी सगळ्यांचं ऐकून ती दुसर्‍या लग्नाला तयार होते. दुसरा संसार थाटते. त्यात रमते. घरातल्या सगळ्यांना आपलसं करते. थोडेच दिवसात ती आई होणार असल्याची चाहूल तिला लागते....पण नियतीला तिचं सुख मान्यं नसतं..... आत्ता कुठे खरर्‍या अर्थाने तिच्या आयुष्याची सुरुवात होत असते आणि तेव्हाच बातमी येते की तिचा आधीचा नवरा जिवंत आहे. त्याला युद्धकैदी म्हणून पकडलेलं असतं आणि ४ वर्षांनंतर पाकिस्तान सरकार त्याची सुटका करणार असतं......गुडीयाची मोठी विचित्र अवस्था होते. हसावं की रडावं तिला कळेनासं होतं. तिलाच काय तिच्या सासरच्या आणि माहेरच्या सगळ्यांपुढेच मोठं प्रश्नचिन्हं उभं राहतं. आता पुढे काय? आणि एक दिवस तिचा नवरा घरी परत येतो. गुडीयाच्या नावाने हाका मारून घरभर शोधू लागतो.. तो बेपत्ता झाल्याच्या धक्क्याने त्याच्या वॄद्ध आईचा मृत्यु झाला आणि बरेच दिवस त्याची वाट बघून गुडियाने दुसरं लग्नं केलं हे ऐकून त्याला धक्का बसतो. काहीही झालं तरी गुडियाला परत घेऊन येण्याचा तो चंग बांधतो. त्याचा भाऊ, वहिनी त्याला खूप समजावतात. तिचा सुखी संसार उद्ध्वस्त न करण्याची विनंती करतात. पण कशाचा काहीही परिणाम होत नाही.गावातले मुल्ला मौलवी यांची एक समिती नेमली जाते. कुठलाही निर्णय होई पर्यंत गुडियाला तिच्या आई-वडिलांकडे परत पाठवले जाते. आणि शेवटी तिने आपल्या पहिल्या नवर्‍याकडे परत जावे असा निर्णय दिला जातो. तेच धर्माला धरून असल्याचं सांगितलं जातं. गुडियाच्या मताला काडीइतकीही किंमत नसते. किंबहुना तिला ते कोणी विचारतच नाही. आणि शेवटी तिला हा निर्णय मान्य करावा लागतो. आपल्या मुलाला घेऊन ती आपल्या पहिल्या नवर्‍याकडे परत जाते. पण कशातच लक्षं लागत नसतं.या सगळ्याचा तिच्यावर मानसिक आणि शारिरीकही विपरीत परिणाम होतो. आणि एक दिवस आपल्या लहान मुलाला मागे ठेऊन ती य जगाचा निरोप घेते..... त्या मुलाला सांभाळण्याचा मोठेपणाही तिचा पहिला नवरा दाखवत नाही. आणि त्याच्या पालन-पोषणाची जबाबदारी गुडियाच्या म्हातार्‍या आई-वडिलांवर येते.यथावकाश तिचे दोन्ही नवरे दुसरी लग्नं करतात आणि आपापले संसार परत थाटतात.................गुडिया मात्रं धड कुठलंच सुख न उपभोगता समाजातल्या पुरुषी वर्चस्वाला आणि विचित्र रुढींना बळी पडते.............ही गोष्ट आहे 'कहानी गुडिया की......' या हिंदी चित्रपटाची. स्त्रीला एक माणूस म्हणून वागवण्याची, तिचं मन जाणून घेण्याची अजूनही या समाजातील काही जणांना गरज वाटत नाही हे हा चित्रपट बघून प्रकर्षाने जाणवतं.हा काही फार बिग बजेट चित्रपट वगैरे नाही किंवा फार मोठया कलाकारांना वगैरे घेऊन केलेलाही नाही. पण एका सत्यघटनेवर आधारित आहे. कुठे मिळाला तर जरूर बघा. फक्त गुडियाची गोष्ट जाणून घेण्यासाठी....................