रविवार, २९ नोव्हेंबर, २००९
पणजी
लहानपणापासूनच माझ्या मनात तिची काही फार चांगली प्रतिमा नव्हती. शेवटच्या दिवसांत अंथरुणाला खिळलेली. माझे आई, बाबा, आजी, आत्त्या सगळ्यांना तिचं करावं लागे. सगळ्यांशी सतत तिचे वाद होत. मी तिची फारशी आवडती नव्हते. कारण तिला मुळात मुलीच विशेष आवडायच्या नाहीत. कदाचित 'स्त्री' म्हणून आयुष्यात तिने जे भोगलं त्याचा परिणाम असेल!
या सगळ्यामुळे माझ्या मनात 'पणजीला मी आवडत नाही' आणि 'तिच्यामुळे घरातल्या सगळ्यांना त्रास होतो' ह्याच दोन गोष्टी घर करून बसलेल्या! तिच्या पुर्वायुष्याबद्दल आई-आजीकडून बरंच काही ऐकलेलं. पण ते लक्षात घेऊन त्यावर विचार करून तिची बाजू समजून घेण्याचं माझं तेव्हा वय नव्हतं.
मी ९-१० वर्षांची असताना ती गेली, ८२-८३ वर्षांची होऊन. म्हणजे साधारण १९९२ साली. त्यानंतर इतक्या वर्षांनी परवा मला तिची प्रकर्षाने आठवण झाली. निमित्त होतं 'लोकसत्ता' मधील एक सदर! नवर्याने टकलेल्या किंवा त्याच्या मॄत्युपश्चात चरितार्थ चालविण्यासाठी घराबहेरपडून धडपड केलेल्या आणि हे करतानाच नावारूपाला आलेल्या काही स्त्रियांच्या आत्मचरित्राची ओळख करून देणारं हे सदर. दर शनिवारी 'चतुरंग' मधे न चुकता वाचते. पण एका शनिवारी मात्र ते वाचताना माझी पणजी डोळ्यासमोर उभी राहिली. वाटलं, आपण जे तिच्याबद्दल ऐकलंय ते फार काही वेगळं नाही! पण फरक इतकाच की ती प्रसिद्धीच्या झोतात आली नाही आणि लोकांच्या कौतुकाचा विषय ठरली नाही. उलट टीकेलाच सामोरी गेली............
१९१०-११ सालचा जन्म असवा तिचा. त्या काळी मुलगी होणं हीच मुळात आनंदाची बाब नव्हती. त्यातून ही दिसायला बेताची आणि काळी. म्हणजे दुष्काळात तेरावा महीना! हिचं लग्नं कस होणार ही घरच्यांना काळजी. म्हणून बिजवराशी लग्नं लावलं; म्हणजे माझ्या पणजोबांशी. दोघांमधे जवळ जवळ २० वर्षांचं अंतर. पण ते नाटककंपनीवाले आणि त्यातून विधुर आणि ही काळी आणि दिसायला बेताची. असा योग (?) जुळून आला आणि त्यांचं लग्नं झालं. १२-१३ वर्षांची असेल माझी पणजी तेव्हा. लग्नं आणि नवरा म्हणजे काय हे ही न कळण्याच्या वयाची. नवरा जवळ आला तरी भीती वाटत असे म्हणायची!!
तर असा तिचा संसार सुरु झाला. घरात खायला-प्यायला काही कमी नव्हतं. नाटककंपनीही छान चालू होती. पणजोबाही कष्टाळू होते. याच दरम्यान माझ्या आजोबांचा जन्म झाला आणि ते जेमतेम ८-१० वर्षांचे असताना माझे पणजोबा गेले......पणजी तेव्हा जेमतेम २४-२५ वर्षांची असेल. हल्ली ज्या वयात मुलींची लग्नं होतात, त्या भावी आयुष्याची स्वप्नं रंगवतात, त्या वयात ती विधवा झाली आणि पदरात एक लहान मूल!
चुलत्यांनी तिला नेसत्या वस्त्रानिशी बाहेर काढलं. हातावर एक छदामही न ठेवता.....काय अवस्था झाली असेल तिची तेव्हा? पण ती डगमगली नाही. माझ्या आजोबांना दूरच्या एका नातेवाईकाकडे ठेवून तिने नर्सिंगचा कोर्स पूर्ण केला आणि एका हॉस्पिटलमधे नोकरी मिळाली. चरितार्थाचा प्रश्न सुटला!
पण तिच्या आयुष्याचं काय झालं? तिला आयुष्यात तसं काहीच सुख मिळालं नाही, पण तिच्याकडे धडाडी होती. ती एकटी जवळ-जवळ अख्खा भारत फिरली. अगदी अमरनाथ यात्रा सुद्धा केली तिने. त्या काळी बेलबॉटमची फॅशन होती. तिने ती घालूनही एक फोटो काढून घेतला होता म्हणे! एकटी हॉटेलमधे सुद्धा जात असे ती.
आमच्या काही नातेवाईकांना, आजूबाजूच्या लोकांना तिचं हे वागणं असभ्य, बेलगाम वाटायचं. तिच्याबद्दल कोणी कधी फारसं चांगलं बोलल्याचं मला आठवत नाही. कदाचित`'विधवा' स्त्री ही सुद्धा एक माणूस आहे, तिलाही तिच्या भावभावना आहेत हे त्यांना मान्यच नसावं. किंवा मान्य असलं तरी फक्त 'विधवा' म्हणून तिने स्वतःला सर्व बंधनांत अडकवून घेऊन एक चाकोरीबद्धं आयुष्यं जगावं ही त्यांची मानसिकता असावी.
पण या सगळ्याचा आता तिच्या बाजूने विचार केला तर वाटत की तिचं नक्की काय चुकलं??
वयाच्या २४-२५व्या वर्षी नवरा गेला ही तिची चूक होती? नातेवाईकांनी आधार द्यायचा सोडून बेघर केलं ही तिची चूक होती? मग त्यांना तिच्यावर टीका करायचा काय अधिकार?
तिला तिच्या इच्छा, आकांक्षा, भावना काहीच नसतील का? त्या तिला पूर्ण कराव्याश्या वाटल्या तर काय बिघडलं? तिला फिरायला चल म्हणणारं कोण होतं? किंवा तिची आवड लक्षात घेऊन कोण काही आणून देणार होतं?
त्या काळी बायकांनी दुसरं लग्नं करणंही सोपं नव्हतं आणि केलं तरी आपल्या मुलाला तिथे स्विकारतील की नाही, नीट वागवतील की नाही ही दुसरी चिंता!
असं सगळं असतानाही ती खंबीरपणे उभी राहीली. रडत न बसता परिस्थितीतून मार्ग काढला. 'लोक काय म्हणतील?' हा विचार तिने कधीच केला नाही. कारण लोक एकवेळ मदतीला पुढे येणार नाहीत पण टीका करण्यात मात्र अजिबात मागे राहणार नाहीत हे तिला कधीच उमगलं असावं......
अशी माझी पणजी अतिशय स्वावलंबी होती. रिटायर्ड झाल्यानंतरही कोणी आजारी असेल तर इंजेक्शन वगैरे द्यायला ती जात असे. अगदी अंथरूणाला खिळेपर्यंत स्वतःची सगळी कामं स्वत: करत असे. आयुष्यात एवढे वाईट दिवस बघूनही तिच्याकडे सकारात्मक दॄष्टीकोन होता. माझ्या भावाला खेळवताना म्हणे ती म्हणायची, माझा मुलगा मॅट्रिक झाला, नातू इंजिनिअर झाला, पणतू आणखी शिकेल.....खूप मोठा होइल.......
आता या सगळ्याचा विचार केला॑ की तिचं खूप कौतुक वाटतं आणि तिच्या खंबीरपणाला, धडाडीला दाद द्यावीशी वाटते.
रडत न बसता आणि कोणाच्या मदतीची अपेक्षा न करता तिने परिस्थितीशी सामना केला. आपलं आयुष्यं मार्गी लावलं. कुठून आलं असेल हे बळ तिच्यात? खरंच आश्चर्यं वाटतं. आणि मनोमन कबूल केलं जातं की भले तिने काही समाजकार्य केलेलं नसूदे, प्रसिद्धीच्या झोतात आलेली नसूदे परंतु तिला प्रतिकूल अशा या समाजात, खंबीरपणे उभं राहून तिने तिच्या आयुष्याचा प्रश्नं सोडवला होता. हे ही काही कमी नव्हतं!!
रविवार, २२ नोव्हेंबर, २००९
John, Dog, Dog............?
हसणं थांबवून माझ्याजवळ येत ती म्हणाली, "कोण आहे हा जॉन? त्याला शिव्या का देत होतीस?" खरं तर तिला माहीत होतं मी कोणाला फोन केला होता आणि माझं काय काम होतं। पण माझ्याही लक्षात आलं की आपण काहीतरी मूर्खासारखं बोललेलं आहोत आणि या बाईसाहेब आपली फिरकी घेतल्याशिवाय रहाणार नाहीत.
खरंतर थोडेच दिवसात मी annual leave वर जाणार होते आणि बहारीन-मुंबई फ्लाईट बुकिंगच्या संदर्भात ट्रॅव्हल एजंटला मी फोन लावला होता। माझ्या तिकिटाची व्हॅलिडिटी मला वाढवून घ्यायची होती। 'JDDARY' असा काहीसा माझा PNR नंबर होता आणि ३-४ वेळा सांगूनही, बुकिंग करणार्या मुलीला तो काही ऐकू जात नव्हता. JDD च्या पुढे आमची गाडी सरकतच नव्हती. डी च्या ऐवजी सारखं तिला बी ऐकू जात होतं. शेवटी मी अक्षर कळावं म्हणून शब्दांचा आधार घेतला आणि "John, Dog, Dog......" असं जरा वरच्या पट्टीत बोलले. माझं काम एकदाचं झालं. पण त्यातून एवढं हसण्यासारखं काय घडलं मला काही सुधरेना.
माझ्या कलीगने मग खुलासा केला की जॉन हे त्या ट्रॅव्हल एजन्सीच्या मॅनेजरचं नाव होतं। मी कपाळावर हात मारून घेतला. आता मला काय स्वप्नं पडलं होतं हे माहीत असायला?? माझी कलीग आमच्या CFO ची PA असल्यामुळे आणि तो बरेचदा विमान प्रवास करत असल्याने तिला वरचेवर तिकिट बुकिंग करावं लागतं. त्यामुळे तिला या ट्रॅव्हल एजन्सी मधले लोक चांगलेच माहीत होते. त्यामुळे माझे शब्द ऐकून तिला हसू आवरेना.मग ती मला म्हणाली, "अगं, प्रत्येक गोष्टीचे काही संकेत असतात. तसे तिकिट बुक करतानाही असतात." मी म्हटलं, "तिकिट बुक करताना कसले आलेत संकेत? तिला अक्षरं कळत नव्हती, ती कळावीत म्हणून मी शब्दं वापरले! आता ह्यात काय चुकलं?" ती मला म्हणाली, "अगं, ही अक्षरं ने कळणं हे अगदी कॉमन आहे आणि त्यासाठी शब्दं वापरणं हे सुद्धा. म्हणूनच यासाठी कुठले शब्द वापरावेत याचे काही संकेत आहेत." असं म्हणून तिच्याकडे असलेली एक लिस्ट तिने मला दिली. आणि म्हणाली, "ही लिस्ट तुझ्याकडे ठेव आणि इथून पुढे कधी तुला बुकींग करायची वेळ आली तर ती वापर." बरं म्हणून ती मी माझ्याकडे ठेवली.
माझ्या मनात आलं खरंच, प्रत्येक वेळी कसं बोलावं, काय बोलावं, काय बोलू नये या सगळ्या गोष्टींचे काही नियम असतात. आणि ते जर आपल्याला माहीत नसतील तर माझ्या बाबतीत घडला तसे प्रसंग घडू शकतात. माझ्यासारखी बाकी कोणाची फजिती होऊ नये म्हणून ती लिस्ट तुम्हा सर्वांसाठी इथे देत आहे. बघा कधी उपयोगी पडली तर...................
A-Alpha B-Bravo C-Chairs D-Delta E-Echo F-Fox G-Gulf H-Hotel I-India J-Juliet K-King L-Lima M-Mother N-November O-Oscar P-Papa Q-Queen R-Rameo S-Sugar T-Tango U-Uniform V-Victory W-Wisky X-X-Ray Y-Young Z-Zoo
गुरुवार, १९ नोव्हेंबर, २००९
कहानी गुडिया की........
रविवार, १३ सप्टेंबर, २००९
Vegas, Vegas………………भाग २
सुरुवतीला आम्ही स्वतःवर नियंत्रण ठेवलं तरी वेगासला आलो आणि gambling नाही केलं तर काय मजा? म्हणून शेवट्चे २ दिवस खास त्यासाठी राखून ठेवले होते.
कधीही कुठल्याही हॉटेलचा casino बघा, रिकामा म्हणून दिसणार नाही! तरुणांना लाजवतील अशा उत्साहाने अनेक म्हातारी मंडळी आपल्या आयुष्यभराची कमाई अगदी खुशाल या casino मधे उडवत असतात. असं वाटतं की ही मंडळी बहुधा फक्तं 'casino' साठीच इथे येतात. आजी-आजोबांच्या अनेक जोडया इथे पहायला मिळतात आणि त्यांचा ओसंडून जाणारा उत्साह बघून आपल्याला लाज वाटते. ९-१० वाजता brunch करायचा आणि casino मधल्या खुर्च्यांवर जे स्थानापन्न व्हायचं ते उठायचं नावच घ्यायचं नाही. एका हातात सिगरेट किंवा बिअर (किंवा दोन्ही!!) आणि एका हाताने खेळणं चालू.........
आम्ही जेव्हा casino मधे पहिलं पाऊल टाकलं तेव्हा एका वेगळ्याच दुनियेत प्रवेश करतोय असं वाटलं. सुरुवात केली ती 'slot machine' पासून. अगदी १ सेंट पसून ते २०-२५ डॉलर्सपर्यंतची मशिन्स. तुम्हाला पाहिजे त्या किंमतीची बेट लावा! आम्ही सगळ्यात कमी बेटच्या मशिन्सवर बसलो-१ सेंट....... आणि १ डॉलरची नोट आत सरकवली. आयुष्यात पहिल्यांदा 'जुगार' खेळत होतो. साहजिकच थोडी अपराधीपणाची भावना मनात होती पण खूपशी excitement सुद्धा होती!!
त्या मशिनचा खटका दाबल्यावर ५ चेरीज किंवा ५ डायमंड्स एका ओळीत आले आणि आपल्या एका डॉलरचे २ झाले की असा काही आनंद होतो म्हणून सांगू..... पण हाच आनंद पुढे महागात पडतो। कारण एकाचे दोन आणि दोनाचे चार डॉलर्स होतील या अपेक्षेने आपण खेळत राहतो आणि या चढत्या भाजणीची उतरती भाजणी कधी होते ते आपल्यालाच कळत नाही आणि शेवटी आपल्या हातात काहीच रहात नाही.
ही slot machines सोडून आणखी अनेक प्रलोभनं या casino मधे आपल्याला दिसतात.
Roulette-एक फिरणार चक्र आणि त्याच्यावर फिरणारी एक गोटी. बाजूने कोंडाळं करून अनेक लोकं उभी असतात आणि आपल्या बेट्स लावत असतात. हिंदी चित्रपटात खूपदा दिसतं हे दॄष्य.
त्याशिवाय ‘black jack’. याची सुद्धा अनेक टेबल्स मांडलेली असतात-वेगवेगळ्या बेट्सची. अगदी ५ डॉलर्सपासून ५०० डॉलर्स पर्यंत. मिचमिच्या डोळ्यांची चायनीज लोकं या टेबलचे होस्ट्स असतात आणि नुसते तुम्ही बाजूने गेलात तरी येणार का खेळायला म्हणून विचारतात. आम्ही लास वेगसला जाणार हे नक्की झाल्यावर माझ्या दीराने आम्हाला 'casino' मधे जाण्यासाठी 'qualified' करण्याचा चंगच बांधला आणि ब्लॅक जॅक कसा खेळायचा हे अगदी छान शिकवलं. त्यामुळे साहजिकच 'ब्लॅक जॅकची' ती टेबल्स बघून आपलं ज्ञान आजमावण्याचा मोह आम्हाला आवरला नाही. नेहमीप्रमाणे कमीत कमी बेटचं टेबल बघून आम्ही बसलो. आणि पहिल्याच खेपेत माझ्या नवर्याचे ५० चे १०० डॉलर्स झाले. आम्ही खेळ तिथेच आटोपला. पण दुसर्या खेपेस मात्र आधीच्या खेळातला नफा आणि दुसर्या वेळ्च्या मुद्दलातलाही काही भाग गमावलाच आम्ही!
Roulette आणि black jack खेरीज Keno म्हणजे साधारण आपल्या हौजीसारखा खेळ, पोकर असे गँब्लिंगचे विविध प्रकार आपल्याला इथे पहायला मिळतात. कुठल्या माणसाला गँब्लिंगचं कुठलं रूप आपलं नशीब आजमावण्याचा मोह पाडेल सांगता येत नाही. casino च्य या मायनगरीत शिरलेल्यांना दिवस्-रात्रीचंही भान नसतं. किंबहुना या कासिनोस ची रचनाच अशी केलेली असते की बाहेरच्या जगाशी तुमचा काही संपर्क राहू नये. पण शेवटी आपलं स्वतःवरचं नियंत्रण हेच महत्त्वाचं.
तर अशा या मायानगरीतील ५-६ दिवसांचं आमचं वास्तव्यं आटोपलं आणि लक्ष्मीच्या एका वेगळ्याच रुपाचा वरदहस्त असलेल्या शहराचा आम्ही निरोप घेतला. आज आमच्या 'वेगास' भेटीला एक वर्ष उलटून गेलं तरी त्या आठवणी मात्र अजूनही ताज्या आहेत. किंबहुना त्या सदैव, तशाच ताज्या रहाव्यात यासाठीच त्यांना शब्दांत अडकविण्याचा हा खटाटोप!!
Vegas, Vegas.....................भाग १
Las Vegas...............पैशांचं शहर, मौजमजेचं शहर, काही बेकायदा गोष्टी कायदेशीर रित्या, उजळ माथ्याने करण्याचं शहर!
'जीवची मुंबई करणे' म्हणजे काय एवढंच महीत असलेली मी गेल्यावर्षी जीवाचं 'लास वेगास' कसं करतात तेही अनुभवून आले. तिथला विमानतळंच खुद्द वेगासमधे शिरल्यावर आपल्याला काय काय दिसणार आहे याची चुणुक दाखवतो. 'Curtain raiser' च म्हणाना! विमानतळावरच आपल्याला 'slot machines' दिसायला सुरुवात होते आणि त्यांचे टंग, टंग,टंग, आवाज पुढच्या तुमच्या संपूर्ण वास्तव्यात तुमची साथ करणार आहेत हे कळून चुकतं.
तर अशा या 'नावाजलेल्या' शहराचा अनुभव घेण्यासाठी आम्ही वेगासमधे दाखल झालो। Rhode Iland, म्हणजे अमेरिकेचा ईस्ट कोस्ट, जे आमच्या अमेरिकेतील मुक्कामाचं मुख्यं ठिकाण होतं, तिथून जवळ जवळ ६-७ तासांचा प्रवास करून आम्ही वेगास मधे पोचलो. Rhode Iland जितकं निसर्गसौंदर्याने नटलेलं तितकंच वेगास रुक्षं आणि रखरखीत! हॉटेलचीच बस आम्हाला एअरपोर्टवरून पिक्-अप करायला आली आणि १५-२० मिनिटांत आम्ही हॉटेलमधे पोचलो. दिवसभरच्या प्रवासाचा थकवा आणि उकाडा यामुळे हैराण झालेले आम्ही कधी एकदा चेक्-इन करतोय असं झालं होतं. पण कसचं काय, चेक्-इन साठी ही भली मोठी रांग..... त्या रांगेत उभं असतानाच आजूबाजूचं निरीक्षण चालू होतं. आमच्या हॉटेलमधे एक मोठा 'casino' होता आणि slot machines चा अखंड आवाज चालू होता. लहानांपासून वयोवॄद्धांपर्यंत सर्व वयाचे आणि नानाविधप्रकारचे लोक दॄष्टीस पडत होते. शेवटी एकदाचं चेक्-इन झालं आणि आम्ही आमच्या रूममधे जाऊन पोचलो. संध्याकाळचा साधारण ६-६:३० चा सुमार असेल. रूममधे जाऊन थोडे फ्रेश झालो आणि 'वेगास'ची तोंड ओळख कऊन घ्यावी म्हणून बाहेर पडलो.दिव्यांच्या झगमगाटात उजळून निघालेलं रात्रीचं वेगास बघून डोळे दिपून गेले. आपल्याकडे दिवाळीत जसे रस्ते कंदील आणि दिव्यांच्या माळांनी झगमगत असतात? अगदी त्याचीच आठवण झाली. त्या दिवशी आम्ही साधारण कुठे काय आहे याचा अंदाज घेण्यासाठी एक फेरफटका मारून परत फिरलो आणि दुसर्या दिवशी नव्या दमाने बाहेर पडायचं ठरवलं.
दुसर्या दिवशी सकाळी मस्तपैकी 'continental breakfast' चा आस्वाद घेतला. ब्रेकफास्टसाठी एवढे पदार्थ समोर ठेवलेले होते की ते पाहूनच अर्धं पोट भरलं आणि काय खाऊ नि काय नको अशी अवस्था झाली! इथे येणारी बहुतेक माणसं 'Brunch' (म्हणजे Breakfast+lunch) करूनच बाहेर पडतात। सकाळी जरा उशीराने, ९:३०-१० वाजता एवढा हेवी ब्रेकफास्ट करायचा की दुपारच्या जेवणाची गरजच भासता कामा नये। आम्हीही तिथे असताना तसंच करायचो (आणि शिवाय एकेक सफरचंद किंवा केळं आमच्या पर्समधे टाकायचो. न जाणो मधे चुकून-माकून भूक लागली तर!!)
वेगासमधे जे जे काही बघण्यासारखं आणि अनुभवण्यासारखं आहे ते सगळं आहे 'Vegas Strip' वर. ही strip म्हणजे एकच लांबच लांब रस्ता-- जवळ जवळ ६-६:३० किलोमीटर लांबीचा। रस्त्याच्या दोन्ही बाजूला अवाढव्य हॉटेल्स! इथे बहुतेक सर्व हॉटेल्सची वेगास स्ट्रीप वर सोडणारी शटल सर्व्हीस असते। स्ट्रीपच्या कुठल्याही एका टोकाला आपल्याला ते सोडतात. तिथून चालत अख्खी स्ट्रीप भटकायची आणि रात्री परत स्ट्रीपच्या कुठल्याही एका टोकाला येऊन थांबायचं जेणेकरून हॉटेलच्याच शट्लने आपल्याला परत जाता येईल.
इथलं प्रत्येक हॉटेल प्रचंड आणि स्वत:चं एक वैशिष्टयं असलेलं-अगदी नावापासून ते त्याच्या आर्किटेक्चर पर्यंत। नावं तरी कशी? Paris, Venetian, NewYork NewYork, Caeser's Palace, Luxor... जणू काही ती त्या त्या देशाचं प्रतिनिधित्वं करत आहेत। प्रत्येक हॉटेलभोवती त्याच्या नावाला साजेलसा देखावा। म्हणजे बघा ना-Venetian च्या बाहेर एक छोटासा लेक, त्यात गंडोलाज वगैरे.....त्यात बसून तुम्हाला एक फेरफट्काही मारता येतो।पॅरिस होटेलच्या बाहेर तर साक्षात आयफेल टॉवर तुमच्या स्वागताला खडा! या आयफेल टॉवर वरही तुम्हाला जाता येतं। आणि हो, तिथे जाताना चक्कं 'Gustav Eiffel' तुम्हाला टॉवरच्या निर्मीतीची कहाणी सांगतो! NewYork NewYork च्या बाहेर अमेरिकेची स्वातंत्र्यदेवता आणि न्यूयॉर्कची skyline तुमचं स्वागत करते. प्रत्येक हॉटेल, ज्याचं नाव कुठल्या ना कुठल्या देशाशी निगडित आहे, त्या त्या देशाची वैशिष्टयं मिरवत दिमाखात उभं आहे। असंच एक लक्षात राहिलेलं हॉटेल म्हणजे 'Bellagio'..... ते लक्षात राहतं ते त्याच्या 'fountain show' मुळे। दर अर्ध्या तासाने हे शोज असतात. १०-१५ मिनिटांचा एक शो, पण तुम्हाला थक्क करणारा आणि सभोवतालचा विसर पाडणारा! गाण्याच्या सुरावटींवर नाचणारी कारंजी तोंडात बोटं घालायला लावतात. प्रत्येक स्वरावटीवर त्या लयीत हलणारे कारंज्याचे फवारे कसलेल्या नर्तकीलाही लाजवतील इतके मोहक आणि अदापूर्ण!
एवढं सगळं बघून तुम्हाला स्ट्रीप कव्हर केल्यासारखं वाटतं न वाटतं तोच तुमच्या लक्षात येतं की अरे, हा तर स्ट्रीपचा अर्धाच भाग आहे। अजून दुसर्या बाजूलाही 'Circus Circus', 'Stratosphere' ही हॉटेल्स तुमची वाट बघत आहेत....
अशी अनेक हॉटेल्स आणि त्यांची अनेक वैशिष्टयं- hotel Flamingo चं 'wildlife habitat', MGM Grand चं 'Lion Habitat', Caeser's Palace चा 'Fall of Atlantis show', आणि खरंच stratophere ला स्पर्श करतो की काय असा प्रत्यय देणारा stratosphere tower आणि सर्वात हॄदय दडपून टाकणारी गोष्ट म्हणजे या ११२ मजली टॉवरच्या डोक्यावर असलेल्या तीन राइड्स....... हे सगळं बघताना दिवस कधी संपतो कळंतंच नाही। तहान भुकेचंही भान रहात नाही।
इथे प्रत्येक होटेलच्या 'attraction' पर्यंत पोचण्याचा मार्ग हा मॉल आणि कसिनोच्या पोटातून...... त्या त्या हॉटेलचा मॉल आणि कसिनो याच्यातून पार झाल्याशिवाय तुम्हाला इच्छित गोष्टीचं दर्शन होणं अशक्य!! कसिनो बघितल्यावर सहाजिकच 'बघूया नशीब आजमावून!' असं वाटल्याशिवाय रहात नाही आणि कमीत कमी २-४ डॉलर्स 'स्लॉट मशिन' ला दान दिल्याशिवाय माणूस पुढे जात नाही... आम्ही मात्र या गोष्टीवर जाणीवपूर्वक नियंत्रण ठेवलं होतं। इथे ५-६ दिवस घालवायचे हे ठरलेलं असल्यामुळे पहिले ४ दिवस आम्ही नुसते फिरलो आणि कसिनोचा मोह आवरला। नाहीतर पहिल्याच दिवशी लखाचे बाराहजार व्हायला वेळ लागला नसता...!
क्रमशः.....
बुधवार, २ सप्टेंबर, २००९
वहीचं पान-शेवटचं................
झालं, एका निवांत दुपारी मी कापाटाच्या आवरा-आवरीचं काम हाती घेतलं। दार उघडताक्षणी आठवणींचा खजिनाच उघडला जणू. शाळेपासूनच्या जपून ठेवलेल्या कितीतरी गोष्टी, तसंच जुन्या वह्या पुस्तकं असं बरच काही माझ्या हाती लागलं. काय ठेवावं काय टाकावं हे बघतानाच एकीकडे मी जुन्या वह्या चाळत होते. अशाच काही वह्या चाळताना जाणवलं की आपण केलेला अभ्यास किंवा वहीचा इतर मुख्य विषय सोडून वहीत आणखी बरंच काही दडलेलं असतं आणि ते सगळं असतं......तुमच्या लक्षात आलंच असेल एव्हाना....... हो, ते सगळं असतं वहीच्या शेवटच्या पानावर..........
वहीच्या या शेवटच्या पानात खूप काही लपलेलं असतं। खूप आठवणी सामावलेल्या असतात. अगदी जुन्या फोटोंचा अल्बम बघताना आपल्याला जशी गंमत येते ना तशीच वहीचं हे शेवटचं पान बघताना येते. आणि अनेक गमतीशीर आठवणी जाग्या होतात........
खरच काय काय खरडलेलं असतं आपण त्या पानावर.........
गणितं सोडवताना केलेली कच्ची आकडेमोड हा तर बहुतेक सगळ्या शेवटच्या पानांचा अविभाज्य घटक असतो! त्याशिवाय लेक्चर चालू असताना मैत्रीणीला काही सांगायचं झालं तर तेही याच पानावर लिहायचं। परत त्याच्यावरचं तीचं उत्तरही तिथेच कुठेतरी सापडणार..... "लेक्चर किती बोअर होतंय, सगळं बाऊन्सर जातंय, त्यापेक्षा बसलो नसतो तरी चाललं असतं........" इत्यादी इत्यादी.....
हे एवढ्यावरंच थांबत नसे। खूपच कंटाळा आला तर त्या पानाचा आणखीनच सदुपयोग :) केला जात असे आणि त्याच्यावर फुली-गोळा, सिनेमांची नाव ओळखणं असे विविध प्रकरचे खेळही खेळले जात असंत. झालंच तर वर्गातल्या इतर कोणावर तरी कॉमेंट्स्.....कोणाचा ड्रेस कसा आहे, कोणाची हेअर्-स्टाईल आज कशी दिसतेय इथपासून ते आज डब्यात काय आणलंय इथपर्यंत.....अशा अनेक गोष्टी त्या पानावर खरडलेल्या असंत.
प्रत्येक वर्गातले बॅक बेंचर्स (काही अपवाद वगळता) जसे अभ्यास सोडून इतर सर्व उद्योग करण्यात मश्गूल असतात ना तसंच काहीसं वहीच्या या शेवटच्या पानाचं असतं! अभ्यास सोडून बाकी गावभरच्या गोष्टी त्यावर लिहिलेल्या असतात.
कधी आईने दिलेल्या पॉकेटमनीचा हिशोब तर कधी कुठल्याशा गाण्याच्या चार ओळी। मैत्रीणींपैकी कोणी वेगळी भाषा शिकत असेल तर त्या भाषेतील एखादं वाक्यं किंवा कोणी चायनीज, जॅपनीज शिकत असेल तर त्या लिपीतलं आपलं नाव. कोणाची चित्रकला चांगली असेल तर एखादं छोटसं चित्रं, पाना-फुलांची नक्षी किंवा एखादी छोटीशी रांगोळी सुद्धा! अशा कित्तीतरी गोष्टी.......... शाळा-कॉलेज मधील मोरपंखी दिवसांच्या आठवणींचा संग्रह्-अनमोल संग्रह असतं हे पान.
अशाच माझ्या एका वहीचं शेवटचं पान बघताना, त्यावर लिहिलेल्या वेगवेगळ्या गोष्टी वाचताना माझं मलाच हसू आलं. आपण केलेल्या गोष्टींची गंमत वाटली आणि कॉलेज मधल्या माझ्या एका मैत्रीणीची इतकी प्रकर्षाने आठवण झाली की कपाट आवरणं बाजूल ठेवून पहिला तिला फोन लावला आणि आठवणींचा हा खजिना गप्पांमधून पुन्हा एकदा जिवंत केला..............
रविवार, २६ जुलै, २००९
प्रामाणिक
माझ्या बाजूला उभी असलेली एक मुलगी हे सगळं बघत होती. तिने पटकन गाडीतून वाकून मागे बघितलं. बाजुच्या ट्रॅकवरून एक माणूस चालला होता. त्याला जोरात ओरडून तिने सांगितलं, "भाईसाहब अगर ट्रॅकपे कोई मोबाईल मिला तो प्लीज उठा लेना". तो हो म्हणाला की नाही हे कळेपर्यंत गाडीने वेग घेतला होता. लगेच तिने मला तिचा मोबाईल दिला आणि माझा नंबर फिरवायला सांगितला. आणि काय आश्चर्य! त्या इसमाने खरच माझा मोबाईल उचलला होता!! माझ्या जीवात जीव आला. तो मला म्हणाला, "मॅडम, मै आपके लिये दादर स्टेशनपे वेट करता हू. १ नंबर प्लॅटफॉर्मपे जो पुलिस स्टेशन है उधर आजाओ.". मी ठीक आहे म्हणून फोन ठेवला. त्या मुलीला तर कसं थॅंक्स करू तेच कळत नव्हतं. तिने प्रसंगावधान राखून जर त्या माणसाला सांगितलं नसतं तर माझा मोबाईल मिळण्याची आशा पूर्णपणे मावळली असती।
इतक्यात माझं स्टेशन आलं आणि मी उतरले. आणि परत उलटया दिशेला दादरला जाणारी लोकल पकडली. मनात सारखी शंका येत होतीच खरच थांबला असेल का तो माणूस माझा मोबाईल घेऊन? का आपलं मला म्हणाल नुसतं आणि गेला असेल पळून?उलट सुलट विचार करता करता दादर कधी आलं कळलंच नाही. मी तडक त्याने सांगितलेल्या ठिकाणी जाऊन पोचले आणि मला खरचं विशेष वाटलं. तो माणूस माझी वाट पहात तिथेच उभा होता. मी मोबाईल त्याच्याकडून घेतला आणि त्याला थँक्स म्हणून परतीच्या वाटेला लागले.खरंतर तो माझा फोन न उचलता तसाच निघून जाऊ शकला असता. किंवा त्याला माझा मोबाईल मिळाला आहे हे कळू न देता लंपास करू शकला असता. सहज शक्य होतं ते. आणि हे सगळं काही मिनिटांच्या कालावधीत घडल्यामुळे त्याचा चेहराही कोणी नीट बघितला नव्हता. पण तसं न करता त्याने जो प्रामाणिकपणा दाखवला त्याचं कौतुक वाटलं.