रविवार, २२ नोव्हेंबर, २००९

John, Dog, Dog............?

"John, Dog, Dog.....", फोनवर बोलता बोलता मी जरा वरच्याच पट्टीत म्हणाले. माझ्या केबिनचं दार उघडंच असल्याने, बाहेरच्या क्युबिकलमधे बसलेल्या माझ्या कलीगला माझा आवाज अगदी सहज ऐकू गेला. मी फोन ठेवण्याचीच जणू काही ती वाट बघत होती. ती पोट धरून खो-खो हसू लागली। मला कळेना, आत्तापर्यंत ही बरी होती, हिला अचानक झालं तरी काय? मी तिला खुणेनेच विचारलं, "काय झालं? एवढी फिदी, फिदी का हसते आहेस?"
हसणं थांबवून माझ्याजवळ येत ती म्हणाली, "कोण आहे हा जॉन? त्याला शिव्या का देत होतीस?" खरं तर तिला माहीत होतं मी कोणाला फोन केला होता आणि माझं काय काम होतं। पण माझ्याही लक्षात आलं की आपण काहीतरी मूर्खासारखं बोललेलं आहोत आणि या बाईसाहेब आपली फिरकी घेतल्याशिवाय रहाणार नाहीत.
खरंतर थोडेच दिवसात मी annual leave वर जाणार होते आणि बहारीन-मुंबई फ्लाईट बुकिंगच्या संदर्भात ट्रॅव्हल एजंटला मी फोन लावला होता। माझ्या तिकिटाची व्हॅलिडिटी मला वाढवून घ्यायची होती। 'JDDARY' असा काहीसा माझा PNR नंबर होता आणि ३-४ वेळा सांगूनही, बुकिंग करणार्‍या मुलीला तो काही ऐकू जात नव्हता. JDD च्या पुढे आमची गाडी सरकतच नव्हती. डी च्या ऐवजी सारखं तिला बी ऐकू जात होतं. शेवटी मी अक्षर कळावं म्हणून शब्दांचा आधार घेतला आणि "John, Dog, Dog......" असं जरा वरच्या पट्टीत बोलले. माझं काम एकदाचं झालं. पण त्यातून एवढं हसण्यासारखं काय घडलं मला काही सुधरेना.
माझ्या कलीगने मग खुलासा केला की जॉन हे त्या ट्रॅव्हल एजन्सीच्या मॅनेजरचं नाव होतं। मी कपाळावर हात मारून घेतला. आता मला काय स्वप्नं पडलं होतं हे माहीत असायला?? माझी कलीग आमच्या CFO ची PA असल्यामुळे आणि तो बरेचदा विमान प्रवास करत असल्याने तिला वरचेवर तिकिट बुकिंग करावं लागतं. त्यामुळे तिला या ट्रॅव्हल एजन्सी मधले लोक चांगलेच माहीत होते. त्यामुळे माझे शब्द ऐकून तिला हसू आवरेना.मग ती मला म्हणाली, "अगं, प्रत्येक गोष्टीचे काही संकेत असतात. तसे तिकिट बुक करतानाही असतात." मी म्हटलं, "तिकिट बुक करताना कसले आलेत संकेत? तिला अक्षरं कळत नव्हती, ती कळावीत म्हणून मी शब्दं वापरले! आता ह्यात काय चुकलं?" ती मला म्हणाली, "अगं, ही अक्षरं ने कळणं हे अगदी कॉमन आहे आणि त्यासाठी शब्दं वापरणं हे सुद्धा. म्हणूनच यासाठी कुठले शब्द वापरावेत याचे काही संकेत आहेत." असं म्हणून तिच्याकडे असलेली एक लिस्ट तिने मला दिली. आणि म्हणाली, "ही लिस्ट तुझ्याकडे ठेव आणि इथून पुढे कधी तुला बुकींग करायची वेळ आली तर ती वापर." बरं म्हणून ती मी माझ्याकडे ठेवली.
माझ्या मनात आलं खरंच, प्रत्येक वेळी कसं बोलावं, काय बोलावं, काय बोलू नये या सगळ्या गोष्टींचे काही नियम असतात. आणि ते जर आपल्याला माहीत नसतील तर माझ्या बाबतीत घडला तसे प्रसंग घडू शकतात. माझ्यासारखी बाकी कोणाची फजिती होऊ नये म्हणून ती लिस्ट तुम्हा सर्वांसाठी इथे देत आहे. बघा कधी उपयोगी पडली तर...................

A-Alpha B-Bravo C-Chairs D-Delta E-Echo F-Fox G-Gulf H-Hotel I-India J-Juliet K-King L-Lima M-Mother N-November O-Oscar P-Papa Q-Queen R-Rameo S-Sugar T-Tango U-Uniform V-Victory W-Wisky X-X-Ray Y-Young Z-Zoo

६ टिप्पण्या:

  1. मजा आली. असे गंमतीशीर प्रसंग बि.पी.ओ. मधे फार घडतात. तिथेही अशीच अल्फाबेट लिस्ट पाठ करावी लागते, जेणेकरून आद्याक्षराच्या ओळखीसाठी चुकीचा शब्द वापरला जाऊ नये. मात्र, बिपीओ मधे काम करणा-याला ही लिस्ट पाठ करण्याचं बंधन असतं तसं ग्राहकाला नसतं त्यामुळे ग्राहक ब-याचदा डी फॉर डॉग असंच म्हणतात. आपण इथून डी फॉर डेल्टा म्हणायचं, ते म्हणतात, "येह, करेक्ट, डी फॉर डॉग... डी फॉर डॉग.... करेक्ट." खूप मजा वाटते अशा प्रकारे संभाषण होतं तेव्हा.

    उत्तर द्याहटवा
  2. माझं नांव सांगतांना मी (एम )मद्रास (बी) बॉम्बे कुलकर्णी सांगतो..इतर शब्द आले तर सरळ ज्या गावाचं नाव आठवेल ते सांगुन मोकळा होतो.. आता हे असे अल्फाबेट्स पाठ करायचे म्हणजे...... !! मजा आहे !!

    उत्तर द्याहटवा
  3. यादीबद्दल धन्यवाद. गरज पडल्यास ह्याचा वापर करायचा प्रयत्न करेन :)

    उत्तर द्याहटवा
  4. आपल्या सर्वांच्या प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद! अक्षर समजण्यासाठी गावाचं नाव वापरायची कल्पनाही चांगली आहे.

    उत्तर द्याहटवा
  5. छान आहे पोस्ट इथे S - Sam, F - Frank जास्त चलतीत दिसतात. माझा नवरा D as in doctor असं नेहमी म्हणतो त्याचं नावच वरुन आहे न....

    उत्तर द्याहटवा