रविवार, २० डिसेंबर, २००९

साक्षर

मध्यंतरी 'निशाणी डावा अंगठा' हा चित्रपट बघितला. सरकारने चालू करण्यास सांगितलेले 'प्रौढ साक्षरता' अभियान धाब्यावर बसवून; साक्षरांनाच 'नवसाक्षर' म्हणून परीक्षेस बसवून; हे अभियान यशस्वीरित्या पूर्ण केल्याचे दाखवून, एक गाव प्रथम पारितोषिक कसे पटकावते त्याची ही कथा. हा चित्रपट पाहून झाल्यावर मनात एक प्रश्न रुंजी घालू लागला: साक्षर कोणाला म्हणावे?

ज्याला सही करता येते तो साक्षर, ज्याला लिहिता-वाचता येते तो साक्षर, जो दहावी-बारावी झालाय तो साक्षर की ज्याच्याकडे बी.ए., बी. कॉम, एम.बी.ए अशी एखादी डिग्री (किंवा डिग्र्या ) आहेत तो साक्षर? लौकिक अर्थाने बघायला गेलं तर ज्याला लिहिता वाचता येतं तो साक्षर. पण मग मनात आलं या एकविसाव्या शतकात, स्पर्धेच्या युगात फक्त लिहिता वाचता येणं हा एकच निकष साक्षर/निरक्षर भेद करण्यास पुरेसा ठरेल का? या प्रश्नाचं उत्तर शोधताना मला जाणवलं आजच्या काळात साक्षरतेसाठी एवढा एकच निकष पुरेसा नाही. साक्षरता बहुआयामी आहे. तिला विविध अंग आहेत, बाजू आहेत.
लिहिता-वाचता येणं अथवा आपल्या आवडत्या किंवा चरितार्थाला उपयोगी पडेल अशा विषयात प्राविण्य मिळवणं, हे त्यातील एक. हे सोडून आणखी काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला आल्या नाहीत तर कितीही पदव्या/पदविका आपल्या नावापुढे असल्या तरी बाहेरच्या जगात आपण 'बावळट' ठरतो किंवा बाहेरच्या जगात वावरण्यास कुठेतरी कमी पडतो. थोडक्यात काय तर अगदी अडाणी/निरक्षर ठरतो!

माझ्या दॄष्टीने आर्थिक साक्षरता ही त्यातली एक. रोजच्या जीवनातले पैशांचे व्यवहार करता येणं: बँकेतली छोटी-मोठी कामं करणं (चेक किंवा कॅश भरणे अथवा काढणे ई.); ए.टी.एम्/क्रेडिट कार्ड यांसारख्या सुविधा सफाईदारपणे वापरता येणं; आपण मिळवलेल्या पैशाचं योग्य पद्धतीनं नियोजन करता येणं; त्यासाठी गुंतवणुकीचे कोणकोणते पर्याय उपलब्ध आहेत हे माहीत असणं किंवा ते माहीत करून घेण्याची क्षमता आणि इच्छा असणं, या सगळ्या गोष्टींचा मी आर्थिक साक्षरतेत समावेश करेन. या गोष्टी आज प्रत्येक व्यक्तीला येणं गरजेचं आहे. मग ती नोकरदार व्यक्ती असो, गॄहिणी असो किंवा एखादा विद्यार्थी असो. आज अशी अनेक माणसं आजूबाजूला दिसतात ज्यांना या गोष्टी करता येत नाहीत. ज्यांच्यावर या गोष्टी करण्याची कधी वेळच आलेली नाही किंवा घरातला कर्ता पुरुष या गोष्टींची काळजी घेतोय तर मी कशाला त्यात लक्षं घालू? अशी काहीशी त्यांची भूमिका आहे. पण शेवटी एक विचार सारखा मनात येतो कि या काही फार अवघड गोष्टी नाहीत आणि त्यांचा संबंध आपल्याशी कधीही येवू शकतो. तर मग त्यांची माहीती करून घेण्यात का टाळाटाळ?

आम्ही लहान असताना, म्हणजे साधारण सहावी-सातवीत, आमची आई आम्हाला एखादा चेक भरायला बँकेत पाठवत असे. स्लिप वगैरे ती भरून देत असे. नुसता चेक काऊंटर वर जाऊन भरायचा. एवढंच काय, आम्ही आई बरोबर बरेचदा ए.टी.एम मधेही जायचो. तेव्हा ते कार्ड मशिनमधे सरकवून पैसे काढण्याची मजा वाटत असे. कदाचित पुढल्या खेपेस आई तिचा पिन नंबर बदलतही असेल! पण अशा पद्धतीने आम्ही हळूहळू ही साधनं कधी वापरायला शिकलो आम्हाला कळलही नाही! आम्हा भावंडांच्या १८ व्या वाढदिवसाचं बक्षिस होतं आमच्या नावावर बँक अकांऊंट. केवढं अप्रूप वाटलं होतं तेव्हा. पैसे काही फार नसायचे त्यात पण तो आपण स्वतः ऑपरेट करायचा हेच खूप काही शिकवून जाणार होतं. मला आठवतंय माझ्यासाठी जेव्हा स्थळं बघत होते तेव्हा मर्चंट नेव्ही मधल्या एका मुलाचं स्थळ आलं होतं. त्या मुलाच्या आईनं आम्हाला सांगितलं होतं, तुमच्या मुलीचं शिक्षण वगैरे ठीक
आहे. पण आमचा मुलगा वर्षातील सहा महीने बोटीवर असतो. तो इथे नसताना तुमच्या मुलीला सर्व आर्थिक व्यवहार करता आले पाहीजेत! थोडक्यात सांगण्याचा मुद्दा काय तर आज औपचारिक शिक्षणाबरोबरच आर्थिक शिक्षणही तितकंच महत्त्वाचं आहे आणि आई-वडिलांनी मुलांवर विश्वास दाखवल्याशिवाय, त्यांना प्रोत्साहन दिल्याशिवाय ते मिळणं शक्यं नाही. अर्थात कुठल्याही व्यक्तीने या गोष्टींच महत्त्व ओळखणं आणि शिकण्याची इच्छा दाखवणं हे ही तितकंच महत्त्वाचं!

माझ्या दॄष्टीने दुसरी महत्त्वाची गोष्टं म्हणजे 'संगणक साक्षरता' किंवा 'computer literacy'. आजच्या युगात, या 'paperless office' च्या जमान्यात, संगणक तुमचा दोस्त नसेल तर तुमचं कठीण आहे! म्हणजे अगदी संगणकाच्या लँग्वेजेस किंवा ओरॅकल सारख्या गोष्टी म्हणत नाही मी पण कमीत कमी 'word', 'excel' ,'power point', 'internet' या गोष्टी तरी वापरता यायला हव्यात. ती आजच्या काळाची गरज आहे. या बाबतीत मात्र लहान मुलं आपल्या आई-वडिलांपेक्षा अधिक स्मार्ट असलेली बघायला मिळतात! ऑफिसमधेही मी बरेच वेळा अनुभव घेतलाय. अगदी मॅनेजर लेव्हलचा माणूस, पण excel मधला एखादा फॉर्म्युला किंवा power point वापरायची वेळ आली कि हैराण होतो. मग एखाद्या सेक्रेटरीने power point मधे एखादं प्रेझेंटेशन करून दिलं कि त्याला ती सेक्रेटरी काही क्षणांपुरती का होईना पण ग्रेट वाटून जाते!!

तर अशा तर्‍हेने औपचारिक शिक्षणा व्यतिरिक्त मला महत्त्वाच्या वाटणार्‍या या गोष्टी. मला माहीत आहे की साक्षरता हा काही एका पानात मांडून होणारा विषय नाही. पण तरीही मला याबद्दल विचार करताना प्रामुख्याने जाणवलेल्या गोष्टी तुमच्यासमोर मांडाव्याश्या वाटल्या. तुम्हाला काय वाटतं?