रविवार, २८ जून, २००९

'काळे स्पॉट्स'

२००८ मधे सुट्टीसाठी आम्ही माझ्या दीराकडे अमेरिकेला गेलो होतो। महिनाभरचा मुक्काम होता. एका वीकेंडला आम्ही न्यूयॉर्कला जाण्याचा बेत ठरवला. न्यूयॉर्कला गाडया एके ठिकाणी पार्क करून मनसोक्त हिंडायच ठरवलं. घरातून निघायच्या आधीच इंटरनेटवरून गाडी कुठे पार्क करायची वगैरे सर्व माहिती काढून ठेवली आणि ठरलेल्या दिवशी निघालो. न्यूयॉर्कला पोचलो आणि ठरलेल्या ठिकाणी गाड्या पार्क केल्या। दिवसभर हिंड हिंड हिंडलो. आणि परतीच्या वाटेला लागलो.

मी, माझी जाऊ आणि माझ्या सासूबाई एका गाडीत आणि आमचे better halves दुसर्‍या गाडीत असे बसलो होतो। गाडी पार्किंगमधून बाहेर काढताना माझी जाऊ आम्हाला म्हणाली, "हे बघा आपल्या गाडीवर काय आहे!" आम्ही दोघीही वाकून वाकून काय आहे ते बघायचा प्रयत्न करू लागलो. '२ काळे स्पॉट्स' आम्हाला गाडीच्या पुढच्या भागावर दिसले. काय असावं बरं हे? आम्ही विचार करू लागलो. घरातून निघालो तेव्हा गाडीवर असं काही पाहिल्याचं आम्हाला तिघिंनाही आठवत नव्हतं. तेव्हा आमची खात्री झाली कि गाडी जिथे पार्क करायला ठेवली होती तिथल्या लोकांचच हे काम असलं पाहिजे! आपल्याला ट्रॅक वगैरे तर करत नसतील? मनात नाही नाही त्या शंका येऊन गेल्या. बरं हया तिघांची गाडी आमच्या पुढे होती, त्यामुळे त्यांनाही विचारणं शक्य नव्हतं. शेवटी ठरवलं की जेवण्यासाठी गाडी थांबवली कि विचारायचं.

१-१:३० तासाने वाटेत आम्ही जेवण्यासाठी गाड्या थांबवल्या. पहिलं काय केलं तर आमच्या नवरोजींना हाका मारून आमच्या गाडीजवळ बोलावलं आणि ते 'काळे स्पॉट्स' दाखवले. "हे बघा ना आपल्या गाडीवर काय आहे?" आम्ही म्हटलं. "बघू काय आहे?" असं म्हणून तिघांनी गाडीकडे बघितलं आणि जे हसत सुटले, कि काही विचारू नका!! आम्हाला काहीच कळेना कि असे का हसत आहेत? आम्ही ते 'काळे स्पॉट्स' काय असतील याचा विचार करून करून थकलो होतो आणि हे तिघं आमच्याकडे बघून हसत होते. शेवटी न रहावून विचारलं, "आता हसणं थांबवा आणि सांगा एकदा हे काय आहे ते?" ज्या अर्थी हे हसत आहेत त्या अर्थी काहि विशेष नाही आणि आपली अक्कल निघणार आता हे कळून चुकलं होतं! शेवटी त्यांनी सस्पेन्स संपवला आणि म्हणाले, "गाडी पहिल्यांदा पाहिल्यासारख्या काय वागताय? वायपर वापरलाय का गाडीचा कधी? त्याच्यासाठी पाणी कुठून येतं? ते पाणी ह्या 'काळ्या स्पॉट्स' मधून येतं!!" हे ऐकून डोक्यात लख्खं प्रकाश पडला आणि आम्ही प्रदर्शित केलेल्या अज्ञानाचं हसू आलं. आणि त्याहीपेक्षा जास्त पश्चात्ताप झाला तो ते नवर्‍यासमोर केलं याचा! कारण त्यानंतर बायका आणि ड्रायव्हिंग यावरून किती चिडवा-चिडवी झाली हे वेगळं सांगायची गरज नाही!!!

गुरुवार, १८ जून, २००९

थांबावे कुठे???

टी-२० मधे भारताला इंग्लंडने हरवलं!! गेल्यावर्षीचा विश्वविजेता संघ उपांत्य फेरीपर्यंत देखील पोचला नाही! विविध माणसांच्या तर्‍हेतर्‍हेच्या प्रतिकिया कानावर पडू लागल्या आणि पुन्हा एकदा भारतीयांच्या क्रिकेटप्रेमाचे विचार माझ्या डोक्यात फेर धरू लागले।

आपली लोकं क्रिकेटसाठी एवढी वेडी आहेत हे बघून मला कधी कधी खूप आश्चर्य वाटतं। आपल्याकडे लोक क्रिकेटची मॅच अगदी तन-मन-धन अर्पून बघत असतात। तेंडुलकर, धोनी, युवराज यांची फलंदाजी तर लोकांच्या अधिकच जिव्हाळ्याची! हे खेळाडु नीट खेळले नाहीत तर लोक अगदी बेचैन होतात. आपण हरतोय असं वाटायला लागलं की देवाला नवस बोलणारीही कितीजणं असतात. काहीजणं मॅच संपेपर्यन्त देवाचं नाव घेत बसतात तर काहीजणं इतर काही अंधश्रद्धांचा आधार घेतात.

परवा एक माणूस रेडिओवर प्रतिक्रिया देत होता--आपण मॅच हरलो हे पाहून मला २ रात्री झोपच लागली नाही! मी मनात म्हटलं, की ही बोच जो संघ हरतो त्याला असायला हवी, हो कि नाही?? आपल्या देशात लोक क्रिकेटपटूंवर अतोनात प्रेम करतात। अगदी आपल्या सरकारने त्यातल्या दोघांना पद्मश्रीही बहाल केली होती, पण हा सन्मान स्वीकरायलाही त्यांना वेळ नव्हता!! असं असताना भारतीय लोक त्यांच्यासाठी एवढा जीव का टाकतात? विचार करण्यासारखी गोष्ट आहे.

एखादा खेळ किंवा खेळाडू आवडणं किंवा त्याचा फॅन असणं समजण्यासारखं आहे। पण ह्या आवडीचं रुपांतर वेडात झालेलं कितपत चांगलं?? या वेडात किती वहावत जावं याला काही सीमा?? आपल्याकडे क्रिकेट तर इतर काही देशांमधे फुटबॉल, हे खेळ, लोक जीवन-मरणाचा प्रश्न असल्यासारखे का बघत असतात? आपण मॅच हरलो की लोक एखाद्या खेळाडूचं घर जाळणे, त्याची मालमत्ता उद्ध्वस्त करणे असेही अनेक प्रकार करतात. वर्ल्डकप झाले की पेपरमधून बातम्या यायला सुरुवात होते-अमुक अमुक देशाचा पराभव पचवणे कठीण गेल्याने अमुक एका माणसाने आत्महत्त्या केली. मॅच कोण जिंकणार यावरून दोन मित्रांमधे वादावादी होऊन एकाने दुसर्‍याला सुर्‍याने भोसकले. या आणि अशा अनेक बातम्या आपण वाचतो.

हे सगळं बघून एकच विचार मनात येतो-आपलं आयुष्यं एवढं स्वस्तं आहे का कि एखादी मॅच हरलो म्हणून आपण त्याचा त्याग करावा? आपल्या आयुष्यात दुसरं काहीच लक्ष्यं नाही का कि फक्त एखद्या खेळामधली हार-जीत यावर आपल्या आयुष्याचा शेवट अवलंबून असावा?

आवड म्हणून विविध खेळ बघावेत, त्यांचा आनंद घ्यावा. त्यातल्या एखाद्या खेळात आपणही प्राविण्य मिळवावे. एखादा खेळाडू आपला 'रोल मॉडेल' सुद्धा असावा. त्यात काहीच गैर नाही. पण त्याला किती महत्त्व द्यावं, मानसिक रित्या त्यात किती गुंतावं हे ही आपलं आपण ठरवावं. थोडक्यात काय तर ' थांबावं कुठे?' याचा प्रत्येकाने आपल्या मनाशी विचार करावा!!!!

गुरुवार, ११ जून, २००९

अस्तित्व

अरे अजित, ये ना आत ये। आमच्या विनंतीला मान देऊन जेवायला आलात खूप बरं वाटलं. अगं क्षमा तू पण ये. खरंच अजित आला खूप बरं वाटलं. तुला वाटेल मी काय मगासपासून अजित, अजित लावलंय? अगं पण तो आला म्हणजे तू येणार हे ठरलेलंच! त्यामुळे तो येणं महत्त्वाचं! तो आहे म्हणून तुझ्या इथे असण्याला अर्थ आहे. हो की नाही?

आम्ही एके ठिकाणी जेवायला गेलो होतो तिथे कानावर पडलेला हा संवाद। त्यांच्या घरात पहिलं पाऊल ठेवल्यापासून ती मुलगी नुसती ऐकत होती आणि हसून (खोटं??) त्यांच्या हो ला हो म्हणत होती. तिला ते म्हणणं कितपत पटलं होतं हे माहीत नाही पण माझ्या मनात मात्र विचारांची मालिकाच सुरु झाली होती.

वाटलं, कधी बदलणार ही मानसिकता? बायकांनाच जोपर्यंत असं वाटतं की फक्तं नवर्‍यामुळेच आपल्या अस्तित्वाला अर्थ आहे तोपर्यंत असे संवाद सारखेच ऐकू येणार।माझ्या मनात आलं, का? नवर्‍यामुळेच फक्तं बायकोच्या आयुष्याला अर्थ असतो का? मी हे सत्य अजिबात नकारत नाही की नवरा-बायकोचं नातं हे एक अतिशय सुंदर नातं आहे. दोघांच्या एकमेकांवरच्या प्रेमामुळे, एकमेकांना समजून घेण्यामुळे दोघांचं आयुष्यं समॄद्धं होतं, अर्थपूर्ण होतं. पण फक्तं नवर्‍यामुळेच बायकोच्या अस्तित्वाला अर्था आहे या मताशी मात्र मी बिलकुल सहमत नाही.

लग्नं हा मुलगा-मुलगी दोघांच्याही आयुष्यातला एक महत्त्वाचा टप्पा। कारण दोघांचही आयुष्य त्यानंतर सर्वर्थाने बदलून जातं। पण मुलीला आपल्या आई-वडिलांचं घर आणि रोजच्या सवयीचं सारं काही सोडून जायचं असल्यामुळे तिच्या मनात धास्ती जरा जास्त असते. सासर अगदी पलीकडच्या गल्लीत असलं तरी एकदा का तुम्ही लग्नं होऊन दुसर्‍या घरी गेलात की सारं काही बदलतं. अशा परिस्थितीत नवीन घरात जुळवून घेऊन स्थिरवण्यासाठी सासू, सासरे, नवरा व घरातील इतर माणसांचा खूप मोठा सहभाग असतो. नवर्‍याचा सगळ्यात जास्त. त्यातून हे जर अरेंज्ड मॅरेज असेल तर मग आणखीनच! पण याचा अर्थ असा नाही की नवर्‍यामुळेच बायकोच्या अस्तित्वाला अर्थ असतो. तो ज्या गावी असेल तिथे तिला रहावं लागतं. तिथल्या परिस्थितीशी जुळवून घ्यावं लागतं. तो ज्या माणसांना आपलं मानत असेल त्यांना तिलाही आपलं मानून, त्यांच्यात मिसळावं लागतं. यात कुठे नवर्‍याचा मोठेपणा किंवा बायकोचा कमीपणा असतो असं म्हणणं चुकीचं आहे.

नवरा हा बायकोच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा, अतिशय महत्वाचा भाग असतो.पण एकमेव महत्त्वाचा? नक्कीच नाही!! कदाचित माझं हे विधान काही बायकांना पटणार नाही, उद्दामपणाचं वाटेल. पण माझी खात्री आहे की ज्या बायका आज घराबाहेर पडून काही करत आहेत, ज्यांच्या अनुभवांची आणि जाणिवांची क्षितिजं विस्तारलेली आहेत त्यांना ते नक्कीच पटेल।

हल्लीच्या मुली, मुलांच्या बरोबरीने शिकतात, अगदी परदेशी राहूनही उच्चशिक्षण घेतात। नोकर्‍या करतात, स्वत:चे व्यवसाय करतात. उच्चपदांवरही काम करतात. नवर्‍याच्या बरोबरीने अर्थार्जन करून संसाराला हातभार लावतात. लग्नानंतरही त्यांचा कल नोकरी आणि घर दोन्ही सांभाळण्याकडे असतो.नोकरी किंवा स्वतःचा व्यवसाय केल्याने साहजिकच मुलींचही स्वत:चं एक विश्व तयार झालेलं असतं. समाजात एक स्थान असतं. स्वतःची एक ओळख असते. हे स्थान किंवा ही ओळख त्यांनी स्वत:च्या कर्तॄत्वाने आणि मेहनतीने निर्माण केलेली असते. कोणाची बायको किंवा कोणाची मुलगी म्हणून नव्हे.असं असतानाही वरच्यासारखी विधानं ऐकू आली की मन अस्वस्थं होतं आणि बोलणार्‍या व्यक्तीचा राग न येता कीव येते.

आज आपण समाजात अशा कितीतरी विवाहीत स्त्रिया बघतो ज्यांनी आपल्या कर्तॄत्वाने सार्‍या जगाला आपली ओळख करून दिली आहे। किरण बेदी, चंदा कोचर, प्रतिभा पाटील, कल्पना चावला, शिखा शर्मा--या आणि अशा कितीतरी स्त्रिया स्वबळावर उच्च्पदांवर पोहोचल्या आहेत. मला सांगा, यातील एक तरी स्त्री अशी आहे का के जिच्या नवर्‍याची ओळख दिल्याशिवाय तिची ओळख आपल्याला पटणार नाही? मला इथे नवरा-बायकोमधील श्रेष्टत्वाचा वाद घालायचा नाही। दोघंही आपापल्या जागी महत्त्वपूर्ण भूमिका बजवतात. त्यामुळे, नवर्‍यामुळेच बायकोच्या अस्तित्वाला अर्थ आहे ही काही बायकांच्या मनातील समजूत अणि ती इतर बायकांच्या मनावर बिंबविण्याची त्यांची धडपड मला चुकीची वाटते.मी तर म्हणेन आजच्या प्रत्येक स्त्रीने स्वतःची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. लग्नाआधी कोणाची तरी मुलगी आणि लग्नानंतर कोणाचीतरी बायको एवढीच आपली ओळ्ख सीमीत न ठेवता स्वत:मधल्या कलागुणांना, हुशारीला वाव मिळेल असं काहीतरी केलं पाहीजे.मग ही ओळख निर्माण करण्यासाठी उच्चशिक्षितंच असलं पाहिजे किंवा नोकरीच केली पाहिजे असं काही नाही. आज अनेक क्षेत्रं बायकांसाठी खुली आहेत. अनेक संधी खुणावत आहेत. त्याचा फायदा घेतला पाहिजे.खरं तर आपल्या कामामुळे चार जणं आपल्याला ओळखतात ही भावनाच खूप समाधान आणि खूप काही करण्याचा भरपूर उत्साह देऊन जाणारी आहे.

मला खात्री आहे की आपल्या समजातले सुजाण नवरेही याबद्दल काहीच आक्षेप घेणार नाहीत। उलट आपली बायको फक्त चूल आणि मूल याच्यात अडकून न पडता आणखी काही करू पहात आहे याचा कुठल्या समजूतदार नवर्‍याला अभिमान असणार नाही? याचा शेवट करताना John Conrad यांचं एकच वाक्यं लिहावसं वाटतं आणि सार्‍या स्त्रियांना विचारावसं वाटतं, बघायचं हे अनुभवून?

"I don't like work---but I like what is in work---the chance to find yourself, your own reality--for yourself, not for others-which no other man can ever know."

बुधवार, १० जून, २००९

॥श्री गणेशा॥

आज माझ्या ब्लॉगचा मी शुभारंभ करतेय. खूप छान वाटतंय. मी कधी लिहीन वगैरे असं वाटलं नव्हतं. म्हणजे शाळेत असताना माझ्या निबंधांचं कौतुक व्हायचं किंवा एखाद्या कवितेचं रसग्रहण वगैरे बर्‍यापैकी जमायचं. पण परिक्षेची तयारी यापलीकडे जाऊन त्याचा कधी विचार केला नाही.
परंतु मध्यंतरी एक प्रसंग घडला ज्यामुळे डोक्यात अनेक विचारांची गर्दी झाली आणि शेवटी न रहावून ते सगळं कागदावर उतरवलं. सुरुवातीला ते माझ्यापुरतंच ठेवायचं ठरवलं होतं. पण जरा धीर करून नवर्‍याला, सासू-सासर्‍यांना दाखवलं आणि त्यांच्याकडून इतका छान प्रतिसाद मिळाला म्हणून सांगू! मग माझा उत्साह वाढला आणि आता जेव्हा जमेल तेव्हा व चांगला विषय सुचेल तेव्हा लिहायचं असं ठरवून टाकलं!
जेव्हा माझी आई, भाऊ आणि प्राजक्ता, माझी मैत्रीण यांनी तो लेख वाचला तेव्हा त्यांनी मला सुचवलं की तू ब्लॉग का लिहीत नाहीस? तुला जमेल. तोपर्यंत माझ्या डोक्यातही आलं नव्हतं की आपण ब्लॉग वगैरे सुरु करावा. पण मग सिरियस्ली विचार करु लागले आणि आज विचार पक्का झाल्यावर तुम्हा सगळ्यांसमोर माझे विचार या ब्लॉगच्या माध्यमातून मांडायचं ठरवलं.
शांत पाण्यात एखादा खडा टाकल्यावर कसे त्यावर तरंग उठतात, तसंच आपल्या विचारांच आहे असं मला वाटतं. म्हणून ब्लॉगचं नाव 'तरंग'. आपल्या आयुष्यात एखादा प्रसंग घडतो, जो आपल्याला विचार करायला उद्युक्त करतो. आपल्या मनात एकदा का विचार यायला लागले ना की ते वेड्यासारखं कुठेही धावू लागतं. कधी कधी हे विचार इतके अस्वस्थं करतात की ते नुसते आपल्यापुरते ठेवणं अशक्यं होतं. कुणाबरोबर तरी शेअर करावसं वाटतं. विचारांना वाट मोकळी करून द्यावीशी वाटते. म्हणून हा सगळा खटाटोप!
ज्या लेखामुळे मला हा ब्लॉग सुरु करण्यासाठी प्रोत्साहन मिळालं, तो लेख हे या ब्लॉगवरचं पुढचं पोस्ट असेल. आशा करते की तुम्हाला ते आवडेल.
आपलं सहकार्यं, प्रोत्साहन आणि प्रतिक्रियांच्या प्रतिक्षेत.............................
श्रेया बापट.