रविवार, २० डिसेंबर, २००९

साक्षर

मध्यंतरी 'निशाणी डावा अंगठा' हा चित्रपट बघितला. सरकारने चालू करण्यास सांगितलेले 'प्रौढ साक्षरता' अभियान धाब्यावर बसवून; साक्षरांनाच 'नवसाक्षर' म्हणून परीक्षेस बसवून; हे अभियान यशस्वीरित्या पूर्ण केल्याचे दाखवून, एक गाव प्रथम पारितोषिक कसे पटकावते त्याची ही कथा. हा चित्रपट पाहून झाल्यावर मनात एक प्रश्न रुंजी घालू लागला: साक्षर कोणाला म्हणावे?

ज्याला सही करता येते तो साक्षर, ज्याला लिहिता-वाचता येते तो साक्षर, जो दहावी-बारावी झालाय तो साक्षर की ज्याच्याकडे बी.ए., बी. कॉम, एम.बी.ए अशी एखादी डिग्री (किंवा डिग्र्या ) आहेत तो साक्षर? लौकिक अर्थाने बघायला गेलं तर ज्याला लिहिता वाचता येतं तो साक्षर. पण मग मनात आलं या एकविसाव्या शतकात, स्पर्धेच्या युगात फक्त लिहिता वाचता येणं हा एकच निकष साक्षर/निरक्षर भेद करण्यास पुरेसा ठरेल का? या प्रश्नाचं उत्तर शोधताना मला जाणवलं आजच्या काळात साक्षरतेसाठी एवढा एकच निकष पुरेसा नाही. साक्षरता बहुआयामी आहे. तिला विविध अंग आहेत, बाजू आहेत.
लिहिता-वाचता येणं अथवा आपल्या आवडत्या किंवा चरितार्थाला उपयोगी पडेल अशा विषयात प्राविण्य मिळवणं, हे त्यातील एक. हे सोडून आणखी काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला आल्या नाहीत तर कितीही पदव्या/पदविका आपल्या नावापुढे असल्या तरी बाहेरच्या जगात आपण 'बावळट' ठरतो किंवा बाहेरच्या जगात वावरण्यास कुठेतरी कमी पडतो. थोडक्यात काय तर अगदी अडाणी/निरक्षर ठरतो!

माझ्या दॄष्टीने आर्थिक साक्षरता ही त्यातली एक. रोजच्या जीवनातले पैशांचे व्यवहार करता येणं: बँकेतली छोटी-मोठी कामं करणं (चेक किंवा कॅश भरणे अथवा काढणे ई.); ए.टी.एम्/क्रेडिट कार्ड यांसारख्या सुविधा सफाईदारपणे वापरता येणं; आपण मिळवलेल्या पैशाचं योग्य पद्धतीनं नियोजन करता येणं; त्यासाठी गुंतवणुकीचे कोणकोणते पर्याय उपलब्ध आहेत हे माहीत असणं किंवा ते माहीत करून घेण्याची क्षमता आणि इच्छा असणं, या सगळ्या गोष्टींचा मी आर्थिक साक्षरतेत समावेश करेन. या गोष्टी आज प्रत्येक व्यक्तीला येणं गरजेचं आहे. मग ती नोकरदार व्यक्ती असो, गॄहिणी असो किंवा एखादा विद्यार्थी असो. आज अशी अनेक माणसं आजूबाजूला दिसतात ज्यांना या गोष्टी करता येत नाहीत. ज्यांच्यावर या गोष्टी करण्याची कधी वेळच आलेली नाही किंवा घरातला कर्ता पुरुष या गोष्टींची काळजी घेतोय तर मी कशाला त्यात लक्षं घालू? अशी काहीशी त्यांची भूमिका आहे. पण शेवटी एक विचार सारखा मनात येतो कि या काही फार अवघड गोष्टी नाहीत आणि त्यांचा संबंध आपल्याशी कधीही येवू शकतो. तर मग त्यांची माहीती करून घेण्यात का टाळाटाळ?

आम्ही लहान असताना, म्हणजे साधारण सहावी-सातवीत, आमची आई आम्हाला एखादा चेक भरायला बँकेत पाठवत असे. स्लिप वगैरे ती भरून देत असे. नुसता चेक काऊंटर वर जाऊन भरायचा. एवढंच काय, आम्ही आई बरोबर बरेचदा ए.टी.एम मधेही जायचो. तेव्हा ते कार्ड मशिनमधे सरकवून पैसे काढण्याची मजा वाटत असे. कदाचित पुढल्या खेपेस आई तिचा पिन नंबर बदलतही असेल! पण अशा पद्धतीने आम्ही हळूहळू ही साधनं कधी वापरायला शिकलो आम्हाला कळलही नाही! आम्हा भावंडांच्या १८ व्या वाढदिवसाचं बक्षिस होतं आमच्या नावावर बँक अकांऊंट. केवढं अप्रूप वाटलं होतं तेव्हा. पैसे काही फार नसायचे त्यात पण तो आपण स्वतः ऑपरेट करायचा हेच खूप काही शिकवून जाणार होतं. मला आठवतंय माझ्यासाठी जेव्हा स्थळं बघत होते तेव्हा मर्चंट नेव्ही मधल्या एका मुलाचं स्थळ आलं होतं. त्या मुलाच्या आईनं आम्हाला सांगितलं होतं, तुमच्या मुलीचं शिक्षण वगैरे ठीक
आहे. पण आमचा मुलगा वर्षातील सहा महीने बोटीवर असतो. तो इथे नसताना तुमच्या मुलीला सर्व आर्थिक व्यवहार करता आले पाहीजेत! थोडक्यात सांगण्याचा मुद्दा काय तर आज औपचारिक शिक्षणाबरोबरच आर्थिक शिक्षणही तितकंच महत्त्वाचं आहे आणि आई-वडिलांनी मुलांवर विश्वास दाखवल्याशिवाय, त्यांना प्रोत्साहन दिल्याशिवाय ते मिळणं शक्यं नाही. अर्थात कुठल्याही व्यक्तीने या गोष्टींच महत्त्व ओळखणं आणि शिकण्याची इच्छा दाखवणं हे ही तितकंच महत्त्वाचं!

माझ्या दॄष्टीने दुसरी महत्त्वाची गोष्टं म्हणजे 'संगणक साक्षरता' किंवा 'computer literacy'. आजच्या युगात, या 'paperless office' च्या जमान्यात, संगणक तुमचा दोस्त नसेल तर तुमचं कठीण आहे! म्हणजे अगदी संगणकाच्या लँग्वेजेस किंवा ओरॅकल सारख्या गोष्टी म्हणत नाही मी पण कमीत कमी 'word', 'excel' ,'power point', 'internet' या गोष्टी तरी वापरता यायला हव्यात. ती आजच्या काळाची गरज आहे. या बाबतीत मात्र लहान मुलं आपल्या आई-वडिलांपेक्षा अधिक स्मार्ट असलेली बघायला मिळतात! ऑफिसमधेही मी बरेच वेळा अनुभव घेतलाय. अगदी मॅनेजर लेव्हलचा माणूस, पण excel मधला एखादा फॉर्म्युला किंवा power point वापरायची वेळ आली कि हैराण होतो. मग एखाद्या सेक्रेटरीने power point मधे एखादं प्रेझेंटेशन करून दिलं कि त्याला ती सेक्रेटरी काही क्षणांपुरती का होईना पण ग्रेट वाटून जाते!!

तर अशा तर्‍हेने औपचारिक शिक्षणा व्यतिरिक्त मला महत्त्वाच्या वाटणार्‍या या गोष्टी. मला माहीत आहे की साक्षरता हा काही एका पानात मांडून होणारा विषय नाही. पण तरीही मला याबद्दल विचार करताना प्रामुख्याने जाणवलेल्या गोष्टी तुमच्यासमोर मांडाव्याश्या वाटल्या. तुम्हाला काय वाटतं?

रविवार, २९ नोव्हेंबर, २००९

पणजी

'माई', माझी पणजी. म्हणजे बाबांची आजी, त्यांच्या वडिलांची आई.

लहानपणापासूनच माझ्या मनात तिची काही फार चांगली प्रतिमा नव्हती. शेवटच्या दिवसांत अंथरुणाला खिळलेली. माझे आई, बाबा, आजी, आत्त्या सगळ्यांना तिचं करावं लागे. सगळ्यांशी सतत तिचे वाद होत. मी तिची फारशी आवडती नव्हते. कारण तिला मुळात मुलीच विशेष आवडायच्या नाहीत. कदाचित 'स्त्री' म्हणून आयुष्यात तिने जे भोगलं त्याचा परिणाम असेल!

या सगळ्यामुळे माझ्या मनात 'पणजीला मी आवडत नाही' आणि 'तिच्यामुळे घरातल्या सगळ्यांना त्रास होतो' ह्याच दोन गोष्टी घर करून बसलेल्या! तिच्या पुर्वायुष्याबद्दल आई-आजीकडून बरंच काही ऐकलेलं. पण ते लक्षात घेऊन त्यावर विचार करून तिची बाजू समजून घेण्याचं माझं तेव्हा वय नव्हतं.

मी ९-१० वर्षांची असताना ती गेली, ८२-८३ वर्षांची होऊन. म्हणजे साधारण १९९२ साली. त्यानंतर इतक्या वर्षांनी परवा मला तिची प्रकर्षाने आठवण झाली. निमित्त होतं 'लोकसत्ता' मधील एक सदर! नवर्‍याने टकलेल्या किंवा त्याच्या मॄत्युपश्चात चरितार्थ चालविण्यासाठी घराबहेरपडून धडपड केलेल्या आणि हे करतानाच नावारूपाला आलेल्या काही स्त्रियांच्या आत्मचरित्राची ओळख करून देणारं हे सदर. दर शनिवारी 'चतुरंग' मधे न चुकता वाचते. पण एका शनिवारी मात्र ते वाचताना माझी पणजी डोळ्यासमोर उभी राहिली. वाटलं, आपण जे तिच्याबद्दल ऐकलंय ते फार काही वेगळं नाही! पण फरक इतकाच की ती प्रसिद्धीच्या झोतात आली नाही आणि लोकांच्या कौतुकाचा विषय ठरली नाही. उलट टीकेलाच सामोरी गेली............

१९१०-११ सालचा जन्म असवा तिचा. त्या काळी मुलगी होणं हीच मुळात आनंदाची बाब नव्हती. त्यातून ही दिसायला बेताची आणि काळी. म्हणजे दुष्काळात तेरावा महीना! हिचं लग्नं कस होणार ही घरच्यांना काळजी. म्हणून बिजवराशी लग्नं लावलं; म्हणजे माझ्या पणजोबांशी. दोघांमधे जवळ जवळ २० वर्षांचं अंतर. पण ते नाटककंपनीवाले आणि त्यातून विधुर आणि ही काळी आणि दिसायला बेताची. असा योग (?) जुळून आला आणि त्यांचं लग्नं झालं. १२-१३ वर्षांची असेल माझी पणजी तेव्हा. लग्नं आणि नवरा म्हणजे काय हे ही न कळण्याच्या वयाची. नवरा जवळ आला तरी भीती वाटत असे म्हणायची!!

तर असा तिचा संसार सुरु झाला. घरात खायला-प्यायला काही कमी नव्हतं. नाटककंपनीही छान चालू होती. पणजोबाही कष्टाळू होते. याच दरम्यान माझ्या आजोबांचा जन्म झाला आणि ते जेमतेम ८-१० वर्षांचे असताना माझे पणजोबा गेले......पणजी तेव्हा जेमतेम २४-२५ वर्षांची असेल. हल्ली ज्या वयात मुलींची लग्नं होतात, त्या भावी आयुष्याची स्वप्नं रंगवतात, त्या वयात ती विधवा झाली आणि पदरात एक लहान मूल!

चुलत्यांनी तिला नेसत्या वस्त्रानिशी बाहेर काढलं. हातावर एक छदामही न ठेवता.....काय अवस्था झाली असेल तिची तेव्हा? पण ती डगमगली नाही. माझ्या आजोबांना दूरच्या एका नातेवाईकाकडे ठेवून तिने नर्सिंगचा कोर्स पूर्ण केला आणि एका हॉस्पिटलमधे नोकरी मिळाली. चरितार्थाचा प्रश्न सुटला!

पण तिच्या आयुष्याचं काय झालं? तिला आयुष्यात तसं काहीच सुख मिळालं नाही, पण तिच्याकडे धडाडी होती. ती एकटी जवळ-जवळ अख्खा भारत फिरली. अगदी अमरनाथ यात्रा सुद्धा केली तिने. त्या काळी बेलबॉटमची फॅशन होती. तिने ती घालूनही एक फोटो काढून घेतला होता म्हणे! एकटी हॉटेलमधे सुद्धा जात असे ती.

आमच्या काही नातेवाईकांना, आजूबाजूच्या लोकांना तिचं हे वागणं असभ्य, बेलगाम वाटायचं. तिच्याबद्दल कोणी कधी फारसं चांगलं बोलल्याचं मला आठवत नाही. कदाचित`'विधवा' स्त्री ही सुद्धा एक माणूस आहे, तिलाही तिच्या भावभावना आहेत हे त्यांना मान्यच नसावं. किंवा मान्य असलं तरी फक्त 'विधवा' म्हणून तिने स्वतःला सर्व बंधनांत अडकवून घेऊन एक चाकोरीबद्धं आयुष्यं जगावं ही त्यांची मानसिकता असावी.

पण या सगळ्याचा आता तिच्या बाजूने विचार केला तर वाटत की तिचं नक्की काय चुकलं??

वयाच्या २४-२५व्या वर्षी नवरा गेला ही तिची चूक होती? नातेवाईकांनी आधार द्यायचा सोडून बेघर केलं ही तिची चूक होती? मग त्यांना तिच्यावर टीका करायचा काय अधिकार?

तिला तिच्या इच्छा, आकांक्षा, भावना काहीच नसतील का? त्या तिला पूर्ण कराव्याश्या वाटल्या तर काय बिघडलं? तिला फिरायला चल म्हणणारं कोण होतं? किंवा तिची आवड लक्षात घेऊन कोण काही आणून देणार होतं?

त्या काळी बायकांनी दुसरं लग्नं करणंही सोपं नव्हतं आणि केलं तरी आपल्या मुलाला तिथे स्विकारतील की नाही, नीट वागवतील की नाही ही दुसरी चिंता!

असं सगळं असतानाही ती खंबीरपणे उभी राहीली. रडत न बसता परिस्थितीतून मार्ग काढला. 'लोक काय म्हणतील?' हा विचार तिने कधीच केला नाही. कारण लोक एकवेळ मदतीला पुढे येणार नाहीत पण टीका करण्यात मात्र अजिबात मागे राहणार नाहीत हे तिला कधीच उमगलं असावं......

अशी माझी पणजी अतिशय स्वावलंबी होती. रिटायर्ड झाल्यानंतरही कोणी आजारी असेल तर इंजेक्शन वगैरे द्यायला ती जात असे. अगदी अंथरूणाला खिळेपर्यंत स्वतःची सगळी कामं स्वत: करत असे. आयुष्यात एवढे वाईट दिवस बघूनही तिच्याकडे सकारात्मक दॄष्टीकोन होता. माझ्या भावाला खेळवताना म्हणे ती म्हणायची, माझा मुलगा मॅट्रिक झाला, नातू इंजिनिअर झाला, पणतू आणखी शिकेल.....खूप मोठा होइल.......

आता या सगळ्याचा विचार केला॑ की तिचं खूप कौतुक वाटतं आणि तिच्या खंबीरपणाला, धडाडीला दाद द्यावीशी वाटते.

रडत न बसता आणि कोणाच्या मदतीची अपेक्षा न करता तिने परिस्थितीशी सामना केला. आपलं आयुष्यं मार्गी लावलं. कुठून आलं असेल हे बळ तिच्यात? खरंच आश्चर्यं वाटतं. आणि मनोमन कबूल केलं जातं की भले तिने काही समाजकार्य केलेलं नसूदे, प्रसिद्धीच्या झोतात आलेली नसूदे परंतु तिला प्रतिकूल अशा या समाजात, खंबीरपणे उभं राहून तिने तिच्या आयुष्याचा प्रश्नं सोडवला होता. हे ही काही कमी नव्हतं!!

रविवार, २२ नोव्हेंबर, २००९

John, Dog, Dog............?

"John, Dog, Dog.....", फोनवर बोलता बोलता मी जरा वरच्याच पट्टीत म्हणाले. माझ्या केबिनचं दार उघडंच असल्याने, बाहेरच्या क्युबिकलमधे बसलेल्या माझ्या कलीगला माझा आवाज अगदी सहज ऐकू गेला. मी फोन ठेवण्याचीच जणू काही ती वाट बघत होती. ती पोट धरून खो-खो हसू लागली। मला कळेना, आत्तापर्यंत ही बरी होती, हिला अचानक झालं तरी काय? मी तिला खुणेनेच विचारलं, "काय झालं? एवढी फिदी, फिदी का हसते आहेस?"
हसणं थांबवून माझ्याजवळ येत ती म्हणाली, "कोण आहे हा जॉन? त्याला शिव्या का देत होतीस?" खरं तर तिला माहीत होतं मी कोणाला फोन केला होता आणि माझं काय काम होतं। पण माझ्याही लक्षात आलं की आपण काहीतरी मूर्खासारखं बोललेलं आहोत आणि या बाईसाहेब आपली फिरकी घेतल्याशिवाय रहाणार नाहीत.
खरंतर थोडेच दिवसात मी annual leave वर जाणार होते आणि बहारीन-मुंबई फ्लाईट बुकिंगच्या संदर्भात ट्रॅव्हल एजंटला मी फोन लावला होता। माझ्या तिकिटाची व्हॅलिडिटी मला वाढवून घ्यायची होती। 'JDDARY' असा काहीसा माझा PNR नंबर होता आणि ३-४ वेळा सांगूनही, बुकिंग करणार्‍या मुलीला तो काही ऐकू जात नव्हता. JDD च्या पुढे आमची गाडी सरकतच नव्हती. डी च्या ऐवजी सारखं तिला बी ऐकू जात होतं. शेवटी मी अक्षर कळावं म्हणून शब्दांचा आधार घेतला आणि "John, Dog, Dog......" असं जरा वरच्या पट्टीत बोलले. माझं काम एकदाचं झालं. पण त्यातून एवढं हसण्यासारखं काय घडलं मला काही सुधरेना.
माझ्या कलीगने मग खुलासा केला की जॉन हे त्या ट्रॅव्हल एजन्सीच्या मॅनेजरचं नाव होतं। मी कपाळावर हात मारून घेतला. आता मला काय स्वप्नं पडलं होतं हे माहीत असायला?? माझी कलीग आमच्या CFO ची PA असल्यामुळे आणि तो बरेचदा विमान प्रवास करत असल्याने तिला वरचेवर तिकिट बुकिंग करावं लागतं. त्यामुळे तिला या ट्रॅव्हल एजन्सी मधले लोक चांगलेच माहीत होते. त्यामुळे माझे शब्द ऐकून तिला हसू आवरेना.मग ती मला म्हणाली, "अगं, प्रत्येक गोष्टीचे काही संकेत असतात. तसे तिकिट बुक करतानाही असतात." मी म्हटलं, "तिकिट बुक करताना कसले आलेत संकेत? तिला अक्षरं कळत नव्हती, ती कळावीत म्हणून मी शब्दं वापरले! आता ह्यात काय चुकलं?" ती मला म्हणाली, "अगं, ही अक्षरं ने कळणं हे अगदी कॉमन आहे आणि त्यासाठी शब्दं वापरणं हे सुद्धा. म्हणूनच यासाठी कुठले शब्द वापरावेत याचे काही संकेत आहेत." असं म्हणून तिच्याकडे असलेली एक लिस्ट तिने मला दिली. आणि म्हणाली, "ही लिस्ट तुझ्याकडे ठेव आणि इथून पुढे कधी तुला बुकींग करायची वेळ आली तर ती वापर." बरं म्हणून ती मी माझ्याकडे ठेवली.
माझ्या मनात आलं खरंच, प्रत्येक वेळी कसं बोलावं, काय बोलावं, काय बोलू नये या सगळ्या गोष्टींचे काही नियम असतात. आणि ते जर आपल्याला माहीत नसतील तर माझ्या बाबतीत घडला तसे प्रसंग घडू शकतात. माझ्यासारखी बाकी कोणाची फजिती होऊ नये म्हणून ती लिस्ट तुम्हा सर्वांसाठी इथे देत आहे. बघा कधी उपयोगी पडली तर...................

A-Alpha B-Bravo C-Chairs D-Delta E-Echo F-Fox G-Gulf H-Hotel I-India J-Juliet K-King L-Lima M-Mother N-November O-Oscar P-Papa Q-Queen R-Rameo S-Sugar T-Tango U-Uniform V-Victory W-Wisky X-X-Ray Y-Young Z-Zoo

गुरुवार, १९ नोव्हेंबर, २००९

कहानी गुडिया की........

गुडिया..... एका सामान्य मुस्लिम कुटुंबातील सामान्य मुलगी. अगदी चारचौघींसारखी.....२०-२२ वर्षांची. भावी आयुष्याची स्वप्नं रंगविणारी.........तिचं लग्नं होतं सैन्यातील एका जवानाशी. मोठा दीर, जाऊ, सासू असं तिचं छान, सुखी कुटुंब असतं. लग्नानंतर जेमतेम १५-२० दिवसांत तिच्या नवर्‍याला सीमेवर रुजू होण्यासाठी बोलावलं जातं, युद्धाला तोंड फुटलेलं असतं.....तिचा निरोप घेऊन आणि लवकर परतण्याचं वचन देऊन नवरा जातो आणि........... आणि गुडियाचं आयुष्यं एक वेगळीच कलाटणी घेतं...... युद्धाच्या बातम्या रोज येत असतात. नवर्‍याची हाल हवाल तिला कळत असते. पण एक दिवस..........एक दिवस त्याची खबर येणं बंद होतं. त्याचा पत्ता काय... जिवंत आहे की मेला...काही कळेनासं होतं...आणि एक दिवस तो बेपत्ता असल्याचं सैन्यातून कळतं. गुडियाचं चित्तं थार्‍यावर रहात नाही.. पण गुडियाला आशा असते की तिचा नवरा आज ना उद्या नक्की सापडेल......पोलिस, सैन्यातील वेगवेगळे अधिकारी यांच्या ऑफिसचे खेटे घालणं सतत चालू असतं. पण कुठूनच तिच्या नवर्‍याचा काहीच पत्ता लागत नाही. असं करता करता ४ वर्ष जातात........तिचे आई-वडील आणि इतर नातेवाईक तिला दुसर्‍या लग्नासाठी सुचवू लगतात. पण तिचं मन तयार नसतं. पण शेवटी सगळ्यांचं ऐकून ती दुसर्‍या लग्नाला तयार होते. दुसरा संसार थाटते. त्यात रमते. घरातल्या सगळ्यांना आपलसं करते. थोडेच दिवसात ती आई होणार असल्याची चाहूल तिला लागते....पण नियतीला तिचं सुख मान्यं नसतं..... आत्ता कुठे खरर्‍या अर्थाने तिच्या आयुष्याची सुरुवात होत असते आणि तेव्हाच बातमी येते की तिचा आधीचा नवरा जिवंत आहे. त्याला युद्धकैदी म्हणून पकडलेलं असतं आणि ४ वर्षांनंतर पाकिस्तान सरकार त्याची सुटका करणार असतं......गुडीयाची मोठी विचित्र अवस्था होते. हसावं की रडावं तिला कळेनासं होतं. तिलाच काय तिच्या सासरच्या आणि माहेरच्या सगळ्यांपुढेच मोठं प्रश्नचिन्हं उभं राहतं. आता पुढे काय? आणि एक दिवस तिचा नवरा घरी परत येतो. गुडीयाच्या नावाने हाका मारून घरभर शोधू लागतो.. तो बेपत्ता झाल्याच्या धक्क्याने त्याच्या वॄद्ध आईचा मृत्यु झाला आणि बरेच दिवस त्याची वाट बघून गुडियाने दुसरं लग्नं केलं हे ऐकून त्याला धक्का बसतो. काहीही झालं तरी गुडियाला परत घेऊन येण्याचा तो चंग बांधतो. त्याचा भाऊ, वहिनी त्याला खूप समजावतात. तिचा सुखी संसार उद्ध्वस्त न करण्याची विनंती करतात. पण कशाचा काहीही परिणाम होत नाही.गावातले मुल्ला मौलवी यांची एक समिती नेमली जाते. कुठलाही निर्णय होई पर्यंत गुडियाला तिच्या आई-वडिलांकडे परत पाठवले जाते. आणि शेवटी तिने आपल्या पहिल्या नवर्‍याकडे परत जावे असा निर्णय दिला जातो. तेच धर्माला धरून असल्याचं सांगितलं जातं. गुडियाच्या मताला काडीइतकीही किंमत नसते. किंबहुना तिला ते कोणी विचारतच नाही. आणि शेवटी तिला हा निर्णय मान्य करावा लागतो. आपल्या मुलाला घेऊन ती आपल्या पहिल्या नवर्‍याकडे परत जाते. पण कशातच लक्षं लागत नसतं.या सगळ्याचा तिच्यावर मानसिक आणि शारिरीकही विपरीत परिणाम होतो. आणि एक दिवस आपल्या लहान मुलाला मागे ठेऊन ती य जगाचा निरोप घेते..... त्या मुलाला सांभाळण्याचा मोठेपणाही तिचा पहिला नवरा दाखवत नाही. आणि त्याच्या पालन-पोषणाची जबाबदारी गुडियाच्या म्हातार्‍या आई-वडिलांवर येते.यथावकाश तिचे दोन्ही नवरे दुसरी लग्नं करतात आणि आपापले संसार परत थाटतात.................गुडिया मात्रं धड कुठलंच सुख न उपभोगता समाजातल्या पुरुषी वर्चस्वाला आणि विचित्र रुढींना बळी पडते.............ही गोष्ट आहे 'कहानी गुडिया की......' या हिंदी चित्रपटाची. स्त्रीला एक माणूस म्हणून वागवण्याची, तिचं मन जाणून घेण्याची अजूनही या समाजातील काही जणांना गरज वाटत नाही हे हा चित्रपट बघून प्रकर्षाने जाणवतं.हा काही फार बिग बजेट चित्रपट वगैरे नाही किंवा फार मोठया कलाकारांना वगैरे घेऊन केलेलाही नाही. पण एका सत्यघटनेवर आधारित आहे. कुठे मिळाला तर जरूर बघा. फक्त गुडियाची गोष्ट जाणून घेण्यासाठी....................

रविवार, १३ सप्टेंबर, २००९

Vegas, Vegas………………भाग २

सुरुवतीला आम्ही स्वतःवर नियंत्रण ठेवलं तरी वेगासला आलो आणि gambling नाही केलं तर काय मजा? म्हणून शेवट्चे २ दिवस खास त्यासाठी राखून ठेवले होते.


कधीही कुठल्याही हॉटेलचा casino बघा, रिकामा म्हणून दिसणार नाही! तरुणांना लाजवतील अशा उत्साहाने अनेक म्हातारी मंडळी आपल्या आयुष्यभराची कमाई अगदी खुशाल या casino मधे उडवत असतात. असं वाटतं की ही मंडळी बहुधा फक्तं 'casino' साठीच इथे येतात. आजी-आजोबांच्या अनेक जोडया इथे पहायला मिळतात आणि त्यांचा ओसंडून जाणारा उत्साह बघून आपल्याला लाज वाटते. ९-१० वाजता brunch करायचा आणि casino मधल्या खुर्च्यांवर जे स्थानापन्न व्हायचं ते उठायचं नावच घ्यायचं नाही. एका हातात सिगरेट किंवा बिअर (किंवा दोन्ही!!) आणि एका हाताने खेळणं चालू.........



आम्ही जेव्हा casino मधे पहिलं पाऊल टाकलं तेव्हा एका वेगळ्याच दुनियेत प्रवेश करतोय असं वाटलं. सुरुवात केली ती 'slot machine' पासून. अगदी १ सेंट पसून ते २०-२५ डॉलर्सपर्यंतची मशिन्स. तुम्हाला पाहिजे त्या किंमतीची बेट लावा! आम्ही सगळ्यात कमी बेटच्या मशिन्सवर बसलो-१ सेंट....... आणि १ डॉलरची नोट आत सरकवली. आयुष्यात पहिल्यांदा 'जुगार' खेळत होतो. साहजिकच थोडी अपराधीपणाची भावना मनात होती पण खूपशी excitement सुद्धा होती!!



त्या मशिनचा खटका दाबल्यावर ५ चेरीज किंवा ५ डायमंड्स एका ओळीत आले आणि आपल्या एका डॉलरचे २ झाले की असा काही आनंद होतो म्हणून सांगू..... पण हाच आनंद पुढे महागात पडतो। कारण एकाचे दोन आणि दोनाचे चार डॉलर्स होतील या अपेक्षेने आपण खेळत राहतो आणि या चढत्या भाजणीची उतरती भाजणी कधी होते ते आपल्यालाच कळत नाही आणि शेवटी आपल्या हातात काहीच रहात नाही.



ही slot machines सोडून आणखी अनेक प्रलोभनं या casino मधे आपल्याला दिसतात.
Roulette-एक फिरणार चक्र आणि त्याच्यावर फिरणारी एक गोटी. बाजूने कोंडाळं करून अनेक लोकं उभी असतात आणि आपल्या बेट्स लावत असतात. हिंदी चित्रपटात खूपदा दिसतं हे दॄष्य.



त्याशिवाय ‘black jack’. याची सुद्धा अनेक टेबल्स मांडलेली असतात-वेगवेगळ्या बेट्सची. अगदी ५ डॉलर्सपासून ५०० डॉलर्स पर्यंत. मिचमिच्या डोळ्यांची चायनीज लोकं या टेबलचे होस्ट्स असतात आणि नुसते तुम्ही बाजूने गेलात तरी येणार का खेळायला म्हणून विचारतात. आम्ही लास वेगसला जाणार हे नक्की झाल्यावर माझ्या दीराने आम्हाला 'casino' मधे जाण्यासाठी 'qualified' करण्याचा चंगच बांधला आणि ब्लॅक जॅक कसा खेळायचा हे अगदी छान शिकवलं. त्यामुळे साहजिकच 'ब्लॅक जॅकची' ती टेबल्स बघून आपलं ज्ञान आजमावण्याचा मोह आम्हाला आवरला नाही. नेहमीप्रमाणे कमीत कमी बेटचं टेबल बघून आम्ही बसलो. आणि पहिल्याच खेपेत माझ्या नवर्‍याचे ५० चे १०० डॉलर्स झाले. आम्ही खेळ तिथेच आटोपला. पण दुसर्‍या खेपेस मात्र आधीच्या खेळातला नफा आणि दुसर्‍या वेळ्च्या मुद्दलातलाही काही भाग गमावलाच आम्ही!



Roulette आणि black jack खेरीज Keno म्हणजे साधारण आपल्या हौजीसारखा खेळ, पोकर असे गँब्लिंगचे विविध प्रकार आपल्याला इथे पहायला मिळतात. कुठल्या माणसाला गँब्लिंगचं कुठलं रूप आपलं नशीब आजमावण्याचा मोह पाडेल सांगता येत नाही. casino च्य या मायनगरीत शिरलेल्यांना दिवस्-रात्रीचंही भान नसतं. किंबहुना या कासिनोस ची रचनाच अशी केलेली असते की बाहेरच्या जगाशी तुमचा काही संपर्क राहू नये. पण शेवटी आपलं स्वतःवरचं नियंत्रण हेच महत्त्वाचं.



तर अशा या मायानगरीतील ५-६ दिवसांचं आमचं वास्तव्यं आटोपलं आणि लक्ष्मीच्या एका वेगळ्याच रुपाचा वरदहस्त असलेल्या शहराचा आम्ही निरोप घेतला. आज आमच्या 'वेगास' भेटीला एक वर्ष उलटून गेलं तरी त्या आठवणी मात्र अजूनही ताज्या आहेत. किंबहुना त्या सदैव, तशाच ताज्या रहाव्यात यासाठीच त्यांना शब्दांत अडकविण्याचा हा खटाटोप!!

Vegas, Vegas.....................भाग १

Las Vegas...............पैशांचं शहर, मौजमजेचं शहर, काही बेकायदा गोष्टी कायदेशीर रित्या, उजळ माथ्याने करण्याचं शहर!

'जीवची मुंबई करणे' म्हणजे काय एवढंच महीत असलेली मी गेल्यावर्षी जीवाचं 'लास वेगास' कसं करतात तेही अनुभवून आले. तिथला विमानतळंच खुद्द वेगासमधे शिरल्यावर आपल्याला काय काय दिसणार आहे याची चुणुक दाखवतो. 'Curtain raiser' च म्हणाना! विमानतळावरच आपल्याला 'slot machines' दिसायला सुरुवात होते आणि त्यांचे टंग, टंग,टंग, आवाज पुढच्या तुमच्या संपूर्ण वास्तव्यात तुमची साथ करणार आहेत हे कळून चुकतं.

तर अशा या 'नावाजलेल्या' शहराचा अनुभव घेण्यासाठी आम्ही वेगासमधे दाखल झालो। Rhode Iland, म्हणजे अमेरिकेचा ईस्ट कोस्ट, जे आमच्या अमेरिकेतील मुक्कामाचं मुख्यं ठिकाण होतं, तिथून जवळ जवळ ६-७ तासांचा प्रवास करून आम्ही वेगास मधे पोचलो. Rhode Iland जितकं निसर्गसौंदर्याने नटलेलं तितकंच वेगास रुक्षं आणि रखरखीत! हॉटेलचीच बस आम्हाला एअरपोर्टवरून पिक्-अप करायला आली आणि १५-२० मिनिटांत आम्ही हॉटेलमधे पोचलो. दिवसभरच्या प्रवासाचा थकवा आणि उकाडा यामुळे हैराण झालेले आम्ही कधी एकदा चेक्-इन करतोय असं झालं होतं. पण कसचं काय, चेक्-इन साठी ही भली मोठी रांग..... त्या रांगेत उभं असतानाच आजूबाजूचं निरीक्षण चालू होतं. आमच्या हॉटेलमधे एक मोठा 'casino' होता आणि slot machines चा अखंड आवाज चालू होता. लहानांपासून वयोवॄद्धांपर्यंत सर्व वयाचे आणि नानाविधप्रकारचे लोक दॄष्टीस पडत होते. शेवटी एकदाचं चेक्-इन झालं आणि आम्ही आमच्या रूममधे जाऊन पोचलो. संध्याकाळचा साधारण ६-६:३० चा सुमार असेल. रूममधे जाऊन थोडे फ्रेश झालो आणि 'वेगास'ची तोंड ओळख कऊन घ्यावी म्हणून बाहेर पडलो.दिव्यांच्या झगमगाटात उजळून निघालेलं रात्रीचं वेगास बघून डोळे दिपून गेले. आपल्याकडे दिवाळीत जसे रस्ते कंदील आणि दिव्यांच्या माळांनी झगमगत असतात? अगदी त्याचीच आठवण झाली. त्या दिवशी आम्ही साधारण कुठे काय आहे याचा अंदाज घेण्यासाठी एक फेरफटका मारून परत फिरलो आणि दुसर्‍या दिवशी नव्या दमाने बाहेर पडायचं ठरवलं.

दुसर्‍या दिवशी सकाळी मस्तपैकी 'continental breakfast' चा आस्वाद घेतला. ब्रेकफास्टसाठी एवढे पदार्थ समोर ठेवलेले होते की ते पाहूनच अर्धं पोट भरलं आणि काय खाऊ नि काय नको अशी अवस्था झाली! इथे येणारी बहुतेक माणसं 'Brunch' (म्हणजे Breakfast+lunch) करूनच बाहेर पडतात। सकाळी जरा उशीराने, ९:३०-१० वाजता एवढा हेवी ब्रेकफास्ट करायचा की दुपारच्या जेवणाची गरजच भासता कामा नये। आम्हीही तिथे असताना तसंच करायचो (आणि शिवाय एकेक सफरचंद किंवा केळं आमच्या पर्समधे टाकायचो. न जाणो मधे चुकून-माकून भूक लागली तर!!)

वेगासमधे जे जे काही बघण्यासारखं आणि अनुभवण्यासारखं आहे ते सगळं आहे 'Vegas Strip' वर. ही strip म्हणजे एकच लांबच लांब रस्ता-- जवळ जवळ ६-६:३० किलोमीटर लांबीचा। रस्त्याच्या दोन्ही बाजूला अवाढव्य हॉटेल्स! इथे बहुतेक सर्व हॉटेल्सची वेगास स्ट्रीप वर सोडणारी शटल सर्व्हीस असते। स्ट्रीपच्या कुठल्याही एका टोकाला आपल्याला ते सोडतात. तिथून चालत अख्खी स्ट्रीप भटकायची आणि रात्री परत स्ट्रीपच्या कुठल्याही एका टोकाला येऊन थांबायचं जेणेकरून हॉटेलच्याच शट्लने आपल्याला परत जाता येईल.

इथलं प्रत्येक हॉटेल प्रचंड आणि स्वत:चं एक वैशिष्टयं असलेलं-अगदी नावापासून ते त्याच्या आर्किटेक्चर पर्यंत। नावं तरी कशी? Paris, Venetian, NewYork NewYork, Caeser's Palace, Luxor... जणू काही ती त्या त्या देशाचं प्रतिनिधित्वं करत आहेत। प्रत्येक हॉटेलभोवती त्याच्या नावाला साजेलसा देखावा। म्हणजे बघा ना-Venetian च्या बाहेर एक छोटासा लेक, त्यात गंडोलाज वगैरे.....त्यात बसून तुम्हाला एक फेरफट्काही मारता येतो।पॅरिस होटेलच्या बाहेर तर साक्षात आयफेल टॉवर तुमच्या स्वागताला खडा! या आयफेल टॉवर वरही तुम्हाला जाता येतं। आणि हो, तिथे जाताना चक्कं 'Gustav Eiffel' तुम्हाला टॉवरच्या निर्मीतीची कहाणी सांगतो! NewYork NewYork च्या बाहेर अमेरिकेची स्वातंत्र्यदेवता आणि न्यूयॉर्कची skyline तुमचं स्वागत करते. प्रत्येक हॉटेल, ज्याचं नाव कुठल्या ना कुठल्या देशाशी निगडित आहे, त्या त्या देशाची वैशिष्टयं मिरवत दिमाखात उभं आहे। असंच एक लक्षात राहिलेलं हॉटेल म्हणजे 'Bellagio'..... ते लक्षात राहतं ते त्याच्या 'fountain show' मुळे। दर अर्ध्या तासाने हे शोज असतात. १०-१५ मिनिटांचा एक शो, पण तुम्हाला थक्क करणारा आणि सभोवतालचा विसर पाडणारा! गाण्याच्या सुरावटींवर नाचणारी कारंजी तोंडात बोटं घालायला लावतात. प्रत्येक स्वरावटीवर त्या लयीत हलणारे कारंज्याचे फवारे कसलेल्या नर्तकीलाही लाजवतील इतके मोहक आणि अदापूर्ण!

एवढं सगळं बघून तुम्हाला स्ट्रीप कव्हर केल्यासारखं वाटतं न वाटतं तोच तुमच्या लक्षात येतं की अरे, हा तर स्ट्रीपचा अर्धाच भाग आहे। अजून दुसर्‍या बाजूलाही 'Circus Circus', 'Stratosphere' ही हॉटेल्स तुमची वाट बघत आहेत....

अशी अनेक हॉटेल्स आणि त्यांची अनेक वैशिष्टयं- hotel Flamingo चं 'wildlife habitat', MGM Grand चं 'Lion Habitat', Caeser's Palace चा 'Fall of Atlantis show', आणि खरंच stratophere ला स्पर्श करतो की काय असा प्रत्यय देणारा stratosphere tower आणि सर्वात हॄदय दडपून टाकणारी गोष्ट म्हणजे या ११२ मजली टॉवरच्या डोक्यावर असलेल्या तीन राइड्स....... हे सगळं बघताना दिवस कधी संपतो कळंतंच नाही। तहान भुकेचंही भान रहात नाही।

इथे प्रत्येक होटेलच्या 'attraction' पर्यंत पोचण्याचा मार्ग हा मॉल आणि कसिनोच्या पोटातून...... त्या त्या हॉटेलचा मॉल आणि कसिनो याच्यातून पार झाल्याशिवाय तुम्हाला इच्छित गोष्टीचं दर्शन होणं अशक्य!! कसिनो बघितल्यावर सहाजिकच 'बघूया नशीब आजमावून!' असं वाटल्याशिवाय रहात नाही आणि कमीत कमी २-४ डॉलर्स 'स्लॉट मशिन' ला दान दिल्याशिवाय माणूस पुढे जात नाही... आम्ही मात्र या गोष्टीवर जाणीवपूर्वक नियंत्रण ठेवलं होतं। इथे ५-६ दिवस घालवायचे हे ठरलेलं असल्यामुळे पहिले ४ दिवस आम्ही नुसते फिरलो आणि कसिनोचा मोह आवरला। नाहीतर पहिल्याच दिवशी लखाचे बाराहजार व्हायला वेळ लागला नसता...!

क्रमशः.....

बुधवार, २ सप्टेंबर, २००९

वहीचं पान-शेवटचं................

गेल्यावर्षी सुट्टीत आईकडे राहायला गेले होते तेव्हा भावाने फर्मान सोडलं--"ए, आता जरा आठ दिवस राहणार आहेस तर तुझं वह्या-पुस्तकांचं कपाट जरा बघ। नको असेल ते वेगळं काढ आणि मला जरा कपाटात जागा करून दे."

झालं, एका निवांत दुपारी मी कापाटाच्या आवरा-आवरीचं काम हाती घेतलं। दार उघडताक्षणी आठवणींचा खजिनाच उघडला जणू. शाळेपासूनच्या जपून ठेवलेल्या कितीतरी गोष्टी, तसंच जुन्या वह्या पुस्तकं असं बरच काही माझ्या हाती लागलं. काय ठेवावं काय टाकावं हे बघतानाच एकीकडे मी जुन्या वह्या चाळत होते. अशाच काही वह्या चाळताना जाणवलं की आपण केलेला अभ्यास किंवा वहीचा इतर मुख्य विषय सोडून वहीत आणखी बरंच काही दडलेलं असतं आणि ते सगळं असतं......तुमच्या लक्षात आलंच असेल एव्हाना....... हो, ते सगळं असतं वहीच्या शेवटच्या पानावर..........

वहीच्या या शेवटच्या पानात खूप काही लपलेलं असतं। खूप आठवणी सामावलेल्या असतात. अगदी जुन्या फोटोंचा अल्बम बघताना आपल्याला जशी गंमत येते ना तशीच वहीचं हे शेवटचं पान बघताना येते. आणि अनेक गमतीशीर आठवणी जाग्या होतात........

खरच काय काय खरडलेलं असतं आपण त्या पानावर.........

गणितं सोडवताना केलेली कच्ची आकडेमोड हा तर बहुतेक सगळ्या शेवटच्या पानांचा अविभाज्य घटक असतो! त्याशिवाय लेक्चर चालू असताना मैत्रीणीला काही सांगायचं झालं तर तेही याच पानावर लिहायचं। परत त्याच्यावरचं तीचं उत्तरही तिथेच कुठेतरी सापडणार..... "लेक्चर किती बोअर होतंय, सगळं बाऊन्सर जातंय, त्यापेक्षा बसलो नसतो तरी चाललं असतं........" इत्यादी इत्यादी.....

हे एवढ्यावरंच थांबत नसे। खूपच कंटाळा आला तर त्या पानाचा आणखीनच सदुपयोग :) केला जात असे आणि त्याच्यावर फुली-गोळा, सिनेमांची नाव ओळखणं असे विविध प्रकरचे खेळही खेळले जात असंत. झालंच तर वर्गातल्या इतर कोणावर तरी कॉमेंट्स्.....कोणाचा ड्रेस कसा आहे, कोणाची हेअर्-स्टाईल आज कशी दिसतेय इथपासून ते आज डब्यात काय आणलंय इथपर्यंत.....अशा अनेक गोष्टी त्या पानावर खरडलेल्या असंत.

प्रत्येक वर्गातले बॅक बेंचर्स (काही अपवाद वगळता) जसे अभ्यास सोडून इतर सर्व उद्योग करण्यात मश्गूल असतात ना तसंच काहीसं वहीच्या या शेवटच्या पानाचं असतं! अभ्यास सोडून बाकी गावभरच्या गोष्टी त्यावर लिहिलेल्या असतात.

कधी आईने दिलेल्या पॉकेटमनीचा हिशोब तर कधी कुठल्याशा गाण्याच्या चार ओळी। मैत्रीणींपैकी कोणी वेगळी भाषा शिकत असेल तर त्या भाषेतील एखादं वाक्यं किंवा कोणी चायनीज, जॅपनीज शिकत असेल तर त्या लिपीतलं आपलं नाव. कोणाची चित्रकला चांगली असेल तर एखादं छोटसं चित्रं, पाना-फुलांची नक्षी किंवा एखादी छोटीशी रांगोळी सुद्धा! अशा कित्तीतरी गोष्टी.......... शाळा-कॉलेज मधील मोरपंखी दिवसांच्या आठवणींचा संग्रह्-अनमोल संग्रह असतं हे पान.

अशाच माझ्या एका वहीचं शेवटचं पान बघताना, त्यावर लिहिलेल्या वेगवेगळ्या गोष्टी वाचताना माझं मलाच हसू आलं. आपण केलेल्या गोष्टींची गंमत वाटली आणि कॉलेज मधल्या माझ्या एका मैत्रीणीची इतकी प्रकर्षाने आठवण झाली की कपाट आवरणं बाजूल ठेवून पहिला तिला फोन लावला आणि आठवणींचा हा खजिना गप्पांमधून पुन्हा एकदा जिवंत केला..............

रविवार, २६ जुलै, २००९

प्रामाणिक

३-४ वर्षांपूर्वीची गोष्ट असेल। माझं ऑफिस २ तास लवकर सुटत असे शनिवारी. अशाच एका शनिवारी साधारण ४-४:३० च्या सुमारास ऑफिसमधून निघाले. चर्चगेट स्टेशनवरून माटुंगा रोडला जाणारी स्लो लोकल पकडली आणि खिडकीजवळची सीट पकडून बसले. १०-१५ मिनिटातच दादर जवळ आलं आणि दादरला खूप बायका डब्यात चढून झुंबड उडते म्हणून मी उठले. माटुंगा रोड ज्या बाजूला येतं त्या बाजूच्या दरवाज्याजवळ जाऊन उभी राहिले. तेवढयात माझा मोबाईल वाजला असं वाटलं म्हणून बॅगेतून काढून पाहू लागले. तेवढयात गाडी दादरला थांबली आणि बायकांचा एक लोंढाच्या लोंढा आत शिरला. धक्काबुक्की चालू झाली आणि नेमका मला कोणाचा तरी धक्का लागून माझ्या हातातील मोबाईल खाली पडला. पडला तो डायरेक्ट फुटबोर्डवर. आणि मी तो उचलायला जाणार इतक्यात गाडी सुरु झाली आणि धक्क्याने मोबाईल पडला रेल्वे ट्रॅकवर. मी जोरात ओरडले. काय करावं काही सुचेना. म्हटलं, नक्की कुठे पडलाय कोण जाणे! जर का गाडी त्याच्यावरून गेली तर आशाच सोडा.

माझ्या बाजूला उभी असलेली एक मुलगी हे सगळं बघत होती. तिने पटकन गाडीतून वाकून मागे बघितलं. बाजुच्या ट्रॅकवरून एक माणूस चालला होता. त्याला जोरात ओरडून तिने सांगितलं, "भाईसाहब अगर ट्रॅकपे कोई मोबाईल मिला तो प्लीज उठा लेना". तो हो म्हणाला की नाही हे कळेपर्यंत गाडीने वेग घेतला होता. लगेच तिने मला तिचा मोबाईल दिला आणि माझा नंबर फिरवायला सांगितला. आणि काय आश्चर्य! त्या इसमाने खरच माझा मोबाईल उचलला होता!! माझ्या जीवात जीव आला. तो मला म्हणाला, "मॅडम, मै आपके लिये दादर स्टेशनपे वेट करता हू. १ नंबर प्लॅटफॉर्मपे जो पुलिस स्टेशन है उधर आजाओ.". मी ठीक आहे म्हणून फोन ठेवला. त्या मुलीला तर कसं थॅंक्स करू तेच कळत नव्हतं. तिने प्रसंगावधान राखून जर त्या माणसाला सांगितलं नसतं तर माझा मोबाईल मिळण्याची आशा पूर्णपणे मावळली असती।

इतक्यात माझं स्टेशन आलं आणि मी उतरले. आणि परत उलटया दिशेला दादरला जाणारी लोकल पकडली. मनात सारखी शंका येत होतीच खरच थांबला असेल का तो माणूस माझा मोबाईल घेऊन? का आपलं मला म्हणाल नुसतं आणि गेला असेल पळून?उलट सुलट विचार करता करता दादर कधी आलं कळलंच नाही. मी तडक त्याने सांगितलेल्या ठिकाणी जाऊन पोचले आणि मला खरचं विशेष वाटलं. तो माणूस माझी वाट पहात तिथेच उभा होता. मी मोबाईल त्याच्याकडून घेतला आणि त्याला थँक्स म्हणून परतीच्या वाटेला लागले.खरंतर तो माझा फोन न उचलता तसाच निघून जाऊ शकला असता. किंवा त्याला माझा मोबाईल मिळाला आहे हे कळू न देता लंपास करू शकला असता. सहज शक्य होतं ते. आणि हे सगळं काही मिनिटांच्या कालावधीत घडल्यामुळे त्याचा चेहराही कोणी नीट बघितला नव्हता. पण तसं न करता त्याने जो प्रामाणिकपणा दाखवला त्याचं कौतुक वाटलं.

गुरुवार, १६ जुलै, २००९

चोराच्या उलट्या बोंबा !!

४-५ वर्षांपूर्वीची गोष्ट असेल।दिवाळीचा सुमार होता. माझ्या एका काकाने कोकणात- दापोलीला नुकतंच घर बांधलं होतं. भाऊबीजेच्या निमित्ताने सर्व नतेवाईकांचं एक गेट-टूगेदर त्याने ठेवलं होतं. तेव्हा आलेला एक अनुभव इथे देत आहे. चोर तो चोर वर शिरजोर म्हणतात ना तसाच काहिसा अनुभव आम्हाला आला.

आम्ही ठरवल्याप्रमाणे ठरवलेल्या दिवशी दुपारी ३ वाजता सुमो दारात आली. गाडीवाल्याचं
नाव ओळखीच्याच एका व्यक्तीकडून कळल्यामुळे आम्ही निश्चिंत होतो। गाडीचा मालक आणि driver दोघही आले होते. आम्ही सर्व सामान गाडीत भरलं आणि आमचा प्रवास सुरू झाला. थोडं पुढे गेल्यावर गाडीत पेट्रोल भरण्यासाठी गाडी थांबवली. मालकाने माझ्या वडिलांकडून ८००-८५० रुपये मागून घेतले. "शेवटी हिशोब करताना तेवढे कापून घ्या साहेब', असं म्हणाला. ठीक आहे असं म्हणून बाबांनीही पैसे दिले. मालक पेट्रोल पंपवरच उतरला आणि आम्ही पुढे निघालो. माहीमपासून जेमतेम सायन पर्यन्त पोचलो असू आणि आमच्या driver च्या लक्षात आलं की गाडीचे ब्रेक्स नीट काम करत नाहियेत. आता आली का पंचाईत! गाडी दुरुस्तं व्हायला बराच वेळ लागला असता. दापोलीपर्यंत जायचं म्हणजे ५-६ तास तरी लगणार होते. आणि अशा परिस्थितीत गाडी पुढे दामटणं अशक्य होतं. म्हणून आम्ही घरी परतण्याचा निर्णय घेतला.


गाडीच्या मालकाला तिथूनच फोन करून आमचा निर्णय कळवला आणि आम्ही मागे फिरलो.
या गोष्टीला साधारण महीना झाला असेल तरी त्या गाडीवाल्याचं आमचे पैसे परत करण्याचं काही चिन्हं दिसेना. प्रथम १-२ वेळा त्याने माझ्या बाबांना "देतो साहेब थोडी तंगी आहे" वगैरे कारणं देऊन टाळलं. नंतर नंतर त्याच्या अवाजात मगरूरी येऊ लागली, "देईन हो साहेब काय घाई आहे तुम्हाला?" माझ्या बाबांचा स्वभाव मुळातच वाद-विवाद करण्याचा नसल्यामुळे त्यांनीही दुर्लक्ष केलं. पण नंतर मात्रं त्याच्याकडून काहीच प्रतिसाद न मिळाल्यामुळे एक लास्ट चान्स घेण्यासाठी म्हणून परत फोन केला। आणि त्या महाशयांचं उत्तर ऐकून आम्ही गार झालो!!!

तो माझ्या वडिलांच्या अंगावर जवळ जवळ खेकसला आणि म्हणाला, "तुम्हाला एकदा पैसे देतो म्हणून सांगून कळत नाही? सारखा सारखा फोन करता ते? नाही देत पैसे। काय कराल? याद राखा मला परत फोन केलात तर, बघून घेईन तुम्हाला". हे उत्तर ऐकून आम्ही हैराण झालो. आम्हाला त्या ८०० रुपयांनी काही फार फरक पडत होता असं नाही, पण आपलेच पैसे असून आपल्यालाच मागायची चोरी या गोष्टीचं आश्चर्यं वाटलं आणि 'दुर्जनं प्रथमं वंदे' असं म्हणून आम्ही त्या पैशांवर पाणी सोडलं.

रविवार, ५ जुलै, २००९

आपण यांना पाहिलंत का?

काल रेडिओवर एक फोन-इन कार्यक्रम ऐकत होते। विषय होता-आपल्या आजूबाजची अशी काही माणसे जी काही वर्षांपूर्वी आपल्याला वरचेवर दिसत असत पण आतामात्र दिसणं दुर्मिळ झालंय. त्या रेडिओ जॉकीने एक उदाहरण दिलं-खारी बिस्किटवाला.
पत्र्याचा एक मोठा डबा घेऊन दारावर खारी बिस्किटं विकायला येणारा. त्या डब्यात फक्तं बिस्किटंच नाहीत तर पाव, ब्रून ब्रेड, बटर असे इतरही बरेच पदार्थ असत. तिने त्याचा उल्लेख केल्यावर मलाही आठवलं, आमच्याही बिल्डिंगमधे असा एक खारी बिस्किटवाला येत असे. बहुतेकवेळा रविवारी सकाळी. बरेच लोक त्यच्याकडून काही काही घेत असत.
तर अशी कोणकोणती माणसं तुम्हाला आठवतात ते आम्हाला फोन करून सांगा-असा त्या कार्यक्रमाचा विषय. तो कार्यक्रम काही पूर्ण ऐकू शकले नाही. पण त्या निमित्ताने अशी अनेक माणसं मला आठवायला लागली.
दूरवरून एक हाक ऐकू आली-'काळी मैना डोंगरची मैनाssss' अरे म्हटलं हा तर करवंदवाला! एप्रिल-मे सुरु झाला की ही हाक हमखास ऐकू येणारच-टोपलीत करवंद्-जांभळं असं विकायला घेऊन! हा रानमेवा खाण्याची मजाच काही और!
हा करवंदवाला जातो न जातो तोच आण्खी एक ओळखीचा आवाज कानी पडला-छुरी कात्री धारवालाsssss. एक लोखंडी स्टॅंड आणि त्याच्यावर धार करण्याचं यंत्रं बसवलेलं. ते खांद्यावर टाकून हा माणूस गल्लोगल्ली फिरत असे. आम्ही लहान असताना आम्हालाही आईने एक-दोनदा धार गेलेल्या सुर्‍यांना, कात्र्यांना धार काढून आणायला पाठवल्याचं आठवतंय. २-५ रुपयांत तो २-३ गोष्टींना धार काढून देत असे. काम झालं की परत स्टँड पाठुंगळी टाकून छुरी-कत्री-धारवाला चालू लागत असे दुसर्‍या गल्लीत.
अशीच आणखी एक कधीही न विसरता येणारी व्यक्ती म्हणजे-बोहारीण! गुजराथी पद्धतीने नेसलेली रंगीबेरंगी साडी आणि डोक्यावर ही भलीमोठी वेताची टोपली घेऊन फिरत असे. आईच्या-आजीच्या एक ८-१० जुन्या साड्या साठल्या की आई तिला हाका मारून बोलावून घेत असे. तिचे आणि आईचे ठरलेले संवाद असत. ती ८-१० साड्यांचे २०-२५ रुपयांपेक्षा जास्त द्यायला तयार होत नसे आणि आई ५० च्या खाली येत नसे. तिला कॉटनची साडी द्या ती सिंथेटिक मागे, तिला सिंथेटिक द्या ती कमी वापरलेली मागे. कधी कधी तर तिची मजल जरीची साडी मागण्यापर्यंतही गेल्याचं मला आठवतंय! शेवटी घासाघीस थांबवून आई म्हणत असे, "तुझं राहूदे, माझं राहूदे. ३० रुपये दे. याच्यापेक्षा चांगल्या साड्या तुला देऊन आम्ही काय नेसू?" हा संवाद ठरलेला! पण ती बोहारीण सुधा बोलण्यात हार जात नसे. कधी पैशांच्याऐवजी स्टीलची डबे-भांडी अशा वस्तूही देत असे. आणि तिच्याशी कितीही हुज्जत घातली तरी आईसुद्धा दुसर्‍या बोहारणीला कधीही बोलावत नसे.
तशीच एक कल्हईवाली बाईही येत असे आमच्या दारावर. नऊवारी साडी नेसलेली; कपाळावर मोठं कुंकू. घरोघरी जाऊन पितळेची भांडी गोळा करून न्हेत असे आणि २-३ तासांत कल्हई लावून लखलखीत करून देत असे. जणू काही नवीनच!
असाच आठवणीत राहीलेला एक माणूस म्हणजे खरवसवाला किंवा चीकवाला. गायीने वासराला जन्म दिल्यावर पहिलं जे दूध निघतं ते म्हणजे चीक. हा चीक खूप पौष्टीक असतो असं म्हणतात. तर असा हा चीक विकायला घेऊन एक माणूस दारावर येत असे. कधी चीक तर कधी तयार खरवस. दूधवाल्याच्या कॅन सारखेच कॅन त्याच्याजवळ असत. मग हा चीक कुकरमधे उकडवून कधी साखर- वेलची घालून तर कधी गूळ-केशर घालून आई त्याचा खरवस करत असे. मस्त लागत असे तो खरवस!
अशी अनेक माणसं एकेक करून मला आठवू लागली. पाट्याला टाकीssss असं ओरडत जाणारी वडारीण, कापूस पिंजून देणारा पिंजारी, आमावस्या झाली किंवा ग्रहण सुटलं की हमखास कहीतरी मागायला येणारी बाई-दे दान सुटे गिराण किंवा येऊ द्या अमुशा असं ओरडणारी. काही लोक तिला॑ पैसे देत, काही शिळी भाजी-पोळी तर काहीजण धान्यं.
कुठे गेली ही सगळी माणसं? पूर्वी वरचेवर दिसणारी, आपल्या जीवनशैलीचा एक हिस्सा असलेली. पण आता एकदम गायब झालेली?
पूर्वी वाडे-चाळी होत्या तेव्हा या लोकांचा सर्वत्र संचार असे. त्यांना अडवणारं कोणी नव्हतं. पण हळूहळू वाडे-चाळी पाडल्या जाऊ लागल्या. लोकं फ्लॅट्स मधे रहायला गेली. सोसायट्या निर्माण झाल्या. सोसायटीला वॉचमन आला आणि या लोकांना आत येण्यास मज्जाव झाला. सोसायटीच्या प्रवेशद्वारावर पाट्या लटकल्या-'फेरीवाले व विक्रेते यांना प्रवेश करण्यास सक्त मनाई!'
किती नकळतपणे आपण या सगळ्या लोकांना आपल्यापासून दूर केलं? आपल्या सतत उंचावणार्‍या standard of living मुळे तांब्या-पितळेची जागा stainless steel ने घेतली आणि कल्हईवाली आणि पाट्याला टाकी लावणारीची गरज आपल्याला आपसूकच भासेनशी झाली.
कालच्या रेडिओवरच्या कार्यक्रमामुळे विस्मॄतीत गेलेली ही माणसं पुन्हा एकदा भेटली-आठवणींत!!

रविवार, २८ जून, २००९

'काळे स्पॉट्स'

२००८ मधे सुट्टीसाठी आम्ही माझ्या दीराकडे अमेरिकेला गेलो होतो। महिनाभरचा मुक्काम होता. एका वीकेंडला आम्ही न्यूयॉर्कला जाण्याचा बेत ठरवला. न्यूयॉर्कला गाडया एके ठिकाणी पार्क करून मनसोक्त हिंडायच ठरवलं. घरातून निघायच्या आधीच इंटरनेटवरून गाडी कुठे पार्क करायची वगैरे सर्व माहिती काढून ठेवली आणि ठरलेल्या दिवशी निघालो. न्यूयॉर्कला पोचलो आणि ठरलेल्या ठिकाणी गाड्या पार्क केल्या। दिवसभर हिंड हिंड हिंडलो. आणि परतीच्या वाटेला लागलो.

मी, माझी जाऊ आणि माझ्या सासूबाई एका गाडीत आणि आमचे better halves दुसर्‍या गाडीत असे बसलो होतो। गाडी पार्किंगमधून बाहेर काढताना माझी जाऊ आम्हाला म्हणाली, "हे बघा आपल्या गाडीवर काय आहे!" आम्ही दोघीही वाकून वाकून काय आहे ते बघायचा प्रयत्न करू लागलो. '२ काळे स्पॉट्स' आम्हाला गाडीच्या पुढच्या भागावर दिसले. काय असावं बरं हे? आम्ही विचार करू लागलो. घरातून निघालो तेव्हा गाडीवर असं काही पाहिल्याचं आम्हाला तिघिंनाही आठवत नव्हतं. तेव्हा आमची खात्री झाली कि गाडी जिथे पार्क करायला ठेवली होती तिथल्या लोकांचच हे काम असलं पाहिजे! आपल्याला ट्रॅक वगैरे तर करत नसतील? मनात नाही नाही त्या शंका येऊन गेल्या. बरं हया तिघांची गाडी आमच्या पुढे होती, त्यामुळे त्यांनाही विचारणं शक्य नव्हतं. शेवटी ठरवलं की जेवण्यासाठी गाडी थांबवली कि विचारायचं.

१-१:३० तासाने वाटेत आम्ही जेवण्यासाठी गाड्या थांबवल्या. पहिलं काय केलं तर आमच्या नवरोजींना हाका मारून आमच्या गाडीजवळ बोलावलं आणि ते 'काळे स्पॉट्स' दाखवले. "हे बघा ना आपल्या गाडीवर काय आहे?" आम्ही म्हटलं. "बघू काय आहे?" असं म्हणून तिघांनी गाडीकडे बघितलं आणि जे हसत सुटले, कि काही विचारू नका!! आम्हाला काहीच कळेना कि असे का हसत आहेत? आम्ही ते 'काळे स्पॉट्स' काय असतील याचा विचार करून करून थकलो होतो आणि हे तिघं आमच्याकडे बघून हसत होते. शेवटी न रहावून विचारलं, "आता हसणं थांबवा आणि सांगा एकदा हे काय आहे ते?" ज्या अर्थी हे हसत आहेत त्या अर्थी काहि विशेष नाही आणि आपली अक्कल निघणार आता हे कळून चुकलं होतं! शेवटी त्यांनी सस्पेन्स संपवला आणि म्हणाले, "गाडी पहिल्यांदा पाहिल्यासारख्या काय वागताय? वायपर वापरलाय का गाडीचा कधी? त्याच्यासाठी पाणी कुठून येतं? ते पाणी ह्या 'काळ्या स्पॉट्स' मधून येतं!!" हे ऐकून डोक्यात लख्खं प्रकाश पडला आणि आम्ही प्रदर्शित केलेल्या अज्ञानाचं हसू आलं. आणि त्याहीपेक्षा जास्त पश्चात्ताप झाला तो ते नवर्‍यासमोर केलं याचा! कारण त्यानंतर बायका आणि ड्रायव्हिंग यावरून किती चिडवा-चिडवी झाली हे वेगळं सांगायची गरज नाही!!!

गुरुवार, १८ जून, २००९

थांबावे कुठे???

टी-२० मधे भारताला इंग्लंडने हरवलं!! गेल्यावर्षीचा विश्वविजेता संघ उपांत्य फेरीपर्यंत देखील पोचला नाही! विविध माणसांच्या तर्‍हेतर्‍हेच्या प्रतिकिया कानावर पडू लागल्या आणि पुन्हा एकदा भारतीयांच्या क्रिकेटप्रेमाचे विचार माझ्या डोक्यात फेर धरू लागले।

आपली लोकं क्रिकेटसाठी एवढी वेडी आहेत हे बघून मला कधी कधी खूप आश्चर्य वाटतं। आपल्याकडे लोक क्रिकेटची मॅच अगदी तन-मन-धन अर्पून बघत असतात। तेंडुलकर, धोनी, युवराज यांची फलंदाजी तर लोकांच्या अधिकच जिव्हाळ्याची! हे खेळाडु नीट खेळले नाहीत तर लोक अगदी बेचैन होतात. आपण हरतोय असं वाटायला लागलं की देवाला नवस बोलणारीही कितीजणं असतात. काहीजणं मॅच संपेपर्यन्त देवाचं नाव घेत बसतात तर काहीजणं इतर काही अंधश्रद्धांचा आधार घेतात.

परवा एक माणूस रेडिओवर प्रतिक्रिया देत होता--आपण मॅच हरलो हे पाहून मला २ रात्री झोपच लागली नाही! मी मनात म्हटलं, की ही बोच जो संघ हरतो त्याला असायला हवी, हो कि नाही?? आपल्या देशात लोक क्रिकेटपटूंवर अतोनात प्रेम करतात। अगदी आपल्या सरकारने त्यातल्या दोघांना पद्मश्रीही बहाल केली होती, पण हा सन्मान स्वीकरायलाही त्यांना वेळ नव्हता!! असं असताना भारतीय लोक त्यांच्यासाठी एवढा जीव का टाकतात? विचार करण्यासारखी गोष्ट आहे.

एखादा खेळ किंवा खेळाडू आवडणं किंवा त्याचा फॅन असणं समजण्यासारखं आहे। पण ह्या आवडीचं रुपांतर वेडात झालेलं कितपत चांगलं?? या वेडात किती वहावत जावं याला काही सीमा?? आपल्याकडे क्रिकेट तर इतर काही देशांमधे फुटबॉल, हे खेळ, लोक जीवन-मरणाचा प्रश्न असल्यासारखे का बघत असतात? आपण मॅच हरलो की लोक एखाद्या खेळाडूचं घर जाळणे, त्याची मालमत्ता उद्ध्वस्त करणे असेही अनेक प्रकार करतात. वर्ल्डकप झाले की पेपरमधून बातम्या यायला सुरुवात होते-अमुक अमुक देशाचा पराभव पचवणे कठीण गेल्याने अमुक एका माणसाने आत्महत्त्या केली. मॅच कोण जिंकणार यावरून दोन मित्रांमधे वादावादी होऊन एकाने दुसर्‍याला सुर्‍याने भोसकले. या आणि अशा अनेक बातम्या आपण वाचतो.

हे सगळं बघून एकच विचार मनात येतो-आपलं आयुष्यं एवढं स्वस्तं आहे का कि एखादी मॅच हरलो म्हणून आपण त्याचा त्याग करावा? आपल्या आयुष्यात दुसरं काहीच लक्ष्यं नाही का कि फक्त एखद्या खेळामधली हार-जीत यावर आपल्या आयुष्याचा शेवट अवलंबून असावा?

आवड म्हणून विविध खेळ बघावेत, त्यांचा आनंद घ्यावा. त्यातल्या एखाद्या खेळात आपणही प्राविण्य मिळवावे. एखादा खेळाडू आपला 'रोल मॉडेल' सुद्धा असावा. त्यात काहीच गैर नाही. पण त्याला किती महत्त्व द्यावं, मानसिक रित्या त्यात किती गुंतावं हे ही आपलं आपण ठरवावं. थोडक्यात काय तर ' थांबावं कुठे?' याचा प्रत्येकाने आपल्या मनाशी विचार करावा!!!!

गुरुवार, ११ जून, २००९

अस्तित्व

अरे अजित, ये ना आत ये। आमच्या विनंतीला मान देऊन जेवायला आलात खूप बरं वाटलं. अगं क्षमा तू पण ये. खरंच अजित आला खूप बरं वाटलं. तुला वाटेल मी काय मगासपासून अजित, अजित लावलंय? अगं पण तो आला म्हणजे तू येणार हे ठरलेलंच! त्यामुळे तो येणं महत्त्वाचं! तो आहे म्हणून तुझ्या इथे असण्याला अर्थ आहे. हो की नाही?

आम्ही एके ठिकाणी जेवायला गेलो होतो तिथे कानावर पडलेला हा संवाद। त्यांच्या घरात पहिलं पाऊल ठेवल्यापासून ती मुलगी नुसती ऐकत होती आणि हसून (खोटं??) त्यांच्या हो ला हो म्हणत होती. तिला ते म्हणणं कितपत पटलं होतं हे माहीत नाही पण माझ्या मनात मात्र विचारांची मालिकाच सुरु झाली होती.

वाटलं, कधी बदलणार ही मानसिकता? बायकांनाच जोपर्यंत असं वाटतं की फक्तं नवर्‍यामुळेच आपल्या अस्तित्वाला अर्थ आहे तोपर्यंत असे संवाद सारखेच ऐकू येणार।माझ्या मनात आलं, का? नवर्‍यामुळेच फक्तं बायकोच्या आयुष्याला अर्थ असतो का? मी हे सत्य अजिबात नकारत नाही की नवरा-बायकोचं नातं हे एक अतिशय सुंदर नातं आहे. दोघांच्या एकमेकांवरच्या प्रेमामुळे, एकमेकांना समजून घेण्यामुळे दोघांचं आयुष्यं समॄद्धं होतं, अर्थपूर्ण होतं. पण फक्तं नवर्‍यामुळेच बायकोच्या अस्तित्वाला अर्था आहे या मताशी मात्र मी बिलकुल सहमत नाही.

लग्नं हा मुलगा-मुलगी दोघांच्याही आयुष्यातला एक महत्त्वाचा टप्पा। कारण दोघांचही आयुष्य त्यानंतर सर्वर्थाने बदलून जातं। पण मुलीला आपल्या आई-वडिलांचं घर आणि रोजच्या सवयीचं सारं काही सोडून जायचं असल्यामुळे तिच्या मनात धास्ती जरा जास्त असते. सासर अगदी पलीकडच्या गल्लीत असलं तरी एकदा का तुम्ही लग्नं होऊन दुसर्‍या घरी गेलात की सारं काही बदलतं. अशा परिस्थितीत नवीन घरात जुळवून घेऊन स्थिरवण्यासाठी सासू, सासरे, नवरा व घरातील इतर माणसांचा खूप मोठा सहभाग असतो. नवर्‍याचा सगळ्यात जास्त. त्यातून हे जर अरेंज्ड मॅरेज असेल तर मग आणखीनच! पण याचा अर्थ असा नाही की नवर्‍यामुळेच बायकोच्या अस्तित्वाला अर्थ असतो. तो ज्या गावी असेल तिथे तिला रहावं लागतं. तिथल्या परिस्थितीशी जुळवून घ्यावं लागतं. तो ज्या माणसांना आपलं मानत असेल त्यांना तिलाही आपलं मानून, त्यांच्यात मिसळावं लागतं. यात कुठे नवर्‍याचा मोठेपणा किंवा बायकोचा कमीपणा असतो असं म्हणणं चुकीचं आहे.

नवरा हा बायकोच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा, अतिशय महत्वाचा भाग असतो.पण एकमेव महत्त्वाचा? नक्कीच नाही!! कदाचित माझं हे विधान काही बायकांना पटणार नाही, उद्दामपणाचं वाटेल. पण माझी खात्री आहे की ज्या बायका आज घराबाहेर पडून काही करत आहेत, ज्यांच्या अनुभवांची आणि जाणिवांची क्षितिजं विस्तारलेली आहेत त्यांना ते नक्कीच पटेल।

हल्लीच्या मुली, मुलांच्या बरोबरीने शिकतात, अगदी परदेशी राहूनही उच्चशिक्षण घेतात। नोकर्‍या करतात, स्वत:चे व्यवसाय करतात. उच्चपदांवरही काम करतात. नवर्‍याच्या बरोबरीने अर्थार्जन करून संसाराला हातभार लावतात. लग्नानंतरही त्यांचा कल नोकरी आणि घर दोन्ही सांभाळण्याकडे असतो.नोकरी किंवा स्वतःचा व्यवसाय केल्याने साहजिकच मुलींचही स्वत:चं एक विश्व तयार झालेलं असतं. समाजात एक स्थान असतं. स्वतःची एक ओळख असते. हे स्थान किंवा ही ओळख त्यांनी स्वत:च्या कर्तॄत्वाने आणि मेहनतीने निर्माण केलेली असते. कोणाची बायको किंवा कोणाची मुलगी म्हणून नव्हे.असं असतानाही वरच्यासारखी विधानं ऐकू आली की मन अस्वस्थं होतं आणि बोलणार्‍या व्यक्तीचा राग न येता कीव येते.

आज आपण समाजात अशा कितीतरी विवाहीत स्त्रिया बघतो ज्यांनी आपल्या कर्तॄत्वाने सार्‍या जगाला आपली ओळख करून दिली आहे। किरण बेदी, चंदा कोचर, प्रतिभा पाटील, कल्पना चावला, शिखा शर्मा--या आणि अशा कितीतरी स्त्रिया स्वबळावर उच्च्पदांवर पोहोचल्या आहेत. मला सांगा, यातील एक तरी स्त्री अशी आहे का के जिच्या नवर्‍याची ओळख दिल्याशिवाय तिची ओळख आपल्याला पटणार नाही? मला इथे नवरा-बायकोमधील श्रेष्टत्वाचा वाद घालायचा नाही। दोघंही आपापल्या जागी महत्त्वपूर्ण भूमिका बजवतात. त्यामुळे, नवर्‍यामुळेच बायकोच्या अस्तित्वाला अर्थ आहे ही काही बायकांच्या मनातील समजूत अणि ती इतर बायकांच्या मनावर बिंबविण्याची त्यांची धडपड मला चुकीची वाटते.मी तर म्हणेन आजच्या प्रत्येक स्त्रीने स्वतःची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. लग्नाआधी कोणाची तरी मुलगी आणि लग्नानंतर कोणाचीतरी बायको एवढीच आपली ओळ्ख सीमीत न ठेवता स्वत:मधल्या कलागुणांना, हुशारीला वाव मिळेल असं काहीतरी केलं पाहीजे.मग ही ओळख निर्माण करण्यासाठी उच्चशिक्षितंच असलं पाहिजे किंवा नोकरीच केली पाहिजे असं काही नाही. आज अनेक क्षेत्रं बायकांसाठी खुली आहेत. अनेक संधी खुणावत आहेत. त्याचा फायदा घेतला पाहिजे.खरं तर आपल्या कामामुळे चार जणं आपल्याला ओळखतात ही भावनाच खूप समाधान आणि खूप काही करण्याचा भरपूर उत्साह देऊन जाणारी आहे.

मला खात्री आहे की आपल्या समजातले सुजाण नवरेही याबद्दल काहीच आक्षेप घेणार नाहीत। उलट आपली बायको फक्त चूल आणि मूल याच्यात अडकून न पडता आणखी काही करू पहात आहे याचा कुठल्या समजूतदार नवर्‍याला अभिमान असणार नाही? याचा शेवट करताना John Conrad यांचं एकच वाक्यं लिहावसं वाटतं आणि सार्‍या स्त्रियांना विचारावसं वाटतं, बघायचं हे अनुभवून?

"I don't like work---but I like what is in work---the chance to find yourself, your own reality--for yourself, not for others-which no other man can ever know."

बुधवार, १० जून, २००९

॥श्री गणेशा॥

आज माझ्या ब्लॉगचा मी शुभारंभ करतेय. खूप छान वाटतंय. मी कधी लिहीन वगैरे असं वाटलं नव्हतं. म्हणजे शाळेत असताना माझ्या निबंधांचं कौतुक व्हायचं किंवा एखाद्या कवितेचं रसग्रहण वगैरे बर्‍यापैकी जमायचं. पण परिक्षेची तयारी यापलीकडे जाऊन त्याचा कधी विचार केला नाही.
परंतु मध्यंतरी एक प्रसंग घडला ज्यामुळे डोक्यात अनेक विचारांची गर्दी झाली आणि शेवटी न रहावून ते सगळं कागदावर उतरवलं. सुरुवातीला ते माझ्यापुरतंच ठेवायचं ठरवलं होतं. पण जरा धीर करून नवर्‍याला, सासू-सासर्‍यांना दाखवलं आणि त्यांच्याकडून इतका छान प्रतिसाद मिळाला म्हणून सांगू! मग माझा उत्साह वाढला आणि आता जेव्हा जमेल तेव्हा व चांगला विषय सुचेल तेव्हा लिहायचं असं ठरवून टाकलं!
जेव्हा माझी आई, भाऊ आणि प्राजक्ता, माझी मैत्रीण यांनी तो लेख वाचला तेव्हा त्यांनी मला सुचवलं की तू ब्लॉग का लिहीत नाहीस? तुला जमेल. तोपर्यंत माझ्या डोक्यातही आलं नव्हतं की आपण ब्लॉग वगैरे सुरु करावा. पण मग सिरियस्ली विचार करु लागले आणि आज विचार पक्का झाल्यावर तुम्हा सगळ्यांसमोर माझे विचार या ब्लॉगच्या माध्यमातून मांडायचं ठरवलं.
शांत पाण्यात एखादा खडा टाकल्यावर कसे त्यावर तरंग उठतात, तसंच आपल्या विचारांच आहे असं मला वाटतं. म्हणून ब्लॉगचं नाव 'तरंग'. आपल्या आयुष्यात एखादा प्रसंग घडतो, जो आपल्याला विचार करायला उद्युक्त करतो. आपल्या मनात एकदा का विचार यायला लागले ना की ते वेड्यासारखं कुठेही धावू लागतं. कधी कधी हे विचार इतके अस्वस्थं करतात की ते नुसते आपल्यापुरते ठेवणं अशक्यं होतं. कुणाबरोबर तरी शेअर करावसं वाटतं. विचारांना वाट मोकळी करून द्यावीशी वाटते. म्हणून हा सगळा खटाटोप!
ज्या लेखामुळे मला हा ब्लॉग सुरु करण्यासाठी प्रोत्साहन मिळालं, तो लेख हे या ब्लॉगवरचं पुढचं पोस्ट असेल. आशा करते की तुम्हाला ते आवडेल.
आपलं सहकार्यं, प्रोत्साहन आणि प्रतिक्रियांच्या प्रतिक्षेत.............................
श्रेया बापट.