बुधवार, २ सप्टेंबर, २००९

वहीचं पान-शेवटचं................

गेल्यावर्षी सुट्टीत आईकडे राहायला गेले होते तेव्हा भावाने फर्मान सोडलं--"ए, आता जरा आठ दिवस राहणार आहेस तर तुझं वह्या-पुस्तकांचं कपाट जरा बघ। नको असेल ते वेगळं काढ आणि मला जरा कपाटात जागा करून दे."

झालं, एका निवांत दुपारी मी कापाटाच्या आवरा-आवरीचं काम हाती घेतलं। दार उघडताक्षणी आठवणींचा खजिनाच उघडला जणू. शाळेपासूनच्या जपून ठेवलेल्या कितीतरी गोष्टी, तसंच जुन्या वह्या पुस्तकं असं बरच काही माझ्या हाती लागलं. काय ठेवावं काय टाकावं हे बघतानाच एकीकडे मी जुन्या वह्या चाळत होते. अशाच काही वह्या चाळताना जाणवलं की आपण केलेला अभ्यास किंवा वहीचा इतर मुख्य विषय सोडून वहीत आणखी बरंच काही दडलेलं असतं आणि ते सगळं असतं......तुमच्या लक्षात आलंच असेल एव्हाना....... हो, ते सगळं असतं वहीच्या शेवटच्या पानावर..........

वहीच्या या शेवटच्या पानात खूप काही लपलेलं असतं। खूप आठवणी सामावलेल्या असतात. अगदी जुन्या फोटोंचा अल्बम बघताना आपल्याला जशी गंमत येते ना तशीच वहीचं हे शेवटचं पान बघताना येते. आणि अनेक गमतीशीर आठवणी जाग्या होतात........

खरच काय काय खरडलेलं असतं आपण त्या पानावर.........

गणितं सोडवताना केलेली कच्ची आकडेमोड हा तर बहुतेक सगळ्या शेवटच्या पानांचा अविभाज्य घटक असतो! त्याशिवाय लेक्चर चालू असताना मैत्रीणीला काही सांगायचं झालं तर तेही याच पानावर लिहायचं। परत त्याच्यावरचं तीचं उत्तरही तिथेच कुठेतरी सापडणार..... "लेक्चर किती बोअर होतंय, सगळं बाऊन्सर जातंय, त्यापेक्षा बसलो नसतो तरी चाललं असतं........" इत्यादी इत्यादी.....

हे एवढ्यावरंच थांबत नसे। खूपच कंटाळा आला तर त्या पानाचा आणखीनच सदुपयोग :) केला जात असे आणि त्याच्यावर फुली-गोळा, सिनेमांची नाव ओळखणं असे विविध प्रकरचे खेळही खेळले जात असंत. झालंच तर वर्गातल्या इतर कोणावर तरी कॉमेंट्स्.....कोणाचा ड्रेस कसा आहे, कोणाची हेअर्-स्टाईल आज कशी दिसतेय इथपासून ते आज डब्यात काय आणलंय इथपर्यंत.....अशा अनेक गोष्टी त्या पानावर खरडलेल्या असंत.

प्रत्येक वर्गातले बॅक बेंचर्स (काही अपवाद वगळता) जसे अभ्यास सोडून इतर सर्व उद्योग करण्यात मश्गूल असतात ना तसंच काहीसं वहीच्या या शेवटच्या पानाचं असतं! अभ्यास सोडून बाकी गावभरच्या गोष्टी त्यावर लिहिलेल्या असतात.

कधी आईने दिलेल्या पॉकेटमनीचा हिशोब तर कधी कुठल्याशा गाण्याच्या चार ओळी। मैत्रीणींपैकी कोणी वेगळी भाषा शिकत असेल तर त्या भाषेतील एखादं वाक्यं किंवा कोणी चायनीज, जॅपनीज शिकत असेल तर त्या लिपीतलं आपलं नाव. कोणाची चित्रकला चांगली असेल तर एखादं छोटसं चित्रं, पाना-फुलांची नक्षी किंवा एखादी छोटीशी रांगोळी सुद्धा! अशा कित्तीतरी गोष्टी.......... शाळा-कॉलेज मधील मोरपंखी दिवसांच्या आठवणींचा संग्रह्-अनमोल संग्रह असतं हे पान.

अशाच माझ्या एका वहीचं शेवटचं पान बघताना, त्यावर लिहिलेल्या वेगवेगळ्या गोष्टी वाचताना माझं मलाच हसू आलं. आपण केलेल्या गोष्टींची गंमत वाटली आणि कॉलेज मधल्या माझ्या एका मैत्रीणीची इतकी प्रकर्षाने आठवण झाली की कपाट आवरणं बाजूल ठेवून पहिला तिला फोन लावला आणि आठवणींचा हा खजिना गप्पांमधून पुन्हा एकदा जिवंत केला..............

५ टिप्पण्या:

  1. एकदम ओघवती भाषा आणि माझ्या पण सगळ्या आठवणी जाग्या झाल्या (लेक्चर चालू असताना केलेले असंख्य उद्योग आठवले :) )

    उत्तर द्याहटवा
  2. व्वा श्रेया.. जुन्या आठवणी जाग्या झाल्या.. म्हातारपणी हे ब्लॉगींगचे उद्योग.. (की धंदे) आपल्याला अस्सेच जुन्या आठवणींमध्ये खिळवुन ठेवोत हिच इच्छा

    अनिकेत

    उत्तर द्याहटवा
  3. थँक्स अनिकेत. खरं आहे तु म्हणतोस ते................

    उत्तर द्याहटवा
  4. जुन्या आठवणी ताज्या झाल्या एकदम...फ्रेश पोस्ट .......सद्ध्या आता मी मुलाच्या(ईयत्ता दुसरी) वह्या रोज चेक करत असते...त्याच्याही वहीच्या शेवटच्या पानावर मित्रांचे फोन नंबर, गाड्यांचे ड्रॉईंग्ज असे काही बाही असते....

    उत्तर द्याहटवा
  5. आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!!

    उत्तर द्याहटवा