रविवार, २६ जुलै, २००९

प्रामाणिक

३-४ वर्षांपूर्वीची गोष्ट असेल। माझं ऑफिस २ तास लवकर सुटत असे शनिवारी. अशाच एका शनिवारी साधारण ४-४:३० च्या सुमारास ऑफिसमधून निघाले. चर्चगेट स्टेशनवरून माटुंगा रोडला जाणारी स्लो लोकल पकडली आणि खिडकीजवळची सीट पकडून बसले. १०-१५ मिनिटातच दादर जवळ आलं आणि दादरला खूप बायका डब्यात चढून झुंबड उडते म्हणून मी उठले. माटुंगा रोड ज्या बाजूला येतं त्या बाजूच्या दरवाज्याजवळ जाऊन उभी राहिले. तेवढयात माझा मोबाईल वाजला असं वाटलं म्हणून बॅगेतून काढून पाहू लागले. तेवढयात गाडी दादरला थांबली आणि बायकांचा एक लोंढाच्या लोंढा आत शिरला. धक्काबुक्की चालू झाली आणि नेमका मला कोणाचा तरी धक्का लागून माझ्या हातातील मोबाईल खाली पडला. पडला तो डायरेक्ट फुटबोर्डवर. आणि मी तो उचलायला जाणार इतक्यात गाडी सुरु झाली आणि धक्क्याने मोबाईल पडला रेल्वे ट्रॅकवर. मी जोरात ओरडले. काय करावं काही सुचेना. म्हटलं, नक्की कुठे पडलाय कोण जाणे! जर का गाडी त्याच्यावरून गेली तर आशाच सोडा.

माझ्या बाजूला उभी असलेली एक मुलगी हे सगळं बघत होती. तिने पटकन गाडीतून वाकून मागे बघितलं. बाजुच्या ट्रॅकवरून एक माणूस चालला होता. त्याला जोरात ओरडून तिने सांगितलं, "भाईसाहब अगर ट्रॅकपे कोई मोबाईल मिला तो प्लीज उठा लेना". तो हो म्हणाला की नाही हे कळेपर्यंत गाडीने वेग घेतला होता. लगेच तिने मला तिचा मोबाईल दिला आणि माझा नंबर फिरवायला सांगितला. आणि काय आश्चर्य! त्या इसमाने खरच माझा मोबाईल उचलला होता!! माझ्या जीवात जीव आला. तो मला म्हणाला, "मॅडम, मै आपके लिये दादर स्टेशनपे वेट करता हू. १ नंबर प्लॅटफॉर्मपे जो पुलिस स्टेशन है उधर आजाओ.". मी ठीक आहे म्हणून फोन ठेवला. त्या मुलीला तर कसं थॅंक्स करू तेच कळत नव्हतं. तिने प्रसंगावधान राखून जर त्या माणसाला सांगितलं नसतं तर माझा मोबाईल मिळण्याची आशा पूर्णपणे मावळली असती।

इतक्यात माझं स्टेशन आलं आणि मी उतरले. आणि परत उलटया दिशेला दादरला जाणारी लोकल पकडली. मनात सारखी शंका येत होतीच खरच थांबला असेल का तो माणूस माझा मोबाईल घेऊन? का आपलं मला म्हणाल नुसतं आणि गेला असेल पळून?उलट सुलट विचार करता करता दादर कधी आलं कळलंच नाही. मी तडक त्याने सांगितलेल्या ठिकाणी जाऊन पोचले आणि मला खरचं विशेष वाटलं. तो माणूस माझी वाट पहात तिथेच उभा होता. मी मोबाईल त्याच्याकडून घेतला आणि त्याला थँक्स म्हणून परतीच्या वाटेला लागले.खरंतर तो माझा फोन न उचलता तसाच निघून जाऊ शकला असता. किंवा त्याला माझा मोबाईल मिळाला आहे हे कळू न देता लंपास करू शकला असता. सहज शक्य होतं ते. आणि हे सगळं काही मिनिटांच्या कालावधीत घडल्यामुळे त्याचा चेहराही कोणी नीट बघितला नव्हता. पण तसं न करता त्याने जो प्रामाणिकपणा दाखवला त्याचं कौतुक वाटलं.

गुरुवार, १६ जुलै, २००९

चोराच्या उलट्या बोंबा !!

४-५ वर्षांपूर्वीची गोष्ट असेल।दिवाळीचा सुमार होता. माझ्या एका काकाने कोकणात- दापोलीला नुकतंच घर बांधलं होतं. भाऊबीजेच्या निमित्ताने सर्व नतेवाईकांचं एक गेट-टूगेदर त्याने ठेवलं होतं. तेव्हा आलेला एक अनुभव इथे देत आहे. चोर तो चोर वर शिरजोर म्हणतात ना तसाच काहिसा अनुभव आम्हाला आला.

आम्ही ठरवल्याप्रमाणे ठरवलेल्या दिवशी दुपारी ३ वाजता सुमो दारात आली. गाडीवाल्याचं
नाव ओळखीच्याच एका व्यक्तीकडून कळल्यामुळे आम्ही निश्चिंत होतो। गाडीचा मालक आणि driver दोघही आले होते. आम्ही सर्व सामान गाडीत भरलं आणि आमचा प्रवास सुरू झाला. थोडं पुढे गेल्यावर गाडीत पेट्रोल भरण्यासाठी गाडी थांबवली. मालकाने माझ्या वडिलांकडून ८००-८५० रुपये मागून घेतले. "शेवटी हिशोब करताना तेवढे कापून घ्या साहेब', असं म्हणाला. ठीक आहे असं म्हणून बाबांनीही पैसे दिले. मालक पेट्रोल पंपवरच उतरला आणि आम्ही पुढे निघालो. माहीमपासून जेमतेम सायन पर्यन्त पोचलो असू आणि आमच्या driver च्या लक्षात आलं की गाडीचे ब्रेक्स नीट काम करत नाहियेत. आता आली का पंचाईत! गाडी दुरुस्तं व्हायला बराच वेळ लागला असता. दापोलीपर्यंत जायचं म्हणजे ५-६ तास तरी लगणार होते. आणि अशा परिस्थितीत गाडी पुढे दामटणं अशक्य होतं. म्हणून आम्ही घरी परतण्याचा निर्णय घेतला.


गाडीच्या मालकाला तिथूनच फोन करून आमचा निर्णय कळवला आणि आम्ही मागे फिरलो.
या गोष्टीला साधारण महीना झाला असेल तरी त्या गाडीवाल्याचं आमचे पैसे परत करण्याचं काही चिन्हं दिसेना. प्रथम १-२ वेळा त्याने माझ्या बाबांना "देतो साहेब थोडी तंगी आहे" वगैरे कारणं देऊन टाळलं. नंतर नंतर त्याच्या अवाजात मगरूरी येऊ लागली, "देईन हो साहेब काय घाई आहे तुम्हाला?" माझ्या बाबांचा स्वभाव मुळातच वाद-विवाद करण्याचा नसल्यामुळे त्यांनीही दुर्लक्ष केलं. पण नंतर मात्रं त्याच्याकडून काहीच प्रतिसाद न मिळाल्यामुळे एक लास्ट चान्स घेण्यासाठी म्हणून परत फोन केला। आणि त्या महाशयांचं उत्तर ऐकून आम्ही गार झालो!!!

तो माझ्या वडिलांच्या अंगावर जवळ जवळ खेकसला आणि म्हणाला, "तुम्हाला एकदा पैसे देतो म्हणून सांगून कळत नाही? सारखा सारखा फोन करता ते? नाही देत पैसे। काय कराल? याद राखा मला परत फोन केलात तर, बघून घेईन तुम्हाला". हे उत्तर ऐकून आम्ही हैराण झालो. आम्हाला त्या ८०० रुपयांनी काही फार फरक पडत होता असं नाही, पण आपलेच पैसे असून आपल्यालाच मागायची चोरी या गोष्टीचं आश्चर्यं वाटलं आणि 'दुर्जनं प्रथमं वंदे' असं म्हणून आम्ही त्या पैशांवर पाणी सोडलं.

रविवार, ५ जुलै, २००९

आपण यांना पाहिलंत का?

काल रेडिओवर एक फोन-इन कार्यक्रम ऐकत होते। विषय होता-आपल्या आजूबाजची अशी काही माणसे जी काही वर्षांपूर्वी आपल्याला वरचेवर दिसत असत पण आतामात्र दिसणं दुर्मिळ झालंय. त्या रेडिओ जॉकीने एक उदाहरण दिलं-खारी बिस्किटवाला.
पत्र्याचा एक मोठा डबा घेऊन दारावर खारी बिस्किटं विकायला येणारा. त्या डब्यात फक्तं बिस्किटंच नाहीत तर पाव, ब्रून ब्रेड, बटर असे इतरही बरेच पदार्थ असत. तिने त्याचा उल्लेख केल्यावर मलाही आठवलं, आमच्याही बिल्डिंगमधे असा एक खारी बिस्किटवाला येत असे. बहुतेकवेळा रविवारी सकाळी. बरेच लोक त्यच्याकडून काही काही घेत असत.
तर अशी कोणकोणती माणसं तुम्हाला आठवतात ते आम्हाला फोन करून सांगा-असा त्या कार्यक्रमाचा विषय. तो कार्यक्रम काही पूर्ण ऐकू शकले नाही. पण त्या निमित्ताने अशी अनेक माणसं मला आठवायला लागली.
दूरवरून एक हाक ऐकू आली-'काळी मैना डोंगरची मैनाssss' अरे म्हटलं हा तर करवंदवाला! एप्रिल-मे सुरु झाला की ही हाक हमखास ऐकू येणारच-टोपलीत करवंद्-जांभळं असं विकायला घेऊन! हा रानमेवा खाण्याची मजाच काही और!
हा करवंदवाला जातो न जातो तोच आण्खी एक ओळखीचा आवाज कानी पडला-छुरी कात्री धारवालाsssss. एक लोखंडी स्टॅंड आणि त्याच्यावर धार करण्याचं यंत्रं बसवलेलं. ते खांद्यावर टाकून हा माणूस गल्लोगल्ली फिरत असे. आम्ही लहान असताना आम्हालाही आईने एक-दोनदा धार गेलेल्या सुर्‍यांना, कात्र्यांना धार काढून आणायला पाठवल्याचं आठवतंय. २-५ रुपयांत तो २-३ गोष्टींना धार काढून देत असे. काम झालं की परत स्टँड पाठुंगळी टाकून छुरी-कत्री-धारवाला चालू लागत असे दुसर्‍या गल्लीत.
अशीच आणखी एक कधीही न विसरता येणारी व्यक्ती म्हणजे-बोहारीण! गुजराथी पद्धतीने नेसलेली रंगीबेरंगी साडी आणि डोक्यावर ही भलीमोठी वेताची टोपली घेऊन फिरत असे. आईच्या-आजीच्या एक ८-१० जुन्या साड्या साठल्या की आई तिला हाका मारून बोलावून घेत असे. तिचे आणि आईचे ठरलेले संवाद असत. ती ८-१० साड्यांचे २०-२५ रुपयांपेक्षा जास्त द्यायला तयार होत नसे आणि आई ५० च्या खाली येत नसे. तिला कॉटनची साडी द्या ती सिंथेटिक मागे, तिला सिंथेटिक द्या ती कमी वापरलेली मागे. कधी कधी तर तिची मजल जरीची साडी मागण्यापर्यंतही गेल्याचं मला आठवतंय! शेवटी घासाघीस थांबवून आई म्हणत असे, "तुझं राहूदे, माझं राहूदे. ३० रुपये दे. याच्यापेक्षा चांगल्या साड्या तुला देऊन आम्ही काय नेसू?" हा संवाद ठरलेला! पण ती बोहारीण सुधा बोलण्यात हार जात नसे. कधी पैशांच्याऐवजी स्टीलची डबे-भांडी अशा वस्तूही देत असे. आणि तिच्याशी कितीही हुज्जत घातली तरी आईसुद्धा दुसर्‍या बोहारणीला कधीही बोलावत नसे.
तशीच एक कल्हईवाली बाईही येत असे आमच्या दारावर. नऊवारी साडी नेसलेली; कपाळावर मोठं कुंकू. घरोघरी जाऊन पितळेची भांडी गोळा करून न्हेत असे आणि २-३ तासांत कल्हई लावून लखलखीत करून देत असे. जणू काही नवीनच!
असाच आठवणीत राहीलेला एक माणूस म्हणजे खरवसवाला किंवा चीकवाला. गायीने वासराला जन्म दिल्यावर पहिलं जे दूध निघतं ते म्हणजे चीक. हा चीक खूप पौष्टीक असतो असं म्हणतात. तर असा हा चीक विकायला घेऊन एक माणूस दारावर येत असे. कधी चीक तर कधी तयार खरवस. दूधवाल्याच्या कॅन सारखेच कॅन त्याच्याजवळ असत. मग हा चीक कुकरमधे उकडवून कधी साखर- वेलची घालून तर कधी गूळ-केशर घालून आई त्याचा खरवस करत असे. मस्त लागत असे तो खरवस!
अशी अनेक माणसं एकेक करून मला आठवू लागली. पाट्याला टाकीssss असं ओरडत जाणारी वडारीण, कापूस पिंजून देणारा पिंजारी, आमावस्या झाली किंवा ग्रहण सुटलं की हमखास कहीतरी मागायला येणारी बाई-दे दान सुटे गिराण किंवा येऊ द्या अमुशा असं ओरडणारी. काही लोक तिला॑ पैसे देत, काही शिळी भाजी-पोळी तर काहीजण धान्यं.
कुठे गेली ही सगळी माणसं? पूर्वी वरचेवर दिसणारी, आपल्या जीवनशैलीचा एक हिस्सा असलेली. पण आता एकदम गायब झालेली?
पूर्वी वाडे-चाळी होत्या तेव्हा या लोकांचा सर्वत्र संचार असे. त्यांना अडवणारं कोणी नव्हतं. पण हळूहळू वाडे-चाळी पाडल्या जाऊ लागल्या. लोकं फ्लॅट्स मधे रहायला गेली. सोसायट्या निर्माण झाल्या. सोसायटीला वॉचमन आला आणि या लोकांना आत येण्यास मज्जाव झाला. सोसायटीच्या प्रवेशद्वारावर पाट्या लटकल्या-'फेरीवाले व विक्रेते यांना प्रवेश करण्यास सक्त मनाई!'
किती नकळतपणे आपण या सगळ्या लोकांना आपल्यापासून दूर केलं? आपल्या सतत उंचावणार्‍या standard of living मुळे तांब्या-पितळेची जागा stainless steel ने घेतली आणि कल्हईवाली आणि पाट्याला टाकी लावणारीची गरज आपल्याला आपसूकच भासेनशी झाली.
कालच्या रेडिओवरच्या कार्यक्रमामुळे विस्मॄतीत गेलेली ही माणसं पुन्हा एकदा भेटली-आठवणींत!!