शनिवार, २ एप्रिल, २०११

डोळे मिटलेली माणसं

एका मैत्रीणीशी फोनवर बोलत होते.


मी: आजची हेडलाईन बघितलीस? पॉल द ऑक्टोपस गेला!

ती: कोण पॉल द ऑक्टोपस? कोणी माणूस होता का?

मी: अगं ऑक्टोपस! ऑक्टोपस माणूस कसा असेल?

ती: अगं पण कोण होता हा?

म्री: तू पेपर वगैरे वाचतेस की नाही? गेला महिनाभर वर्ल्ड-कप फुटबॉलच्या विजेत्यांबद्दल भाकितं वर्तविणारा जर्मनीच्या एका प्राणी संग्रहालयातील हा ऑक्टोपस जगभर चर्चेचा विषय झालाय आणि तुला काहीच माहीत नाही?
ती: हो का! मला काही कल्पना नाही. आमच्याकडे पेपर येत नाही गं!
मी: टी. व्ही. वर सुद्धा बातम्या दाखवतात! आणि इंटरनेट वरही ही सोय उपलब्ध आहे. तिथे पण कधी वाचत नाहीस?

ती: अगं, रोजच्या रामरगाड्यात कुठे या सगळ्याला वेळ होतो?

प्रसंग दुसरा:
आम्ही ज्या छोट्याशा आखाती देशात - बहारिन मधे रहातो, तिथे गेला महिना-दीड महिना राजकीय अस्थिरता आहे. विविध ठिकाणी मोर्चे, निदर्शने चालू आहेत. मध्यंतरी तर परिस्थिती आटोक्यात ठेवण्याकरता सौदी आणि संयुक्त अरब अमिरातीहून सैन्य मागविण्यात आले आणि हा छोटासा, टिकलीएवढा देश इंटरनॅशनल न्यूज मधे गाजू लागला. त्या दरम्यान एका मैत्रीणीचा दुबईहून मला फोन आला: "अगं काय चाललं आहे बहारिनमधे? कसे आहात तुम्ही सगळे? म्हणजे आज ऑफिस मधे सगळेजण चर्चा करत होते म्हणून मला कळंलं नाहीतर मला पत्ताच नव्हता!मी अवाक! म्हटलं, "गेले किती दिवस न्यूज चॅनल्स जपान नंतर बहारिनला प्राधान्य देऊन सतत तिथल्या घडामोडी दाखवत आहेत आणि तुला आज कळलं?" तेव्हा मला परत आधीचंच उत्तर ऐकायला मिळालं, "अगं, कोण वाचतंय पेपर वगैरे! टी. व्ही. बघायला तरी वेळ कोणाला आहे!प्रसंग तिसरा:ऑफिसमधल्या एका साऊथ-इंडियन मैत्रीणीशी बोलत होते. बोलता-बोलता वैष्णोदेवीचा विषय निघाला. तर म्हणाली काय आहे हे वैष्णोदेवी? तिच्याशी आणखी काही वेळ बोलल्यावर लक्षात आलं, तिचं जग केरळ पुरतंच सीमित आहे. केरळच्यावर सुद्धा भारत देश पसरलेला आहे याची बहुधा तिला कल्पनाच नसावी! बरं, वैष्णोदेवी माहीत असण्यासाठी तिथे काही प्रत्यक्ष जाऊनच यायची गरज आहे असं नाही! कधी हिंदी चित्रपट बघितले असतील तरी वैष्णोदेवी माहीत असू शकते. पण मग कळलं की ती हिंदी चित्रपट विशेष पहातच नाही. बरं, मग तुझ्या मातॄभाषेतील तरी? ते ही नाही. इंग्रजी तरी? नाही! चित्रपटच फार क्वचित बघते! बरं, मग वीकेन्ड्सना किंवा सुट्ट्यांमधे काय करता? कुठे फिरायला वगैरे जाता? नाही! पुस्तकं तरी वाचता कधी? नाही, शिक्षण संपल्यानंतर कधी पुस्तकच हातात घेतलं नाही! बरं, परवाची भारत-पाकिस्तान क्रिकेट मॅच तरी बघितली का? नाही, क्रिकेटमधे मला विशेष रस नाही. ( मनात आलं, क्रिकेट न कळणारी किंवा न आवडणारी माणसंसुद्धा भारत-पाकिस्तान मॅच म्हटल्यावर टी. व्ही. कडे डोळे लावून बसलेली असतात!)या प्रसंगानंतर माझी बोलतीच बंद झाली! आपण ज्या समाजात राहतो त्या समाजात काय चाललं आहे याच्याशी काही लोकांचा सुतराम संबंध नसावा? कशी राहू शकतात ही माणसं एवढी डोळे मिटून, एवढी अलिप्तं? रोजचा रामरगाडा कोणाला चुकलाय? ऑफिस, घरकाम या गोष्टी सर्वच जण करतात. पण या गोष्टी एखाद्याच्या समाजिक अलिप्ततेचं कारण कशा असू शकतात? रोजच्या व्यस्त दिनचर्येतून थोडा का होईना वेळ काढून आजूबाजूच्या घटनांबद्दल दक्ष असणे हे सुजाण नागरिकाचे कर्तव्य नाही का?आपलं व्यवस्थित चाललं आहे ना, मग झालं तर. बाकी समाजात काही का होइना, मला काय त्याचे? ही वॄत्ती बळावत चालली आहे असं आजकाल प्रकर्षाने वाटतं. वर सांगितलेल्या सर्व प्रतिक्रिया सधारण ३०-३५ वयोगटातील माझ्या मित्र-मैत्रीणींकडून/सहकर्यांकडून ऐकायला मिळालेल्या. सर्वजण 'सुशिक्षित', नोकर्‍या-चाकर्‍या करणारे. बरेचजण मुलांचे पालक. त्यांच्या मुलांना उत्तम, सजग आणि जबाब्दार नागरिक बनविण्याची केवढी मोठी जबाबदारी आहे त्यांच्यावर! पण हे स्वतःच जर समाजाबद्दल एवढे उदासिन असतील तर ते आपल्या मुलांना काय शिकविणार? बरं, यांना राजकारणात, इतर आंतरराष्ट्रीय घडामोडींत, चित्रपट, संगीत, खेळ या कशात रस नाही तर नाही. निदान ते ज्या क्षेत्रात काम करत आहेत त्याबद्दल तरी अस्था आहे का? त्या क्षेत्रात काय चाललं आहे, काय बदल होत आहेत किंवा शोध लागत आहेत याच्याशीही त्यांना कर्तव्य नाही!मग यांना रस आहे तरी कशात? रोज ही माणसं करतात तरी काय? एवढं डोळे मिटून रहाणं बरोबर आहे का? त्यांच्या या डोळे मिटून रहाण्यामुळे त्यांचं काही नुकसान होतंय असंही त्यांना वाटत नाही. आणि आपण त्याची जाणीव करून द्यायचा प्रयत्नं केला तर त्यांच्या रोजच्या 'व्यस्त' दिनचर्येचा पाढा वाचायला ते तयारच असतात! या डोळे मिटलेल्या माणसांना जागं करणार तरी कोण आणि कसं????