शनिवार, २ एप्रिल, २०११

डोळे मिटलेली माणसं

एका मैत्रीणीशी फोनवर बोलत होते.


मी: आजची हेडलाईन बघितलीस? पॉल द ऑक्टोपस गेला!

ती: कोण पॉल द ऑक्टोपस? कोणी माणूस होता का?

मी: अगं ऑक्टोपस! ऑक्टोपस माणूस कसा असेल?

ती: अगं पण कोण होता हा?

म्री: तू पेपर वगैरे वाचतेस की नाही? गेला महिनाभर वर्ल्ड-कप फुटबॉलच्या विजेत्यांबद्दल भाकितं वर्तविणारा जर्मनीच्या एका प्राणी संग्रहालयातील हा ऑक्टोपस जगभर चर्चेचा विषय झालाय आणि तुला काहीच माहीत नाही?
ती: हो का! मला काही कल्पना नाही. आमच्याकडे पेपर येत नाही गं!
मी: टी. व्ही. वर सुद्धा बातम्या दाखवतात! आणि इंटरनेट वरही ही सोय उपलब्ध आहे. तिथे पण कधी वाचत नाहीस?

ती: अगं, रोजच्या रामरगाड्यात कुठे या सगळ्याला वेळ होतो?

प्रसंग दुसरा:
आम्ही ज्या छोट्याशा आखाती देशात - बहारिन मधे रहातो, तिथे गेला महिना-दीड महिना राजकीय अस्थिरता आहे. विविध ठिकाणी मोर्चे, निदर्शने चालू आहेत. मध्यंतरी तर परिस्थिती आटोक्यात ठेवण्याकरता सौदी आणि संयुक्त अरब अमिरातीहून सैन्य मागविण्यात आले आणि हा छोटासा, टिकलीएवढा देश इंटरनॅशनल न्यूज मधे गाजू लागला. त्या दरम्यान एका मैत्रीणीचा दुबईहून मला फोन आला: "अगं काय चाललं आहे बहारिनमधे? कसे आहात तुम्ही सगळे? म्हणजे आज ऑफिस मधे सगळेजण चर्चा करत होते म्हणून मला कळंलं नाहीतर मला पत्ताच नव्हता!मी अवाक! म्हटलं, "गेले किती दिवस न्यूज चॅनल्स जपान नंतर बहारिनला प्राधान्य देऊन सतत तिथल्या घडामोडी दाखवत आहेत आणि तुला आज कळलं?" तेव्हा मला परत आधीचंच उत्तर ऐकायला मिळालं, "अगं, कोण वाचतंय पेपर वगैरे! टी. व्ही. बघायला तरी वेळ कोणाला आहे!प्रसंग तिसरा:ऑफिसमधल्या एका साऊथ-इंडियन मैत्रीणीशी बोलत होते. बोलता-बोलता वैष्णोदेवीचा विषय निघाला. तर म्हणाली काय आहे हे वैष्णोदेवी? तिच्याशी आणखी काही वेळ बोलल्यावर लक्षात आलं, तिचं जग केरळ पुरतंच सीमित आहे. केरळच्यावर सुद्धा भारत देश पसरलेला आहे याची बहुधा तिला कल्पनाच नसावी! बरं, वैष्णोदेवी माहीत असण्यासाठी तिथे काही प्रत्यक्ष जाऊनच यायची गरज आहे असं नाही! कधी हिंदी चित्रपट बघितले असतील तरी वैष्णोदेवी माहीत असू शकते. पण मग कळलं की ती हिंदी चित्रपट विशेष पहातच नाही. बरं, मग तुझ्या मातॄभाषेतील तरी? ते ही नाही. इंग्रजी तरी? नाही! चित्रपटच फार क्वचित बघते! बरं, मग वीकेन्ड्सना किंवा सुट्ट्यांमधे काय करता? कुठे फिरायला वगैरे जाता? नाही! पुस्तकं तरी वाचता कधी? नाही, शिक्षण संपल्यानंतर कधी पुस्तकच हातात घेतलं नाही! बरं, परवाची भारत-पाकिस्तान क्रिकेट मॅच तरी बघितली का? नाही, क्रिकेटमधे मला विशेष रस नाही. ( मनात आलं, क्रिकेट न कळणारी किंवा न आवडणारी माणसंसुद्धा भारत-पाकिस्तान मॅच म्हटल्यावर टी. व्ही. कडे डोळे लावून बसलेली असतात!)या प्रसंगानंतर माझी बोलतीच बंद झाली! आपण ज्या समाजात राहतो त्या समाजात काय चाललं आहे याच्याशी काही लोकांचा सुतराम संबंध नसावा? कशी राहू शकतात ही माणसं एवढी डोळे मिटून, एवढी अलिप्तं? रोजचा रामरगाडा कोणाला चुकलाय? ऑफिस, घरकाम या गोष्टी सर्वच जण करतात. पण या गोष्टी एखाद्याच्या समाजिक अलिप्ततेचं कारण कशा असू शकतात? रोजच्या व्यस्त दिनचर्येतून थोडा का होईना वेळ काढून आजूबाजूच्या घटनांबद्दल दक्ष असणे हे सुजाण नागरिकाचे कर्तव्य नाही का?आपलं व्यवस्थित चाललं आहे ना, मग झालं तर. बाकी समाजात काही का होइना, मला काय त्याचे? ही वॄत्ती बळावत चालली आहे असं आजकाल प्रकर्षाने वाटतं. वर सांगितलेल्या सर्व प्रतिक्रिया सधारण ३०-३५ वयोगटातील माझ्या मित्र-मैत्रीणींकडून/सहकर्यांकडून ऐकायला मिळालेल्या. सर्वजण 'सुशिक्षित', नोकर्‍या-चाकर्‍या करणारे. बरेचजण मुलांचे पालक. त्यांच्या मुलांना उत्तम, सजग आणि जबाब्दार नागरिक बनविण्याची केवढी मोठी जबाबदारी आहे त्यांच्यावर! पण हे स्वतःच जर समाजाबद्दल एवढे उदासिन असतील तर ते आपल्या मुलांना काय शिकविणार? बरं, यांना राजकारणात, इतर आंतरराष्ट्रीय घडामोडींत, चित्रपट, संगीत, खेळ या कशात रस नाही तर नाही. निदान ते ज्या क्षेत्रात काम करत आहेत त्याबद्दल तरी अस्था आहे का? त्या क्षेत्रात काय चाललं आहे, काय बदल होत आहेत किंवा शोध लागत आहेत याच्याशीही त्यांना कर्तव्य नाही!मग यांना रस आहे तरी कशात? रोज ही माणसं करतात तरी काय? एवढं डोळे मिटून रहाणं बरोबर आहे का? त्यांच्या या डोळे मिटून रहाण्यामुळे त्यांचं काही नुकसान होतंय असंही त्यांना वाटत नाही. आणि आपण त्याची जाणीव करून द्यायचा प्रयत्नं केला तर त्यांच्या रोजच्या 'व्यस्त' दिनचर्येचा पाढा वाचायला ते तयारच असतात! या डोळे मिटलेल्या माणसांना जागं करणार तरी कोण आणि कसं????

३ टिप्पण्या:

 1. मी स्वत: डोळे मिटलेला आहे, समाज़ाबद्‌दल उदासीन आहे, आणि त्याच्यामुळे आपलं काही नुकसान आहे असं मला वाटत नाही. तेव्हा मी माझ्या बाज़ूचं थोडं समर्थन करायला हरकत नसावी.

  भारत-पाकिस्तान यांच्यात १९५१-च्या दशकात तीन क्रिकेट मालिका झाल्या. त्या सामन्यांत सावरकर किंवा पु ल देशपांडे यांनी रस घेतला असेल? असेलही वा नसेलही. पण क्रिकेटमधे रस घेणे हे उघड्या डोळ्यांचं लक्षण नाही. पॉल द ऑक्टोपस हा सुद्‌धा फालतू बातम्या चघळण्याला चटावलेल्या लोकांचा प्रान्त आहे. असल्या बातम्या ऐकताक्षणी विसरणारे अनेक सूज्ञ लोक मला माहीत आहेत.

  'चित्रपट न पाहणे' यांत तुम्हांला आश्चर्य वाटत असेल तर तो तुमचा दोष आहे. चित्रपट न पाहणारी तुमची मैत्रिण हुशार आहे. 'निम्मी आणि शिम्मी असली नांवं शंकर्‍याला माहीत तरी कशी' असा असा मी असामीत पु लं ना प्रश्न पडला होता. प्रखर सामाजिक ज़ाणीव असलेला, समाज़ासाठी आपला खूप वेळ देणारा असा माझा एक मित्र सिनेमा पाहत नाही. आपल्या बापाला माधुरी दिक्षीतही माहीत नाही याची त्याच्या मुलींना लाज़ वाटली. आग्रहाखातर सन्मित्र एक दिवस टी व्ही समोर बसले. दहा मिनिटात कंटाळले. 'असले डब्बा सिनेमे आणि डब्बा कलाकार तुम्ही पाहता?' मुलगी म्हणाली हे थिएटरात बोलू नका, एरवी लोकांचा मार खाल. तो माझ्याशी बोलला. मी त्या बाईचा एकच चित्रपट पाहिला आहे, आणि त्यातही एक गरम सीन असल्याची चर्चा होती म्हणून. मी नेहमीच तिचा चेहरा ओळखीन याची खात्री नाही. तिला थोडंफार का होईना मी ओळखी शकतो हे माझ्या मूर्खपणाचं लक्षण आहे. 'अमिताभ बच्चनचा चेहरा ओळखता येणे' हे रामदास-सर्टिफाइड मूर्खपणाचं लक्षणच आहे.

  टिळक, गांधीजी, हिटलर, चर्चिल, लता मंगेशकर ही नांवं माहिती नसतील तर तो ज़रूर अडाणीपणा ठरेल. पण पॉल द ऑक्टोपस माहीत असणं हे बहुश्रुततेचं लक्षण नसून नको तो फालतू कचरा डोक्यात असल्याचं लक्षण आहे.

  आणि बहारीनबद्दल बोलाल तर मलाही ती बातमीच आहे. दहा टक्के भारतीयांनाही ती माहीत नसेल, आणि का माहिती असावी? इराक़ची सेना कुवेतमधे १९९० साली शिरली तेव्हा कुवेत नक्की कुठे आहे याचा मला पत्ता लागला. जगाचा नकाशा बराच माहीत असलेल्या माझी ही गत, इतरांचीही त्यापेक्षाही वाईट स्थिती होती. चीन महासत्ता म्हणून पुढे येतो आहे, ही माहिती ज़रूर अवश्य आहे. पण चीनमधल्या एका तरी नेत्याचं नांव आपल्याला माहीत आहे? भारताच्या गृहमंत्री, संरक्षणमंत्री, परराष्ट्रमंत्री, इंग्लंड-स्पेनचे पन्तप्रधान यातले किती लोक आपल्याला माहीत आहेत? मला कॅमेरॉन माहीत आहे (म्हणजे फक्त नांवानी) आणि प्रणव मुखर्जी काहीतरी असला पाहिजे हे माहीत आहे, पण नक्की कोणत्या खात्याचा हे माहीत नाही. आज़ महाराष्ट्रात बा भ बोरकर, दत्तोपन्त ठेंगडी, सेनापती बापट कोणाच्या खिज़गणतीतही नाहीत. चौकात उभं राहून लोकांना विचारून याची खात्री करून घेणे. पॉल द ऑक्टोपस यांपेक्षा महत्त्वाचा आहे की काय?

  आपल्या ज़गाची माहिती असावी हा तुमचा मुद्दा रास्त आहे. पण त्याविषयीची दिलेली उदाहरणं मात्र कमालीची भंपक आहेत.

  (इथे मी विरोधी सूर लावला असला तरी तुमचा ब्लॉग फार चांगला, विचारप्रवर्तक वगैरे आहे, आणि मी त्यातल्या नोंदींची नेहमीच वाट पाहतो.)

  उत्तर द्याहटवा
 2. सुशिक्षित अन साक्षर असा फ़रक असावा बहुदा, मेकॉले च्या शिक्षण पद्धतीने आपल्या लोकांना आय.क्यु मधे तेज केले आहे पण ई.क्यु (ईमोशनल क्वोशंट) अन एस.क्यु(सोशल क्वोशंट) मधे आपण मार खातो ,मग एम.एस ला जायचे असले की जी.आर.ई मधे वगैरे लेखी नं१ पण एंबसी इंटरव्ह्यु मधे डब्बा गोल!!!!, १८३५ च्या मेकॉले मिनिट्स मधे भारतात शिक्षण कसे असावे ह्या संबंधी मेकॉले म्हणतो " जन्माने भारतीय ,रंगाने भुरके, पण चवीने इंग्रज असे ऑफ़िस क्लार्क्स आम्हाला हवे आहेत, जे निमुटपणे काम करतील व बिना चौकशी पगार घेऊन घरी जातील!!"

  उत्तर द्याहटवा
 3. @ नानिवडेकरः आपल्या 'परखड' प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. पण मी दिलेली उदाहरणे 'भंपक' या वर्गात मोडतात असं मला अजिबात वाटत नाही. मान्यं आहे की 'पॉल द ऑक्टोपस' माहित नसल्याने आपलं काही नुकसान होत नाही. परंतु एखाद्या गोष्टीची जेव्हा खूप चर्चा होते, तेव्हा उत्सुकतेपोटी तरी ती गोष्ट काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न एखादी व्यक्ति नक्कीच करते. तसं बघायला गेलं तर 'सचिन' आणि 'लताबाई' माहीत नसल्या म्हणून तरी कोणाचं काय अडणार आहे?

  सावरकर आणि पु.लं. यांनी क्रिकेट मधे रस घेतला असेल-नसेल हा गौण मुद्दा आहे. पण ही माणसे 'डोळे मिटलेली' या वर्गात नक्कीच मोडत नाहीत. तसं असतं तर आज आपला देश स्वतंत्र झाला नसता किंवा 'पूर्वरंग', 'अपूर्वाई' सारख्या अजरामर कलकृतीही आपल्याला वाचायला मिळाल्या नसत्या. पु. लं सारख्या व्यक्तीचाही चित्रपट क्षेत्रात वावर होता. 'गुळाचा गणपती', 'पुढचे पाऊल' इ. चित्रपटांमधून त्यांनी भूमिका केल्या होत्या तसेच अनेक चित्रपटांना संगीतही दिले होते. 'क्रिकेट', 'चित्रपट' हे मी उदहरणादाखल उल्लेखिलेले काही विषय. ही डोळे 'उघडे' किंवा 'मिटलेले' हे ठरवण्याची एकमेव मोजपट्टी नक्कीच नाही. पण तरीही आज 'मामि' आणि 'थर्ड आय' यासारख्या दर्जेदार आणि जागतिक पातळीवर नावाजलेले चित्रपट दाखविणार्‍या चित्रपट महोत्सवांना गर्दी करणारी असंख्यं लोकं आहेत. आणि असे दर्जेदार चित्रपट बघणं हे रिकामटेकडेपणाचे उद्योग आहेत असं मला अजिबात वाटत नाही.

  एका 'सुशिक्षित' भारतीय नागरिकाला जर प्रणव मुखर्जी कोण हा प्रश्न पडत असेल तर ती मात्र नक्कीच झोपलेल्या माणसाची लक्षणे आहेत आणि त्यात अभिमान वाटावा असं काहीच नाही. फेब्रुवारी उजाडला कि बहुतांश भारतीय लोकांचे डोळे 'प्रणव मुखर्जींकडेच' लागलेले असतात.

  तसं बघायला गेलं तर माणसाला 'अन्नं', 'वस्त्रं' 'निवारा' आणि 'ऑक्सिजन' या गोष्टींच जीवन जगायला पुरेशा आहेत. बाकी कुठलीही गोष्ट/व्यक्ती माहीत असली काय किंवा नसली काय लौकिकार्थाने त्याच्या जगण्यात काहीच फरक पडत नाही. पण जर असं असेल तर 'माणूस' आणि 'इतर प्राणी' यांच्यात फरक तो काय?

  उत्तर द्याहटवा