शनिवार, २१ ऑगस्ट, २०१०

अपना सपना मनी मनी..............?

आज सकाळी ऑफिसला निघाले होते. माझा नेहमीचा ड्रायव्हर सुटीवर गेल्यामुळे त्याने दिलेल्या बदली ड्रायव्हर बरोबर गप्पा मारत होते. त्याच्या बरोबर झालेला हा संवादः
मी: किती वर्ष आहात बहारिनमधे?
तो: सहा वर्षं झाली.
मी: एकटेच असता का कुटुंबही असतं बरोबर?
तो: एकटा नाही, बायको, मुलंही असतात इथे.
मी: चांगलं आहे. एकटं रहायचं आणि ते ही परदेशात......खूप कठीण जातं.
तो: हो ना. आणि मला सांगा, आपण आयुष्यभर कुटुंबासाठी राब राब राबायचं आणि
त्यांच्यापासून दूर आपणंच एकटं रहायचं? काय मजा? आपलं आयुष्यं ते किती! आजकाल कधी काय होईल याचा भरवसा नाही. असं असताना आहे ते आयुष्यं आनंदात जगायचं! उद्याची जास्त चिंता करायची नाही.
मी: हं, बरोबर आहे. पण कुटुंबाला घेवून इथे रहाणं पैशाच्या दॄष्टीने सगळ्यांनाच परवडतं असं नाही ना?
तो: हो, ते ही बरोबर आहे. पण पैसा पैसा किती करायचं? आपल्यासाठी पैसा कि पैशासाठी आपण?

(असं म्हणून त्याने मला जो प्रसंग सांगितला तो अंगावर काटा आणणारा होता......)

तो: माझा एक मित्रं होता. एकटाच रहात असे इथे. बायको, मुलं केरळमधे. दर महिन्याला मिळणार्‍या पगारातला महत्त्वाचा हिस्सा त्यांना पाठवत असे. उरलेल्या पैशात काटकसरीने रहात असे. स्वत:च्या खाण्यापिण्याकडे लक्षं नाही. त्यातल्या त्यात स्वस्तं मिळेल ते (मग ते अबर्-चबर का असेना.....) खात असे. दर ३-४ वर्षांनी एकदा केरळला जात असे. बर्‍यापैकी पैसा जमवला होता. केरळला घरही बांधलं होतं. आम्ही त्याला नेहमी सांगायचो की इतका पैशामागे लागून काय मिळवणार आहेस तू? जरा स्वत:कडेही लक्षं दे. खाण्यापिण्याची आबाळ करू नकोस. नीट रहा. पण आम्हाला उडवून लावत असे नेहमी. एकदा तो असाच केरळला जाणार होता. बायकोला, मुलांना भेटण्यासाठी. सगळी तयारी झाली होती. पण सुटीवर जायच्या आधी २ दिवस त्याला massive heart attack आला..... मीच त्याला हॉस्पिटल मधे घेवून गेलो. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. डॉक्टरने सांगितलं की आम्ही याला वाचवू शकत नाही. भरीत भर म्हणजे त्याचं BP सुद्धा वाढलं आणि ब्रेन हॅमरेज झालं..... आणि शेवटी तो गेला..... काय मिळवलं त्याने पैसा-पैसा करून? स्वत: त्याचा कधीच उपभोग घेऊ शकला नाही.... आता त्याच्या कुटुंबाला कोण आधार देणार?

त्याने सांगितलेला प्रसंग ऐकून क्षणभर छातीत धस्सं झालं.... आणि तेव्हाच काही दिवसांपूर्वी घडलेला दुसरा प्रसंग माझ्या डोळ्यासमोर तरळून गेला.

माझी कलीग मला सांगत होती. तिच्या मुलाला बरं नव्हतं. लंगडत चालत होता. चांगला बास्केट बॉल खेळणारा मुलगा, पण पायामुळे सगळं बंद होतं. ती त्याला डॉक्टरकडे घेऊन गेली. डॉक्टरने पायाला विश्रांती द्यायला सांगितली आणि त्याचबरोबर एक विशिष्टं प्रकारचं बँडेज वापरण्याचा सल्ला दिला. हिने ३-४ दुकानांत चौकशी केली. ७०० रुपयांपासून-१५०० रुपयांपर्यंत वेगवेगळी किंमत तिला सांगितली. तिने आमच्या ऑफिसमधे
चौकशी केली की हे आमच्या मेडिकल पॉलिसीमधे कव्हर होतं का? तिला नाही हे उत्तर मिळालं. झालं..हिने बॅंडेज घेण्याचा निर्णय पुढे ढकलला. मी हे सगळं ऐकून अवाक! गेली १९-२० वर्ष ती बहारिनमधे रहातेय. नवरा-बायको दोघं नोकरी करतात. तरीही १५०० रुपयांच्या बॅंडेजसाठी एवढा चिकटपणा? मी न रहावून तिल विचारलं, "अगं तुला पैसे महत्त्वाचे की तुझ्या मुलाचा पाय?" यावर ती पटकन म्हणाली, "अगं, आणखी १० दिवसांतच मी आठवडाभरासाठी मुंबईला जाणार आहे तेव्हा तिकडे बघेन स्वस्तात मिळतं का ते!" मनातल्या मनात मी डोक्यावर हात मारला आणि आमचा संवाद जास्त न वाढवता तिथून चालती झाले..

तेव्हापासून माझ्या डोक्यात एकच विचार घुमू लागला- आपण पैसा का कमावतो? पैशासाठी आपण की आपल्यासाठी पैसा?

पैशाची बचत, गुंतवणूक करणं, आपला पैसा कसा वाढेल ते बघणं, आपल्या निवॄत्तीनंतर कोणाच्या तोंडाकडे न बघता, स्वावलंबीपणे जगता यावं इतका पैसा गाठीशी असणं हे सगळं बरोबर आहे. किंबहुना ते मह्त्त्वाचंही आहे. पण म्हणून नको तिथे चिकटपणा का? स्वत:वर, आपल्या मुलाबाळांवर पैसा खर्च नाही करायचा तर कुठे खर्च करायचा? आपल्या आरोग्यापेक्षा, आनंदापेक्षा पैसा महत्त्वाचा असतो का? आणि पैसा पैसा करताना आपल्यालाच डाव अर्ध्यावर सोडून जावं लागलं तर त्या पैशाचा काय उपयोग आहे? ही पैशाच्या मागे धावणारी लोकं म्हणजे आधुनिक गझनीचे महमूदच नाहीत का? आज जगात सगळीकडेच वातावरण इत़कं अस्थिर आहे की माणसाला उद्याचा भरवसा रहिलेला नाही. दररोज कुठल्या ना कुठल्या नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तीला तोंड देत लोक जगत आहेत. कधी दहशतवाद्यांचा हल्ला, तर कधी बाँबस्फोट, कधी प्लेन क्रॅश, तर कधी चक्रीवादळ किंवा पूर. असं असताना आला दिवस साजरा करायचा सोडून काही लोक प्रत्त्येक क्षणी पैशाचा नको इतका विचार करून आयुष्यातल्या आनंदाच्या किती क्षणांना मुकत असतील?

त्यामुळेच मी मधे कुठेतरी ऐकलेलं वाक्यं आठवलं 'Money is not heart of life it's a part of life' आणि असं वाटलं की प्रत्येकजण हे लक्षात ठेऊन त्याप्रमाणे वागला तर किती छान होईल?

शुक्रवार, २२ जानेवारी, २०१०

विश्वास

मध्यंतरी मला एक प्रश्न पडला, हे जे आपलं माणसांचं जग आहे ते कशावर चालतं? म्हणजे अशी कोणती गोष्ट आहे, भावना आहे, किंवा मूल्य आहे ज्याच्यामुळे आपल्या या जगातले व्यवहार चालू असतात? प्रेम? हे एक उत्तर असू शकतं. पण तसं बघायला गेलं तर प्रेम हे कौटुंबिक संबंध आणि आपले आप्त-मित्रं यांच्यापर्यंतच मर्यादित असतं. एखाद्या त्रयस्थ व्यक्तीशी व्यवहार करताना बरेचदा तिथे प्रेमाचा काही संबंध नसतो. मग काय असू शकेल? पैसा? हे पण एक उत्तर असू शकतं. पैशाभोवती दुनिया फिरते, पैसा टाकला की सारी कामं होतात असं म्हणतात. पण या सगळ्या पलीकडे एक गोष्ट असते जी कुठल्याही नात्याच्या, व्यवहाराच्या मुळाशी असते. आणि ती म्हणजे 'विश्वास'......
तसं बघितलं तर आपल्या बोलण्यात हजारदा येणारा हा शब्दं, पण उच्चारताच खूप मोठ्या जबाबदारीची जाणीव करून देणारा. कळत-नकळत आपण रोज हजारो लोकांवर विश्वास टाकत असतो. आणि त्याच्यामुळेच तर हे जग चाललंय!

म्हणजे बघा ना, अगदी मूल जन्मल्या जन्मल्या आईच्या स्पर्शातून त्याच्यापर्यंत पोहोचलेली पहिली भावना म्हणजे 'विश्वास'. आईच्या स्पर्शातून कुठेतरी त्या बाळाला हे जाणवतं की मी ह्या हातांमध्ये सुरक्षित आहे. इतरही कुठलं नातं किंवा व्यवहार बघितला तर त्याचा पाया असतो विश्वासच.

आपण जेव्हा लग्न ठरवतो, एखाद्या व्यक्तीला होकार देतो, तेव्हा त्या दोन व्यक्तींनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी परस्परांवर दाखवलेला असतो तो विश्वास. दोन्ही बाजूंकडची माणसं एकमेकांच्या कुटुंबांची कितीही माहिती काढत असली तरी शेवटी एखाद्या व्यक्तीबद्दल १०० टक्के माहीती मिळणं कठीणच. अशावेळी समोरची व्यक्ती जे सांगते ते खरं मानून त्यावर विश्वास ठेवणं हा एकच पर्याय असतो.

एखाद्या व्यक्तीला नोकरी देताना त्या व्यक्तीवर ती संस्था/कंपनी दाखवत असते तो विश्वास. त्या व्यक्तीच्या मार्कशिट्स, व्यक्तिगत माहिती, त्याचा कामातील पूर्वानुभव या सगळ्या गोष्टींची माणसाला जोखण्यात कितीही मदत होत असली तरी त्याच्या पलीकडे जाऊन त्या व्यक्तीवर ठेवला जाणारा विश्वास हा महत्त्वाचा ठरतो; निर्णायक ठरतो.

सगळेच डॉक्टर्स M.B.B.S. असतात, पण एखाद्या डॉक्टरला पेशंट्स अतिशय मानतात. त्यामागे असतो तो त्या डॉक्टरवरचा विश्वास. हा डॉक्टर याच्या औषधाने आपल्याला बरं करेल हा विश्वास. मग अशा डॉक्टरसाठी लोकं चार पैसे जास्त मोजायलाही तयार असतात. पूर्वी 'फॅमिली डॉक्टर' ही संकल्पना होती. या डॉक्टरला अनेक कुटुंबांची खडा न खडा माहिती असायची. ते कुटुंब आणि तो डॉक्टर यांच्यात विश्वासाचं एक घट्टं नातं असायचं. आजही असे अनेक डॉक्टर्स आपल्याला बघायला मिळतात, जे फक्त औषधं देण्याचं काम करंत नाहीत तर त्यांच्याजवळ आपण आपल्या मनातले अनेक विचारही बोलून दाखवू शकतो, मन मोकळं करू शकतो. ते फक्त डॉक्टरंच नाही तर अनेकदा उत्तम समुपदेशक आणि मार्गदर्शकाचीही भूमिका बजावतात. हे सगळं शक्य होतं त्यांनी आपल्या पेशंट्सच्या मनात निर्माण केलेल्या विश्वासामुळे.

आपल्या रोजच्या बघण्यातला दुकानदार, दूधवाला, भाजीवाला कितीदा आपल्याजवळ  ५-१० रुपये कमी असले तरी आपल्याला वस्तू देतात. का? विश्वास! ही आपल्या रोजच्या बघण्यातली व्यक्ती आहे आणि पुढच्यावेळी येता-जाता आपले पैसे नक्की परत करेल हा विश्वास.

आपण रोज वेगवेगळ्या वाहनांनी प्रवास करतो-बस, ट्रेन, टॅक्सी इ. कशाच्या जोरावर? एका अनोळखी व्यक्तीवर, या वाहनांच्या चालकांवर, किती नकळत आपण विश्वास टाकत असतो, की ही व्यक्ती मला इच्छित स्थळी सुरक्षित पोहोचवणारच!

आपण निवडणुकीत एखद्या नेत्याला निवडून देतो. का? ती व्यक्ती आपल्या राज्यचा, देशाचा कारभार नीट चालवेल या विश्वासाने. आपण बँकेकडून कर्ज घेतो. विविध डॉक्युमेंट्स भरतो, आपली सॅलरी स्लिप दाखवतो. पण तरीही या सगळ्या पलीकडे जाऊन बँक कर्ज घेणार्‍यावर कुठेतरी विश्वास दाखवत असते. कारण कितीही कागद-पत्रांवर सह्या केल्या तरी कर्ज बुडवणारे असतातच की!

त्याचप्रमाणे एखादा व्यवसाय नव्याने सुरु केलेली व्यक्ती किंवा कुठलीही कंपनी बाजारात स्थिरावण्यासाठी धडपडत असतात. म्हणजे काय करत असतात? लोकांना त्यांच्याबद्दल, त्यांच्या उत्पादनांबद्दल किंवा सेवांबद्दल त्या चांगल्या आहेत हा विश्वास वाटावा हा त्यांचा प्रयत्न असतो.

या कल्पनेचा सुंदर वपर मारुती सुझुकी सर्व्हीस सेंटरच्या जाहिरातीत केलेला दिसतो. येतेय डोळ्यासमोर ती जाहिरात? एक रडणारं बाळ....कोणालाही न जुमानणारं.....रडायचं थांबतं ते फक्तं आईच्या हातात गेल्यावर. मारुतीवाले आपल्याला असाच विश्वास देण्याचा प्रयत्न यात करत आहेत. आमची गाडी आमच्या सर्व्हीस सेंटरमधे आणा. दुसरं कोणीही ती दुरुस्तं करू शकणार नाही.

तर असा हा विश्वास....याच्या आधारावर दुनिया चालतेय. एखाद्या व्यक्तीच्या मनात स्वतःबद्दल विश्वास निर्माण करणं आणि त्या विश्वासाला पात्र ठरणं ही खूप मोठी जबाबदारी असते. जेव्हा या विश्वासाला तडा जातो तेव्हा नाती बिघडतात, कधी-कधी तुटतातही, देश ढवळून निघतो, आर्थिक यंत्रणा कोलमडून पडू शकते.

आपण आपल्या आजूबाजूला कितीतरी उदाहरणं बघत असतो. एखाद्या जोडप्याचा घटस्फोट होतो, लग्नं मोडतात. मुख्यत: नवरा-बायकोच्या नात्यातला विश्वास उडून गेल्याचा हा परिणाम असतो.

आणखी एक बघण्यात आलेलं उदाहरण-दोन अगदी जवळच्या नात्यातल्या व्यक्ती. एका व्यक्तीने दुसर्‍या व्यक्तीच्या काही महत्त्वाच्या कागदपत्रांचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर केला. तेही त्या दुसर्‍या व्यक्तीला कळू न देता! पण एक दिवस ही गोष्ट उघडकीस आली. आता फक्त नातेवाईक आहेत म्हणून वरवरचे संबध आहेत. पण त्या नात्यातला विश्वास? तो तर कधीचाच हरवलाय.... हे झालं व्यक्तीगत पातळीवरचं उदाहरण.

आपल्या माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांचं उदाहरण घ्या. त्यांचे 'विश्वासू' अंगरक्षकच त्यांच्या शेवटाला कारणीभूत ठरले.

अमेरिकेतला गाजत असलेला 'सब-प्राईम' घोटाळा हे कशाचं उदाहरण आहे? अनेक वित्तीय संस्थांनी अनेक लोकांना कर्ज दिली. अगदी ती परत फेडण्याची ऐपत नसलेल्यांनाही.. हे कमी म्हणून की काय? हे कर्जदार कर्ज परत करतील असा ठाम विश्वास बाळगून ती कर्ज पुढे इतर वित्तीय संस्थांना विकली! शेवटी काय झालं? या कर्जदारांपैकी बहुतांश व्यक्ती कर्जफेड करू शकल्या नाहीत आणि आर्थिक मंदीचं दुष्टचक्र सुरु झालं त्याचा फटका आज लाखो लोकांना बसलाय आणि बसतोय.

म्हणून वाटतं; कुठल्याही गोष्टीची, नात्याची, व्यवहराची सुरुवात ही विश्वासावर आधरलेली असते. आपल्याकडे कितीही शिक्षण असलं, पैसा असला तरीही 'विश्वासार्हता' असणं हे सगळ्यात महत्त्वाचं. आपण एखादं नातं उत्तम निभावू शकतो हा विश्वास किंवा दिलेलं काम चांगल्या प्रकारे, प्रामाणिकपणे पूर्ण करू शकतो हा विश्वास आपल्या समोरच्या व्यक्तीमधे निर्माण करणं सगळ्यात महत्त्वाचं आणि तो टिकवणं, त्याला तडा जाऊ न देणं हे त्याहून महत्त्वाचं. कारण जर कुठल्याही गोष्टीतून विश्वास हरवला तर ती गोष्ट संपायला, ते नातं तुटायला वेळ तो किती लागेल? त्यामुळेच एक चांगली व्यक्ती
होण्यासाठी आपण 'विश्वासर्ह' आहोत हे सिद्ध करणं महत्त्वाचं नाही का?