काल रेडिओवर एक फोन-इन कार्यक्रम ऐकत होते। विषय होता-आपल्या आजूबाजची अशी काही माणसे जी काही वर्षांपूर्वी आपल्याला वरचेवर दिसत असत पण आतामात्र दिसणं दुर्मिळ झालंय. त्या रेडिओ जॉकीने एक उदाहरण दिलं-खारी बिस्किटवाला.
पत्र्याचा एक मोठा डबा घेऊन दारावर खारी बिस्किटं विकायला येणारा. त्या डब्यात फक्तं बिस्किटंच नाहीत तर पाव, ब्रून ब्रेड, बटर असे इतरही बरेच पदार्थ असत. तिने त्याचा उल्लेख केल्यावर मलाही आठवलं, आमच्याही बिल्डिंगमधे असा एक खारी बिस्किटवाला येत असे. बहुतेकवेळा रविवारी सकाळी. बरेच लोक त्यच्याकडून काही काही घेत असत.
तर अशी कोणकोणती माणसं तुम्हाला आठवतात ते आम्हाला फोन करून सांगा-असा त्या कार्यक्रमाचा विषय. तो कार्यक्रम काही पूर्ण ऐकू शकले नाही. पण त्या निमित्ताने अशी अनेक माणसं मला आठवायला लागली.
दूरवरून एक हाक ऐकू आली-'काळी मैना डोंगरची मैनाssss' अरे म्हटलं हा तर करवंदवाला! एप्रिल-मे सुरु झाला की ही हाक हमखास ऐकू येणारच-टोपलीत करवंद्-जांभळं असं विकायला घेऊन! हा रानमेवा खाण्याची मजाच काही और!
हा करवंदवाला जातो न जातो तोच आण्खी एक ओळखीचा आवाज कानी पडला-छुरी कात्री धारवालाsssss. एक लोखंडी स्टॅंड आणि त्याच्यावर धार करण्याचं यंत्रं बसवलेलं. ते खांद्यावर टाकून हा माणूस गल्लोगल्ली फिरत असे. आम्ही लहान असताना आम्हालाही आईने एक-दोनदा धार गेलेल्या सुर्यांना, कात्र्यांना धार काढून आणायला पाठवल्याचं आठवतंय. २-५ रुपयांत तो २-३ गोष्टींना धार काढून देत असे. काम झालं की परत स्टँड पाठुंगळी टाकून छुरी-कत्री-धारवाला चालू लागत असे दुसर्या गल्लीत.
अशीच आणखी एक कधीही न विसरता येणारी व्यक्ती म्हणजे-बोहारीण! गुजराथी पद्धतीने नेसलेली रंगीबेरंगी साडी आणि डोक्यावर ही भलीमोठी वेताची टोपली घेऊन फिरत असे. आईच्या-आजीच्या एक ८-१० जुन्या साड्या साठल्या की आई तिला हाका मारून बोलावून घेत असे. तिचे आणि आईचे ठरलेले संवाद असत. ती ८-१० साड्यांचे २०-२५ रुपयांपेक्षा जास्त द्यायला तयार होत नसे आणि आई ५० च्या खाली येत नसे. तिला कॉटनची साडी द्या ती सिंथेटिक मागे, तिला सिंथेटिक द्या ती कमी वापरलेली मागे. कधी कधी तर तिची मजल जरीची साडी मागण्यापर्यंतही गेल्याचं मला आठवतंय! शेवटी घासाघीस थांबवून आई म्हणत असे, "तुझं राहूदे, माझं राहूदे. ३० रुपये दे. याच्यापेक्षा चांगल्या साड्या तुला देऊन आम्ही काय नेसू?" हा संवाद ठरलेला! पण ती बोहारीण सुधा बोलण्यात हार जात नसे. कधी पैशांच्याऐवजी स्टीलची डबे-भांडी अशा वस्तूही देत असे. आणि तिच्याशी कितीही हुज्जत घातली तरी आईसुद्धा दुसर्या बोहारणीला कधीही बोलावत नसे.
तशीच एक कल्हईवाली बाईही येत असे आमच्या दारावर. नऊवारी साडी नेसलेली; कपाळावर मोठं कुंकू. घरोघरी जाऊन पितळेची भांडी गोळा करून न्हेत असे आणि २-३ तासांत कल्हई लावून लखलखीत करून देत असे. जणू काही नवीनच!
असाच आठवणीत राहीलेला एक माणूस म्हणजे खरवसवाला किंवा चीकवाला. गायीने वासराला जन्म दिल्यावर पहिलं जे दूध निघतं ते म्हणजे चीक. हा चीक खूप पौष्टीक असतो असं म्हणतात. तर असा हा चीक विकायला घेऊन एक माणूस दारावर येत असे. कधी चीक तर कधी तयार खरवस. दूधवाल्याच्या कॅन सारखेच कॅन त्याच्याजवळ असत. मग हा चीक कुकरमधे उकडवून कधी साखर- वेलची घालून तर कधी गूळ-केशर घालून आई त्याचा खरवस करत असे. मस्त लागत असे तो खरवस!
अशी अनेक माणसं एकेक करून मला आठवू लागली. पाट्याला टाकीssss असं ओरडत जाणारी वडारीण, कापूस पिंजून देणारा पिंजारी, आमावस्या झाली किंवा ग्रहण सुटलं की हमखास कहीतरी मागायला येणारी बाई-दे दान सुटे गिराण किंवा येऊ द्या अमुशा असं ओरडणारी. काही लोक तिला॑ पैसे देत, काही शिळी भाजी-पोळी तर काहीजण धान्यं.
कुठे गेली ही सगळी माणसं? पूर्वी वरचेवर दिसणारी, आपल्या जीवनशैलीचा एक हिस्सा असलेली. पण आता एकदम गायब झालेली?
पूर्वी वाडे-चाळी होत्या तेव्हा या लोकांचा सर्वत्र संचार असे. त्यांना अडवणारं कोणी नव्हतं. पण हळूहळू वाडे-चाळी पाडल्या जाऊ लागल्या. लोकं फ्लॅट्स मधे रहायला गेली. सोसायट्या निर्माण झाल्या. सोसायटीला वॉचमन आला आणि या लोकांना आत येण्यास मज्जाव झाला. सोसायटीच्या प्रवेशद्वारावर पाट्या लटकल्या-'फेरीवाले व विक्रेते यांना प्रवेश करण्यास सक्त मनाई!'
किती नकळतपणे आपण या सगळ्या लोकांना आपल्यापासून दूर केलं? आपल्या सतत उंचावणार्या standard of living मुळे तांब्या-पितळेची जागा stainless steel ने घेतली आणि कल्हईवाली आणि पाट्याला टाकी लावणारीची गरज आपल्याला आपसूकच भासेनशी झाली.
कालच्या रेडिओवरच्या कार्यक्रमामुळे विस्मॄतीत गेलेली ही माणसं पुन्हा एकदा भेटली-आठवणींत!!
रविवार, ५ जुलै, २००९
आपण यांना पाहिलंत का?
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
Aho tumhi kuthe rahat hota. Karan majhya ghara chya aas paas hi ashi manse yaaychi ani ti ata kami jhali. Ajun athavtat ti mhanje chana-jor garam vale, kinwa kargote wale, mhatari cha kapus vale, vagaire vagaire. Kharach changla article aahe tumcha. Junya athavani deun gele. Aaj kahi kaam nahi honar ata. Ya athavani yet rahanar. Pan tyaat hi titkich maja aahe nahi ka. Dhanyavaad.
उत्तर द्याहटवाहे असे अनेक फेरीवाले/वाल्या अन त्यांच्या टिपीकल आरोळ्या, लकबी, क्वचित गळेपडूपणा.... जिव्हाळ्याचे विषय आहेत. माझे बालपण चाळीत गेल्याने यातली मजा भरभरून अनुभवलीये:)
उत्तर द्याहटवालेख छान.
व्युत्पन्न, भानस,
उत्तर द्याहटवातुमच्या प्रतिक्रियांबद्दल आभार. माझही बरचसं लहानपण चाळीत गेलं, माहीमला. जवळ जवळ दहवीपर्यंत. त्यामुळे हा कार्यक्रम ऐकल्यावर मी ही काहीशी नॉस्टॅल्जिक झाले :)
Aga tuza ha lekh vachun mala pan Punyala aamchya wadyat yenarya kahi mansanchi aathvan zali.Dar varshi Shravan mahinyat roj 'aaghada, durva, phule' asa ordat ek bai yet ase. Tila dhanya deun tichyakadun phule vagaire ghet asu. Tasach pavsala ani hivalyat roj ek mulga yaycha. Aalepak vikayla. 'Sardi-khokla zatpat mokla. aalyachi vadi- aalepak' asa chhan chal laun mhanaycha.ankhi ek bai yaychi ti mhanje suya biba vali. Tichyakade tar kaykay vegveglya vastu asaychya vikayla. Kharach aata ya saglya goshti aathvlya ki maja watate.ani majeche divas gele mhanun thodasa vaitahi watata.
उत्तर द्याहटवा