रविवार, २९ नोव्हेंबर, २००९

पणजी

'माई', माझी पणजी. म्हणजे बाबांची आजी, त्यांच्या वडिलांची आई.

लहानपणापासूनच माझ्या मनात तिची काही फार चांगली प्रतिमा नव्हती. शेवटच्या दिवसांत अंथरुणाला खिळलेली. माझे आई, बाबा, आजी, आत्त्या सगळ्यांना तिचं करावं लागे. सगळ्यांशी सतत तिचे वाद होत. मी तिची फारशी आवडती नव्हते. कारण तिला मुळात मुलीच विशेष आवडायच्या नाहीत. कदाचित 'स्त्री' म्हणून आयुष्यात तिने जे भोगलं त्याचा परिणाम असेल!

या सगळ्यामुळे माझ्या मनात 'पणजीला मी आवडत नाही' आणि 'तिच्यामुळे घरातल्या सगळ्यांना त्रास होतो' ह्याच दोन गोष्टी घर करून बसलेल्या! तिच्या पुर्वायुष्याबद्दल आई-आजीकडून बरंच काही ऐकलेलं. पण ते लक्षात घेऊन त्यावर विचार करून तिची बाजू समजून घेण्याचं माझं तेव्हा वय नव्हतं.

मी ९-१० वर्षांची असताना ती गेली, ८२-८३ वर्षांची होऊन. म्हणजे साधारण १९९२ साली. त्यानंतर इतक्या वर्षांनी परवा मला तिची प्रकर्षाने आठवण झाली. निमित्त होतं 'लोकसत्ता' मधील एक सदर! नवर्‍याने टकलेल्या किंवा त्याच्या मॄत्युपश्चात चरितार्थ चालविण्यासाठी घराबहेरपडून धडपड केलेल्या आणि हे करतानाच नावारूपाला आलेल्या काही स्त्रियांच्या आत्मचरित्राची ओळख करून देणारं हे सदर. दर शनिवारी 'चतुरंग' मधे न चुकता वाचते. पण एका शनिवारी मात्र ते वाचताना माझी पणजी डोळ्यासमोर उभी राहिली. वाटलं, आपण जे तिच्याबद्दल ऐकलंय ते फार काही वेगळं नाही! पण फरक इतकाच की ती प्रसिद्धीच्या झोतात आली नाही आणि लोकांच्या कौतुकाचा विषय ठरली नाही. उलट टीकेलाच सामोरी गेली............

१९१०-११ सालचा जन्म असवा तिचा. त्या काळी मुलगी होणं हीच मुळात आनंदाची बाब नव्हती. त्यातून ही दिसायला बेताची आणि काळी. म्हणजे दुष्काळात तेरावा महीना! हिचं लग्नं कस होणार ही घरच्यांना काळजी. म्हणून बिजवराशी लग्नं लावलं; म्हणजे माझ्या पणजोबांशी. दोघांमधे जवळ जवळ २० वर्षांचं अंतर. पण ते नाटककंपनीवाले आणि त्यातून विधुर आणि ही काळी आणि दिसायला बेताची. असा योग (?) जुळून आला आणि त्यांचं लग्नं झालं. १२-१३ वर्षांची असेल माझी पणजी तेव्हा. लग्नं आणि नवरा म्हणजे काय हे ही न कळण्याच्या वयाची. नवरा जवळ आला तरी भीती वाटत असे म्हणायची!!

तर असा तिचा संसार सुरु झाला. घरात खायला-प्यायला काही कमी नव्हतं. नाटककंपनीही छान चालू होती. पणजोबाही कष्टाळू होते. याच दरम्यान माझ्या आजोबांचा जन्म झाला आणि ते जेमतेम ८-१० वर्षांचे असताना माझे पणजोबा गेले......पणजी तेव्हा जेमतेम २४-२५ वर्षांची असेल. हल्ली ज्या वयात मुलींची लग्नं होतात, त्या भावी आयुष्याची स्वप्नं रंगवतात, त्या वयात ती विधवा झाली आणि पदरात एक लहान मूल!

चुलत्यांनी तिला नेसत्या वस्त्रानिशी बाहेर काढलं. हातावर एक छदामही न ठेवता.....काय अवस्था झाली असेल तिची तेव्हा? पण ती डगमगली नाही. माझ्या आजोबांना दूरच्या एका नातेवाईकाकडे ठेवून तिने नर्सिंगचा कोर्स पूर्ण केला आणि एका हॉस्पिटलमधे नोकरी मिळाली. चरितार्थाचा प्रश्न सुटला!

पण तिच्या आयुष्याचं काय झालं? तिला आयुष्यात तसं काहीच सुख मिळालं नाही, पण तिच्याकडे धडाडी होती. ती एकटी जवळ-जवळ अख्खा भारत फिरली. अगदी अमरनाथ यात्रा सुद्धा केली तिने. त्या काळी बेलबॉटमची फॅशन होती. तिने ती घालूनही एक फोटो काढून घेतला होता म्हणे! एकटी हॉटेलमधे सुद्धा जात असे ती.

आमच्या काही नातेवाईकांना, आजूबाजूच्या लोकांना तिचं हे वागणं असभ्य, बेलगाम वाटायचं. तिच्याबद्दल कोणी कधी फारसं चांगलं बोलल्याचं मला आठवत नाही. कदाचित`'विधवा' स्त्री ही सुद्धा एक माणूस आहे, तिलाही तिच्या भावभावना आहेत हे त्यांना मान्यच नसावं. किंवा मान्य असलं तरी फक्त 'विधवा' म्हणून तिने स्वतःला सर्व बंधनांत अडकवून घेऊन एक चाकोरीबद्धं आयुष्यं जगावं ही त्यांची मानसिकता असावी.

पण या सगळ्याचा आता तिच्या बाजूने विचार केला तर वाटत की तिचं नक्की काय चुकलं??

वयाच्या २४-२५व्या वर्षी नवरा गेला ही तिची चूक होती? नातेवाईकांनी आधार द्यायचा सोडून बेघर केलं ही तिची चूक होती? मग त्यांना तिच्यावर टीका करायचा काय अधिकार?

तिला तिच्या इच्छा, आकांक्षा, भावना काहीच नसतील का? त्या तिला पूर्ण कराव्याश्या वाटल्या तर काय बिघडलं? तिला फिरायला चल म्हणणारं कोण होतं? किंवा तिची आवड लक्षात घेऊन कोण काही आणून देणार होतं?

त्या काळी बायकांनी दुसरं लग्नं करणंही सोपं नव्हतं आणि केलं तरी आपल्या मुलाला तिथे स्विकारतील की नाही, नीट वागवतील की नाही ही दुसरी चिंता!

असं सगळं असतानाही ती खंबीरपणे उभी राहीली. रडत न बसता परिस्थितीतून मार्ग काढला. 'लोक काय म्हणतील?' हा विचार तिने कधीच केला नाही. कारण लोक एकवेळ मदतीला पुढे येणार नाहीत पण टीका करण्यात मात्र अजिबात मागे राहणार नाहीत हे तिला कधीच उमगलं असावं......

अशी माझी पणजी अतिशय स्वावलंबी होती. रिटायर्ड झाल्यानंतरही कोणी आजारी असेल तर इंजेक्शन वगैरे द्यायला ती जात असे. अगदी अंथरूणाला खिळेपर्यंत स्वतःची सगळी कामं स्वत: करत असे. आयुष्यात एवढे वाईट दिवस बघूनही तिच्याकडे सकारात्मक दॄष्टीकोन होता. माझ्या भावाला खेळवताना म्हणे ती म्हणायची, माझा मुलगा मॅट्रिक झाला, नातू इंजिनिअर झाला, पणतू आणखी शिकेल.....खूप मोठा होइल.......

आता या सगळ्याचा विचार केला॑ की तिचं खूप कौतुक वाटतं आणि तिच्या खंबीरपणाला, धडाडीला दाद द्यावीशी वाटते.

रडत न बसता आणि कोणाच्या मदतीची अपेक्षा न करता तिने परिस्थितीशी सामना केला. आपलं आयुष्यं मार्गी लावलं. कुठून आलं असेल हे बळ तिच्यात? खरंच आश्चर्यं वाटतं. आणि मनोमन कबूल केलं जातं की भले तिने काही समाजकार्य केलेलं नसूदे, प्रसिद्धीच्या झोतात आलेली नसूदे परंतु तिला प्रतिकूल अशा या समाजात, खंबीरपणे उभं राहून तिने तिच्या आयुष्याचा प्रश्नं सोडवला होता. हे ही काही कमी नव्हतं!!

५ टिप्पण्या:

  1. त्या काळी असंच होतं . प्रत्येक घरामधे एक तरी विधवा असायची ,आणि तिचं आयुष्य अगदी नकोसं करुन टाकलं जायचं.. छान लिहिलंय..

    उत्तर द्याहटवा
  2. > तिला फिरायला चल म्हणणारं कोण होतं?
    >

    अहो श्रेयाबाई बापट : १९३०-१९४० कडे बायकोची चमचेगिरी करणारे नवरेसुद्‌धा तुरळक अपवाद सोडल्यास 'फिरायला चल' वगैरे म्हणत नसत. आज़ही एक १९७० आसपास जन्मलेला माणूस फक्त पुण्यात बायकोला स्कूटरवर मागे बसू देतो. त्याच्या तालुक्याच्या गावी ते त्याला चालत नाही. इतर ज़ोडपी एकत्र जाताना तो पाहतो, तरी त्याला स्वतःला चालत नाही. हे ऐकून आम्ही पुण्यातले काही मित्र गारच झालो.

    > मी तिची फारशी आवडती नव्हते. कारण तिला मुळात मुलीच विशेष आवडायच्या नाहीत. कदाचित 'स्त्री' म्हणून आयुष्यात तिने जे भोगलं त्याचा परिणाम असेल!
    >----

    कमलाबाई गोखल्यांनाही (त्यांची मुलं म्हणजे चंद्रकांत आणि तबलावाले लालजी, आणि नातू म्हणजे विक्रम) मुली आवडायच्या नाहीत. एका मुलाखतीत त्या म्हणाल्या की त्यांना मुलगी झाली नाही हे त्या देवाचे आभार मानतात. मुलाखत घेणारीनी 'असं का' विचारलं. नक्की शब्द आठवत नाहीत, पण त्या मुलीच्या केसांकडे हात करून त्या म्हणाल्या की तुम्ही असले झिपरे केस करून, चित्रविचित्र थेरं करून हिंडता-फिरता, ते घरच्या मुलीकडून सहन झालं नसतं. बाई तेव्हा नव्वदीत असेल पण बिनधास्त शिवीगाळ करत बोलत होती. ती मुलाखत १०-१२ वर्षांपूर्वी अनेकदा दाखवत असत.

    उत्तर द्याहटवा
  3. श्रेयाबाई: वरची प्रतिक्रिया न पटल्यास, विषयांतर वाटत असल्यास, काढून टाकायची इच्छा झाल्यास ज़रूर तसं करा. विषय तुमच्या पणजीचा आहे, पण मला एकदम कमलाबाई गोखलेच आठवल्या.

    उत्तर द्याहटवा
  4. आपल्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. विषयांतर होण्याचा प्रश्न नाही. माझं म्हणणं इतकंच की केवळ एखादी स्त्री विधवा झाली म्हणून तिने आपल्या सर्व आवडी-निवडी मारून जगायचं-फक्त समाजाने बोट उचलू नये म्हणून, हे मनाला पटत नाही. राहिला प्रश्न फिरायला चल म्हणण्याचा. तुमचं म्हणणं पटलं. पण ही एक गोष्ट सोडूनही इतर अनेक गोष्टी असतात, ज्या नवरा असताना केल्या तर चलतात, पण नवरा गेल्यावर दुसर्‍या क्षणी निषिद्ध होतात. त्यांचं काय?

    उत्तर द्याहटवा
  5. I had posted a follow-up comment on Nov 30, but got an error message. If the current response goes through and you are interested in continuing the discussion, please contact me at dn.usenet at gmail acct.

    - dn

    उत्तर द्याहटवा