शनिवार, २ एप्रिल, २०११

डोळे मिटलेली माणसं

एका मैत्रीणीशी फोनवर बोलत होते.


मी: आजची हेडलाईन बघितलीस? पॉल द ऑक्टोपस गेला!

ती: कोण पॉल द ऑक्टोपस? कोणी माणूस होता का?

मी: अगं ऑक्टोपस! ऑक्टोपस माणूस कसा असेल?

ती: अगं पण कोण होता हा?

म्री: तू पेपर वगैरे वाचतेस की नाही? गेला महिनाभर वर्ल्ड-कप फुटबॉलच्या विजेत्यांबद्दल भाकितं वर्तविणारा जर्मनीच्या एका प्राणी संग्रहालयातील हा ऑक्टोपस जगभर चर्चेचा विषय झालाय आणि तुला काहीच माहीत नाही?
ती: हो का! मला काही कल्पना नाही. आमच्याकडे पेपर येत नाही गं!
मी: टी. व्ही. वर सुद्धा बातम्या दाखवतात! आणि इंटरनेट वरही ही सोय उपलब्ध आहे. तिथे पण कधी वाचत नाहीस?

ती: अगं, रोजच्या रामरगाड्यात कुठे या सगळ्याला वेळ होतो?

प्रसंग दुसरा:
आम्ही ज्या छोट्याशा आखाती देशात - बहारिन मधे रहातो, तिथे गेला महिना-दीड महिना राजकीय अस्थिरता आहे. विविध ठिकाणी मोर्चे, निदर्शने चालू आहेत. मध्यंतरी तर परिस्थिती आटोक्यात ठेवण्याकरता सौदी आणि संयुक्त अरब अमिरातीहून सैन्य मागविण्यात आले आणि हा छोटासा, टिकलीएवढा देश इंटरनॅशनल न्यूज मधे गाजू लागला. त्या दरम्यान एका मैत्रीणीचा दुबईहून मला फोन आला: "अगं काय चाललं आहे बहारिनमधे? कसे आहात तुम्ही सगळे? म्हणजे आज ऑफिस मधे सगळेजण चर्चा करत होते म्हणून मला कळंलं नाहीतर मला पत्ताच नव्हता!



मी अवाक! म्हटलं, "गेले किती दिवस न्यूज चॅनल्स जपान नंतर बहारिनला प्राधान्य देऊन सतत तिथल्या घडामोडी दाखवत आहेत आणि तुला आज कळलं?" तेव्हा मला परत आधीचंच उत्तर ऐकायला मिळालं, "अगं, कोण वाचतंय पेपर वगैरे! टी. व्ही. बघायला तरी वेळ कोणाला आहे!



प्रसंग तिसरा:



ऑफिसमधल्या एका साऊथ-इंडियन मैत्रीणीशी बोलत होते. बोलता-बोलता वैष्णोदेवीचा विषय निघाला. तर म्हणाली काय आहे हे वैष्णोदेवी? तिच्याशी आणखी काही वेळ बोलल्यावर लक्षात आलं, तिचं जग केरळ पुरतंच सीमित आहे. केरळच्यावर सुद्धा भारत देश पसरलेला आहे याची बहुधा तिला कल्पनाच नसावी! बरं, वैष्णोदेवी माहीत असण्यासाठी तिथे काही प्रत्यक्ष जाऊनच यायची गरज आहे असं नाही! कधी हिंदी चित्रपट बघितले असतील तरी वैष्णोदेवी माहीत असू शकते. पण मग कळलं की ती हिंदी चित्रपट विशेष पहातच नाही. बरं, मग तुझ्या मातॄभाषेतील तरी? ते ही नाही. इंग्रजी तरी? नाही! चित्रपटच फार क्वचित बघते! बरं, मग वीकेन्ड्सना किंवा सुट्ट्यांमधे काय करता? कुठे फिरायला वगैरे जाता? नाही! पुस्तकं तरी वाचता कधी? नाही, शिक्षण संपल्यानंतर कधी पुस्तकच हातात घेतलं नाही! बरं, परवाची भारत-पाकिस्तान क्रिकेट मॅच तरी बघितली का? नाही, क्रिकेटमधे मला विशेष रस नाही. ( मनात आलं, क्रिकेट न कळणारी किंवा न आवडणारी माणसंसुद्धा भारत-पाकिस्तान मॅच म्हटल्यावर टी. व्ही. कडे डोळे लावून बसलेली असतात!)



या प्रसंगानंतर माझी बोलतीच बंद झाली! आपण ज्या समाजात राहतो त्या समाजात काय चाललं आहे याच्याशी काही लोकांचा सुतराम संबंध नसावा? कशी राहू शकतात ही माणसं एवढी डोळे मिटून, एवढी अलिप्तं? रोजचा रामरगाडा कोणाला चुकलाय? ऑफिस, घरकाम या गोष्टी सर्वच जण करतात. पण या गोष्टी एखाद्याच्या समाजिक अलिप्ततेचं कारण कशा असू शकतात? रोजच्या व्यस्त दिनचर्येतून थोडा का होईना वेळ काढून आजूबाजूच्या घटनांबद्दल दक्ष असणे हे सुजाण नागरिकाचे कर्तव्य नाही का?



आपलं व्यवस्थित चाललं आहे ना, मग झालं तर. बाकी समाजात काही का होइना, मला काय त्याचे? ही वॄत्ती बळावत चालली आहे असं आजकाल प्रकर्षाने वाटतं. वर सांगितलेल्या सर्व प्रतिक्रिया सधारण ३०-३५ वयोगटातील माझ्या मित्र-मैत्रीणींकडून/सहकर्यांकडून ऐकायला मिळालेल्या. सर्वजण 'सुशिक्षित', नोकर्‍या-चाकर्‍या करणारे. बरेचजण मुलांचे पालक. त्यांच्या मुलांना उत्तम, सजग आणि जबाब्दार नागरिक बनविण्याची केवढी मोठी जबाबदारी आहे त्यांच्यावर! पण हे स्वतःच जर समाजाबद्दल एवढे उदासिन असतील तर ते आपल्या मुलांना काय शिकविणार? बरं, यांना राजकारणात, इतर आंतरराष्ट्रीय घडामोडींत, चित्रपट, संगीत, खेळ या कशात रस नाही तर नाही. निदान ते ज्या क्षेत्रात काम करत आहेत त्याबद्दल तरी अस्था आहे का? त्या क्षेत्रात काय चाललं आहे, काय बदल होत आहेत किंवा शोध लागत आहेत याच्याशीही त्यांना कर्तव्य नाही!



मग यांना रस आहे तरी कशात? रोज ही माणसं करतात तरी काय? एवढं डोळे मिटून रहाणं बरोबर आहे का? त्यांच्या या डोळे मिटून रहाण्यामुळे त्यांचं काही नुकसान होतंय असंही त्यांना वाटत नाही. आणि आपण त्याची जाणीव करून द्यायचा प्रयत्नं केला तर त्यांच्या रोजच्या 'व्यस्त' दिनचर्येचा पाढा वाचायला ते तयारच असतात! या डोळे मिटलेल्या माणसांना जागं करणार तरी कोण आणि कसं????

शनिवार, २१ ऑगस्ट, २०१०

अपना सपना मनी मनी..............?

आज सकाळी ऑफिसला निघाले होते. माझा नेहमीचा ड्रायव्हर सुटीवर गेल्यामुळे त्याने दिलेल्या बदली ड्रायव्हर बरोबर गप्पा मारत होते. त्याच्या बरोबर झालेला हा संवादः
मी: किती वर्ष आहात बहारिनमधे?
तो: सहा वर्षं झाली.
मी: एकटेच असता का कुटुंबही असतं बरोबर?
तो: एकटा नाही, बायको, मुलंही असतात इथे.
मी: चांगलं आहे. एकटं रहायचं आणि ते ही परदेशात......खूप कठीण जातं.
तो: हो ना. आणि मला सांगा, आपण आयुष्यभर कुटुंबासाठी राब राब राबायचं आणि
त्यांच्यापासून दूर आपणंच एकटं रहायचं? काय मजा? आपलं आयुष्यं ते किती! आजकाल कधी काय होईल याचा भरवसा नाही. असं असताना आहे ते आयुष्यं आनंदात जगायचं! उद्याची जास्त चिंता करायची नाही.
मी: हं, बरोबर आहे. पण कुटुंबाला घेवून इथे रहाणं पैशाच्या दॄष्टीने सगळ्यांनाच परवडतं असं नाही ना?
तो: हो, ते ही बरोबर आहे. पण पैसा पैसा किती करायचं? आपल्यासाठी पैसा कि पैशासाठी आपण?

(असं म्हणून त्याने मला जो प्रसंग सांगितला तो अंगावर काटा आणणारा होता......)

तो: माझा एक मित्रं होता. एकटाच रहात असे इथे. बायको, मुलं केरळमधे. दर महिन्याला मिळणार्‍या पगारातला महत्त्वाचा हिस्सा त्यांना पाठवत असे. उरलेल्या पैशात काटकसरीने रहात असे. स्वत:च्या खाण्यापिण्याकडे लक्षं नाही. त्यातल्या त्यात स्वस्तं मिळेल ते (मग ते अबर्-चबर का असेना.....) खात असे. दर ३-४ वर्षांनी एकदा केरळला जात असे. बर्‍यापैकी पैसा जमवला होता. केरळला घरही बांधलं होतं. आम्ही त्याला नेहमी सांगायचो की इतका पैशामागे लागून काय मिळवणार आहेस तू? जरा स्वत:कडेही लक्षं दे. खाण्यापिण्याची आबाळ करू नकोस. नीट रहा. पण आम्हाला उडवून लावत असे नेहमी. एकदा तो असाच केरळला जाणार होता. बायकोला, मुलांना भेटण्यासाठी. सगळी तयारी झाली होती. पण सुटीवर जायच्या आधी २ दिवस त्याला massive heart attack आला..... मीच त्याला हॉस्पिटल मधे घेवून गेलो. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. डॉक्टरने सांगितलं की आम्ही याला वाचवू शकत नाही. भरीत भर म्हणजे त्याचं BP सुद्धा वाढलं आणि ब्रेन हॅमरेज झालं..... आणि शेवटी तो गेला..... काय मिळवलं त्याने पैसा-पैसा करून? स्वत: त्याचा कधीच उपभोग घेऊ शकला नाही.... आता त्याच्या कुटुंबाला कोण आधार देणार?

त्याने सांगितलेला प्रसंग ऐकून क्षणभर छातीत धस्सं झालं.... आणि तेव्हाच काही दिवसांपूर्वी घडलेला दुसरा प्रसंग माझ्या डोळ्यासमोर तरळून गेला.

माझी कलीग मला सांगत होती. तिच्या मुलाला बरं नव्हतं. लंगडत चालत होता. चांगला बास्केट बॉल खेळणारा मुलगा, पण पायामुळे सगळं बंद होतं. ती त्याला डॉक्टरकडे घेऊन गेली. डॉक्टरने पायाला विश्रांती द्यायला सांगितली आणि त्याचबरोबर एक विशिष्टं प्रकारचं बँडेज वापरण्याचा सल्ला दिला. हिने ३-४ दुकानांत चौकशी केली. ७०० रुपयांपासून-१५०० रुपयांपर्यंत वेगवेगळी किंमत तिला सांगितली. तिने आमच्या ऑफिसमधे
चौकशी केली की हे आमच्या मेडिकल पॉलिसीमधे कव्हर होतं का? तिला नाही हे उत्तर मिळालं. झालं..हिने बॅंडेज घेण्याचा निर्णय पुढे ढकलला. मी हे सगळं ऐकून अवाक! गेली १९-२० वर्ष ती बहारिनमधे रहातेय. नवरा-बायको दोघं नोकरी करतात. तरीही १५०० रुपयांच्या बॅंडेजसाठी एवढा चिकटपणा? मी न रहावून तिल विचारलं, "अगं तुला पैसे महत्त्वाचे की तुझ्या मुलाचा पाय?" यावर ती पटकन म्हणाली, "अगं, आणखी १० दिवसांतच मी आठवडाभरासाठी मुंबईला जाणार आहे तेव्हा तिकडे बघेन स्वस्तात मिळतं का ते!" मनातल्या मनात मी डोक्यावर हात मारला आणि आमचा संवाद जास्त न वाढवता तिथून चालती झाले..

तेव्हापासून माझ्या डोक्यात एकच विचार घुमू लागला- आपण पैसा का कमावतो? पैशासाठी आपण की आपल्यासाठी पैसा?

पैशाची बचत, गुंतवणूक करणं, आपला पैसा कसा वाढेल ते बघणं, आपल्या निवॄत्तीनंतर कोणाच्या तोंडाकडे न बघता, स्वावलंबीपणे जगता यावं इतका पैसा गाठीशी असणं हे सगळं बरोबर आहे. किंबहुना ते मह्त्त्वाचंही आहे. पण म्हणून नको तिथे चिकटपणा का? स्वत:वर, आपल्या मुलाबाळांवर पैसा खर्च नाही करायचा तर कुठे खर्च करायचा? आपल्या आरोग्यापेक्षा, आनंदापेक्षा पैसा महत्त्वाचा असतो का? आणि पैसा पैसा करताना आपल्यालाच डाव अर्ध्यावर सोडून जावं लागलं तर त्या पैशाचा काय उपयोग आहे? ही पैशाच्या मागे धावणारी लोकं म्हणजे आधुनिक गझनीचे महमूदच नाहीत का? आज जगात सगळीकडेच वातावरण इत़कं अस्थिर आहे की माणसाला उद्याचा भरवसा रहिलेला नाही. दररोज कुठल्या ना कुठल्या नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तीला तोंड देत लोक जगत आहेत. कधी दहशतवाद्यांचा हल्ला, तर कधी बाँबस्फोट, कधी प्लेन क्रॅश, तर कधी चक्रीवादळ किंवा पूर. असं असताना आला दिवस साजरा करायचा सोडून काही लोक प्रत्त्येक क्षणी पैशाचा नको इतका विचार करून आयुष्यातल्या आनंदाच्या किती क्षणांना मुकत असतील?

त्यामुळेच मी मधे कुठेतरी ऐकलेलं वाक्यं आठवलं 'Money is not heart of life it's a part of life' आणि असं वाटलं की प्रत्येकजण हे लक्षात ठेऊन त्याप्रमाणे वागला तर किती छान होईल?

शुक्रवार, २२ जानेवारी, २०१०

विश्वास

मध्यंतरी मला एक प्रश्न पडला, हे जे आपलं माणसांचं जग आहे ते कशावर चालतं? म्हणजे अशी कोणती गोष्ट आहे, भावना आहे, किंवा मूल्य आहे ज्याच्यामुळे आपल्या या जगातले व्यवहार चालू असतात? प्रेम? हे एक उत्तर असू शकतं. पण तसं बघायला गेलं तर प्रेम हे कौटुंबिक संबंध आणि आपले आप्त-मित्रं यांच्यापर्यंतच मर्यादित असतं. एखाद्या त्रयस्थ व्यक्तीशी व्यवहार करताना बरेचदा तिथे प्रेमाचा काही संबंध नसतो. मग काय असू शकेल? पैसा? हे पण एक उत्तर असू शकतं. पैशाभोवती दुनिया फिरते, पैसा टाकला की सारी कामं होतात असं म्हणतात. पण या सगळ्या पलीकडे एक गोष्ट असते जी कुठल्याही नात्याच्या, व्यवहाराच्या मुळाशी असते. आणि ती म्हणजे 'विश्वास'......
तसं बघितलं तर आपल्या बोलण्यात हजारदा येणारा हा शब्दं, पण उच्चारताच खूप मोठ्या जबाबदारीची जाणीव करून देणारा. कळत-नकळत आपण रोज हजारो लोकांवर विश्वास टाकत असतो. आणि त्याच्यामुळेच तर हे जग चाललंय!

म्हणजे बघा ना, अगदी मूल जन्मल्या जन्मल्या आईच्या स्पर्शातून त्याच्यापर्यंत पोहोचलेली पहिली भावना म्हणजे 'विश्वास'. आईच्या स्पर्शातून कुठेतरी त्या बाळाला हे जाणवतं की मी ह्या हातांमध्ये सुरक्षित आहे. इतरही कुठलं नातं किंवा व्यवहार बघितला तर त्याचा पाया असतो विश्वासच.

आपण जेव्हा लग्न ठरवतो, एखाद्या व्यक्तीला होकार देतो, तेव्हा त्या दोन व्यक्तींनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी परस्परांवर दाखवलेला असतो तो विश्वास. दोन्ही बाजूंकडची माणसं एकमेकांच्या कुटुंबांची कितीही माहिती काढत असली तरी शेवटी एखाद्या व्यक्तीबद्दल १०० टक्के माहीती मिळणं कठीणच. अशावेळी समोरची व्यक्ती जे सांगते ते खरं मानून त्यावर विश्वास ठेवणं हा एकच पर्याय असतो.

एखाद्या व्यक्तीला नोकरी देताना त्या व्यक्तीवर ती संस्था/कंपनी दाखवत असते तो विश्वास. त्या व्यक्तीच्या मार्कशिट्स, व्यक्तिगत माहिती, त्याचा कामातील पूर्वानुभव या सगळ्या गोष्टींची माणसाला जोखण्यात कितीही मदत होत असली तरी त्याच्या पलीकडे जाऊन त्या व्यक्तीवर ठेवला जाणारा विश्वास हा महत्त्वाचा ठरतो; निर्णायक ठरतो.

सगळेच डॉक्टर्स M.B.B.S. असतात, पण एखाद्या डॉक्टरला पेशंट्स अतिशय मानतात. त्यामागे असतो तो त्या डॉक्टरवरचा विश्वास. हा डॉक्टर याच्या औषधाने आपल्याला बरं करेल हा विश्वास. मग अशा डॉक्टरसाठी लोकं चार पैसे जास्त मोजायलाही तयार असतात. पूर्वी 'फॅमिली डॉक्टर' ही संकल्पना होती. या डॉक्टरला अनेक कुटुंबांची खडा न खडा माहिती असायची. ते कुटुंब आणि तो डॉक्टर यांच्यात विश्वासाचं एक घट्टं नातं असायचं. आजही असे अनेक डॉक्टर्स आपल्याला बघायला मिळतात, जे फक्त औषधं देण्याचं काम करंत नाहीत तर त्यांच्याजवळ आपण आपल्या मनातले अनेक विचारही बोलून दाखवू शकतो, मन मोकळं करू शकतो. ते फक्त डॉक्टरंच नाही तर अनेकदा उत्तम समुपदेशक आणि मार्गदर्शकाचीही भूमिका बजावतात. हे सगळं शक्य होतं त्यांनी आपल्या पेशंट्सच्या मनात निर्माण केलेल्या विश्वासामुळे.

आपल्या रोजच्या बघण्यातला दुकानदार, दूधवाला, भाजीवाला कितीदा आपल्याजवळ  ५-१० रुपये कमी असले तरी आपल्याला वस्तू देतात. का? विश्वास! ही आपल्या रोजच्या बघण्यातली व्यक्ती आहे आणि पुढच्यावेळी येता-जाता आपले पैसे नक्की परत करेल हा विश्वास.

आपण रोज वेगवेगळ्या वाहनांनी प्रवास करतो-बस, ट्रेन, टॅक्सी इ. कशाच्या जोरावर? एका अनोळखी व्यक्तीवर, या वाहनांच्या चालकांवर, किती नकळत आपण विश्वास टाकत असतो, की ही व्यक्ती मला इच्छित स्थळी सुरक्षित पोहोचवणारच!

आपण निवडणुकीत एखद्या नेत्याला निवडून देतो. का? ती व्यक्ती आपल्या राज्यचा, देशाचा कारभार नीट चालवेल या विश्वासाने. आपण बँकेकडून कर्ज घेतो. विविध डॉक्युमेंट्स भरतो, आपली सॅलरी स्लिप दाखवतो. पण तरीही या सगळ्या पलीकडे जाऊन बँक कर्ज घेणार्‍यावर कुठेतरी विश्वास दाखवत असते. कारण कितीही कागद-पत्रांवर सह्या केल्या तरी कर्ज बुडवणारे असतातच की!

त्याचप्रमाणे एखादा व्यवसाय नव्याने सुरु केलेली व्यक्ती किंवा कुठलीही कंपनी बाजारात स्थिरावण्यासाठी धडपडत असतात. म्हणजे काय करत असतात? लोकांना त्यांच्याबद्दल, त्यांच्या उत्पादनांबद्दल किंवा सेवांबद्दल त्या चांगल्या आहेत हा विश्वास वाटावा हा त्यांचा प्रयत्न असतो.

या कल्पनेचा सुंदर वपर मारुती सुझुकी सर्व्हीस सेंटरच्या जाहिरातीत केलेला दिसतो. येतेय डोळ्यासमोर ती जाहिरात? एक रडणारं बाळ....कोणालाही न जुमानणारं.....रडायचं थांबतं ते फक्तं आईच्या हातात गेल्यावर. मारुतीवाले आपल्याला असाच विश्वास देण्याचा प्रयत्न यात करत आहेत. आमची गाडी आमच्या सर्व्हीस सेंटरमधे आणा. दुसरं कोणीही ती दुरुस्तं करू शकणार नाही.

तर असा हा विश्वास....याच्या आधारावर दुनिया चालतेय. एखाद्या व्यक्तीच्या मनात स्वतःबद्दल विश्वास निर्माण करणं आणि त्या विश्वासाला पात्र ठरणं ही खूप मोठी जबाबदारी असते. जेव्हा या विश्वासाला तडा जातो तेव्हा नाती बिघडतात, कधी-कधी तुटतातही, देश ढवळून निघतो, आर्थिक यंत्रणा कोलमडून पडू शकते.

आपण आपल्या आजूबाजूला कितीतरी उदाहरणं बघत असतो. एखाद्या जोडप्याचा घटस्फोट होतो, लग्नं मोडतात. मुख्यत: नवरा-बायकोच्या नात्यातला विश्वास उडून गेल्याचा हा परिणाम असतो.

आणखी एक बघण्यात आलेलं उदाहरण-दोन अगदी जवळच्या नात्यातल्या व्यक्ती. एका व्यक्तीने दुसर्‍या व्यक्तीच्या काही महत्त्वाच्या कागदपत्रांचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर केला. तेही त्या दुसर्‍या व्यक्तीला कळू न देता! पण एक दिवस ही गोष्ट उघडकीस आली. आता फक्त नातेवाईक आहेत म्हणून वरवरचे संबध आहेत. पण त्या नात्यातला विश्वास? तो तर कधीचाच हरवलाय.... हे झालं व्यक्तीगत पातळीवरचं उदाहरण.

आपल्या माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांचं उदाहरण घ्या. त्यांचे 'विश्वासू' अंगरक्षकच त्यांच्या शेवटाला कारणीभूत ठरले.

अमेरिकेतला गाजत असलेला 'सब-प्राईम' घोटाळा हे कशाचं उदाहरण आहे? अनेक वित्तीय संस्थांनी अनेक लोकांना कर्ज दिली. अगदी ती परत फेडण्याची ऐपत नसलेल्यांनाही.. हे कमी म्हणून की काय? हे कर्जदार कर्ज परत करतील असा ठाम विश्वास बाळगून ती कर्ज पुढे इतर वित्तीय संस्थांना विकली! शेवटी काय झालं? या कर्जदारांपैकी बहुतांश व्यक्ती कर्जफेड करू शकल्या नाहीत आणि आर्थिक मंदीचं दुष्टचक्र सुरु झालं त्याचा फटका आज लाखो लोकांना बसलाय आणि बसतोय.

म्हणून वाटतं; कुठल्याही गोष्टीची, नात्याची, व्यवहराची सुरुवात ही विश्वासावर आधरलेली असते. आपल्याकडे कितीही शिक्षण असलं, पैसा असला तरीही 'विश्वासार्हता' असणं हे सगळ्यात महत्त्वाचं. आपण एखादं नातं उत्तम निभावू शकतो हा विश्वास किंवा दिलेलं काम चांगल्या प्रकारे, प्रामाणिकपणे पूर्ण करू शकतो हा विश्वास आपल्या समोरच्या व्यक्तीमधे निर्माण करणं सगळ्यात महत्त्वाचं आणि तो टिकवणं, त्याला तडा जाऊ न देणं हे त्याहून महत्त्वाचं. कारण जर कुठल्याही गोष्टीतून विश्वास हरवला तर ती गोष्ट संपायला, ते नातं तुटायला वेळ तो किती लागेल? त्यामुळेच एक चांगली व्यक्ती
होण्यासाठी आपण 'विश्वासर्ह' आहोत हे सिद्ध करणं महत्त्वाचं नाही का?

रविवार, २० डिसेंबर, २००९

साक्षर

मध्यंतरी 'निशाणी डावा अंगठा' हा चित्रपट बघितला. सरकारने चालू करण्यास सांगितलेले 'प्रौढ साक्षरता' अभियान धाब्यावर बसवून; साक्षरांनाच 'नवसाक्षर' म्हणून परीक्षेस बसवून; हे अभियान यशस्वीरित्या पूर्ण केल्याचे दाखवून, एक गाव प्रथम पारितोषिक कसे पटकावते त्याची ही कथा. हा चित्रपट पाहून झाल्यावर मनात एक प्रश्न रुंजी घालू लागला: साक्षर कोणाला म्हणावे?

ज्याला सही करता येते तो साक्षर, ज्याला लिहिता-वाचता येते तो साक्षर, जो दहावी-बारावी झालाय तो साक्षर की ज्याच्याकडे बी.ए., बी. कॉम, एम.बी.ए अशी एखादी डिग्री (किंवा डिग्र्या ) आहेत तो साक्षर? लौकिक अर्थाने बघायला गेलं तर ज्याला लिहिता वाचता येतं तो साक्षर. पण मग मनात आलं या एकविसाव्या शतकात, स्पर्धेच्या युगात फक्त लिहिता वाचता येणं हा एकच निकष साक्षर/निरक्षर भेद करण्यास पुरेसा ठरेल का? या प्रश्नाचं उत्तर शोधताना मला जाणवलं आजच्या काळात साक्षरतेसाठी एवढा एकच निकष पुरेसा नाही. साक्षरता बहुआयामी आहे. तिला विविध अंग आहेत, बाजू आहेत.
लिहिता-वाचता येणं अथवा आपल्या आवडत्या किंवा चरितार्थाला उपयोगी पडेल अशा विषयात प्राविण्य मिळवणं, हे त्यातील एक. हे सोडून आणखी काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला आल्या नाहीत तर कितीही पदव्या/पदविका आपल्या नावापुढे असल्या तरी बाहेरच्या जगात आपण 'बावळट' ठरतो किंवा बाहेरच्या जगात वावरण्यास कुठेतरी कमी पडतो. थोडक्यात काय तर अगदी अडाणी/निरक्षर ठरतो!

माझ्या दॄष्टीने आर्थिक साक्षरता ही त्यातली एक. रोजच्या जीवनातले पैशांचे व्यवहार करता येणं: बँकेतली छोटी-मोठी कामं करणं (चेक किंवा कॅश भरणे अथवा काढणे ई.); ए.टी.एम्/क्रेडिट कार्ड यांसारख्या सुविधा सफाईदारपणे वापरता येणं; आपण मिळवलेल्या पैशाचं योग्य पद्धतीनं नियोजन करता येणं; त्यासाठी गुंतवणुकीचे कोणकोणते पर्याय उपलब्ध आहेत हे माहीत असणं किंवा ते माहीत करून घेण्याची क्षमता आणि इच्छा असणं, या सगळ्या गोष्टींचा मी आर्थिक साक्षरतेत समावेश करेन. या गोष्टी आज प्रत्येक व्यक्तीला येणं गरजेचं आहे. मग ती नोकरदार व्यक्ती असो, गॄहिणी असो किंवा एखादा विद्यार्थी असो. आज अशी अनेक माणसं आजूबाजूला दिसतात ज्यांना या गोष्टी करता येत नाहीत. ज्यांच्यावर या गोष्टी करण्याची कधी वेळच आलेली नाही किंवा घरातला कर्ता पुरुष या गोष्टींची काळजी घेतोय तर मी कशाला त्यात लक्षं घालू? अशी काहीशी त्यांची भूमिका आहे. पण शेवटी एक विचार सारखा मनात येतो कि या काही फार अवघड गोष्टी नाहीत आणि त्यांचा संबंध आपल्याशी कधीही येवू शकतो. तर मग त्यांची माहीती करून घेण्यात का टाळाटाळ?

आम्ही लहान असताना, म्हणजे साधारण सहावी-सातवीत, आमची आई आम्हाला एखादा चेक भरायला बँकेत पाठवत असे. स्लिप वगैरे ती भरून देत असे. नुसता चेक काऊंटर वर जाऊन भरायचा. एवढंच काय, आम्ही आई बरोबर बरेचदा ए.टी.एम मधेही जायचो. तेव्हा ते कार्ड मशिनमधे सरकवून पैसे काढण्याची मजा वाटत असे. कदाचित पुढल्या खेपेस आई तिचा पिन नंबर बदलतही असेल! पण अशा पद्धतीने आम्ही हळूहळू ही साधनं कधी वापरायला शिकलो आम्हाला कळलही नाही! आम्हा भावंडांच्या १८ व्या वाढदिवसाचं बक्षिस होतं आमच्या नावावर बँक अकांऊंट. केवढं अप्रूप वाटलं होतं तेव्हा. पैसे काही फार नसायचे त्यात पण तो आपण स्वतः ऑपरेट करायचा हेच खूप काही शिकवून जाणार होतं. मला आठवतंय माझ्यासाठी जेव्हा स्थळं बघत होते तेव्हा मर्चंट नेव्ही मधल्या एका मुलाचं स्थळ आलं होतं. त्या मुलाच्या आईनं आम्हाला सांगितलं होतं, तुमच्या मुलीचं शिक्षण वगैरे ठीक
आहे. पण आमचा मुलगा वर्षातील सहा महीने बोटीवर असतो. तो इथे नसताना तुमच्या मुलीला सर्व आर्थिक व्यवहार करता आले पाहीजेत! थोडक्यात सांगण्याचा मुद्दा काय तर आज औपचारिक शिक्षणाबरोबरच आर्थिक शिक्षणही तितकंच महत्त्वाचं आहे आणि आई-वडिलांनी मुलांवर विश्वास दाखवल्याशिवाय, त्यांना प्रोत्साहन दिल्याशिवाय ते मिळणं शक्यं नाही. अर्थात कुठल्याही व्यक्तीने या गोष्टींच महत्त्व ओळखणं आणि शिकण्याची इच्छा दाखवणं हे ही तितकंच महत्त्वाचं!

माझ्या दॄष्टीने दुसरी महत्त्वाची गोष्टं म्हणजे 'संगणक साक्षरता' किंवा 'computer literacy'. आजच्या युगात, या 'paperless office' च्या जमान्यात, संगणक तुमचा दोस्त नसेल तर तुमचं कठीण आहे! म्हणजे अगदी संगणकाच्या लँग्वेजेस किंवा ओरॅकल सारख्या गोष्टी म्हणत नाही मी पण कमीत कमी 'word', 'excel' ,'power point', 'internet' या गोष्टी तरी वापरता यायला हव्यात. ती आजच्या काळाची गरज आहे. या बाबतीत मात्र लहान मुलं आपल्या आई-वडिलांपेक्षा अधिक स्मार्ट असलेली बघायला मिळतात! ऑफिसमधेही मी बरेच वेळा अनुभव घेतलाय. अगदी मॅनेजर लेव्हलचा माणूस, पण excel मधला एखादा फॉर्म्युला किंवा power point वापरायची वेळ आली कि हैराण होतो. मग एखाद्या सेक्रेटरीने power point मधे एखादं प्रेझेंटेशन करून दिलं कि त्याला ती सेक्रेटरी काही क्षणांपुरती का होईना पण ग्रेट वाटून जाते!!

तर अशा तर्‍हेने औपचारिक शिक्षणा व्यतिरिक्त मला महत्त्वाच्या वाटणार्‍या या गोष्टी. मला माहीत आहे की साक्षरता हा काही एका पानात मांडून होणारा विषय नाही. पण तरीही मला याबद्दल विचार करताना प्रामुख्याने जाणवलेल्या गोष्टी तुमच्यासमोर मांडाव्याश्या वाटल्या. तुम्हाला काय वाटतं?

रविवार, २९ नोव्हेंबर, २००९

पणजी

'माई', माझी पणजी. म्हणजे बाबांची आजी, त्यांच्या वडिलांची आई.

लहानपणापासूनच माझ्या मनात तिची काही फार चांगली प्रतिमा नव्हती. शेवटच्या दिवसांत अंथरुणाला खिळलेली. माझे आई, बाबा, आजी, आत्त्या सगळ्यांना तिचं करावं लागे. सगळ्यांशी सतत तिचे वाद होत. मी तिची फारशी आवडती नव्हते. कारण तिला मुळात मुलीच विशेष आवडायच्या नाहीत. कदाचित 'स्त्री' म्हणून आयुष्यात तिने जे भोगलं त्याचा परिणाम असेल!

या सगळ्यामुळे माझ्या मनात 'पणजीला मी आवडत नाही' आणि 'तिच्यामुळे घरातल्या सगळ्यांना त्रास होतो' ह्याच दोन गोष्टी घर करून बसलेल्या! तिच्या पुर्वायुष्याबद्दल आई-आजीकडून बरंच काही ऐकलेलं. पण ते लक्षात घेऊन त्यावर विचार करून तिची बाजू समजून घेण्याचं माझं तेव्हा वय नव्हतं.

मी ९-१० वर्षांची असताना ती गेली, ८२-८३ वर्षांची होऊन. म्हणजे साधारण १९९२ साली. त्यानंतर इतक्या वर्षांनी परवा मला तिची प्रकर्षाने आठवण झाली. निमित्त होतं 'लोकसत्ता' मधील एक सदर! नवर्‍याने टकलेल्या किंवा त्याच्या मॄत्युपश्चात चरितार्थ चालविण्यासाठी घराबहेरपडून धडपड केलेल्या आणि हे करतानाच नावारूपाला आलेल्या काही स्त्रियांच्या आत्मचरित्राची ओळख करून देणारं हे सदर. दर शनिवारी 'चतुरंग' मधे न चुकता वाचते. पण एका शनिवारी मात्र ते वाचताना माझी पणजी डोळ्यासमोर उभी राहिली. वाटलं, आपण जे तिच्याबद्दल ऐकलंय ते फार काही वेगळं नाही! पण फरक इतकाच की ती प्रसिद्धीच्या झोतात आली नाही आणि लोकांच्या कौतुकाचा विषय ठरली नाही. उलट टीकेलाच सामोरी गेली............

१९१०-११ सालचा जन्म असवा तिचा. त्या काळी मुलगी होणं हीच मुळात आनंदाची बाब नव्हती. त्यातून ही दिसायला बेताची आणि काळी. म्हणजे दुष्काळात तेरावा महीना! हिचं लग्नं कस होणार ही घरच्यांना काळजी. म्हणून बिजवराशी लग्नं लावलं; म्हणजे माझ्या पणजोबांशी. दोघांमधे जवळ जवळ २० वर्षांचं अंतर. पण ते नाटककंपनीवाले आणि त्यातून विधुर आणि ही काळी आणि दिसायला बेताची. असा योग (?) जुळून आला आणि त्यांचं लग्नं झालं. १२-१३ वर्षांची असेल माझी पणजी तेव्हा. लग्नं आणि नवरा म्हणजे काय हे ही न कळण्याच्या वयाची. नवरा जवळ आला तरी भीती वाटत असे म्हणायची!!

तर असा तिचा संसार सुरु झाला. घरात खायला-प्यायला काही कमी नव्हतं. नाटककंपनीही छान चालू होती. पणजोबाही कष्टाळू होते. याच दरम्यान माझ्या आजोबांचा जन्म झाला आणि ते जेमतेम ८-१० वर्षांचे असताना माझे पणजोबा गेले......पणजी तेव्हा जेमतेम २४-२५ वर्षांची असेल. हल्ली ज्या वयात मुलींची लग्नं होतात, त्या भावी आयुष्याची स्वप्नं रंगवतात, त्या वयात ती विधवा झाली आणि पदरात एक लहान मूल!

चुलत्यांनी तिला नेसत्या वस्त्रानिशी बाहेर काढलं. हातावर एक छदामही न ठेवता.....काय अवस्था झाली असेल तिची तेव्हा? पण ती डगमगली नाही. माझ्या आजोबांना दूरच्या एका नातेवाईकाकडे ठेवून तिने नर्सिंगचा कोर्स पूर्ण केला आणि एका हॉस्पिटलमधे नोकरी मिळाली. चरितार्थाचा प्रश्न सुटला!

पण तिच्या आयुष्याचं काय झालं? तिला आयुष्यात तसं काहीच सुख मिळालं नाही, पण तिच्याकडे धडाडी होती. ती एकटी जवळ-जवळ अख्खा भारत फिरली. अगदी अमरनाथ यात्रा सुद्धा केली तिने. त्या काळी बेलबॉटमची फॅशन होती. तिने ती घालूनही एक फोटो काढून घेतला होता म्हणे! एकटी हॉटेलमधे सुद्धा जात असे ती.

आमच्या काही नातेवाईकांना, आजूबाजूच्या लोकांना तिचं हे वागणं असभ्य, बेलगाम वाटायचं. तिच्याबद्दल कोणी कधी फारसं चांगलं बोलल्याचं मला आठवत नाही. कदाचित`'विधवा' स्त्री ही सुद्धा एक माणूस आहे, तिलाही तिच्या भावभावना आहेत हे त्यांना मान्यच नसावं. किंवा मान्य असलं तरी फक्त 'विधवा' म्हणून तिने स्वतःला सर्व बंधनांत अडकवून घेऊन एक चाकोरीबद्धं आयुष्यं जगावं ही त्यांची मानसिकता असावी.

पण या सगळ्याचा आता तिच्या बाजूने विचार केला तर वाटत की तिचं नक्की काय चुकलं??

वयाच्या २४-२५व्या वर्षी नवरा गेला ही तिची चूक होती? नातेवाईकांनी आधार द्यायचा सोडून बेघर केलं ही तिची चूक होती? मग त्यांना तिच्यावर टीका करायचा काय अधिकार?

तिला तिच्या इच्छा, आकांक्षा, भावना काहीच नसतील का? त्या तिला पूर्ण कराव्याश्या वाटल्या तर काय बिघडलं? तिला फिरायला चल म्हणणारं कोण होतं? किंवा तिची आवड लक्षात घेऊन कोण काही आणून देणार होतं?

त्या काळी बायकांनी दुसरं लग्नं करणंही सोपं नव्हतं आणि केलं तरी आपल्या मुलाला तिथे स्विकारतील की नाही, नीट वागवतील की नाही ही दुसरी चिंता!

असं सगळं असतानाही ती खंबीरपणे उभी राहीली. रडत न बसता परिस्थितीतून मार्ग काढला. 'लोक काय म्हणतील?' हा विचार तिने कधीच केला नाही. कारण लोक एकवेळ मदतीला पुढे येणार नाहीत पण टीका करण्यात मात्र अजिबात मागे राहणार नाहीत हे तिला कधीच उमगलं असावं......

अशी माझी पणजी अतिशय स्वावलंबी होती. रिटायर्ड झाल्यानंतरही कोणी आजारी असेल तर इंजेक्शन वगैरे द्यायला ती जात असे. अगदी अंथरूणाला खिळेपर्यंत स्वतःची सगळी कामं स्वत: करत असे. आयुष्यात एवढे वाईट दिवस बघूनही तिच्याकडे सकारात्मक दॄष्टीकोन होता. माझ्या भावाला खेळवताना म्हणे ती म्हणायची, माझा मुलगा मॅट्रिक झाला, नातू इंजिनिअर झाला, पणतू आणखी शिकेल.....खूप मोठा होइल.......

आता या सगळ्याचा विचार केला॑ की तिचं खूप कौतुक वाटतं आणि तिच्या खंबीरपणाला, धडाडीला दाद द्यावीशी वाटते.

रडत न बसता आणि कोणाच्या मदतीची अपेक्षा न करता तिने परिस्थितीशी सामना केला. आपलं आयुष्यं मार्गी लावलं. कुठून आलं असेल हे बळ तिच्यात? खरंच आश्चर्यं वाटतं. आणि मनोमन कबूल केलं जातं की भले तिने काही समाजकार्य केलेलं नसूदे, प्रसिद्धीच्या झोतात आलेली नसूदे परंतु तिला प्रतिकूल अशा या समाजात, खंबीरपणे उभं राहून तिने तिच्या आयुष्याचा प्रश्नं सोडवला होता. हे ही काही कमी नव्हतं!!

रविवार, २२ नोव्हेंबर, २००९

John, Dog, Dog............?

"John, Dog, Dog.....", फोनवर बोलता बोलता मी जरा वरच्याच पट्टीत म्हणाले. माझ्या केबिनचं दार उघडंच असल्याने, बाहेरच्या क्युबिकलमधे बसलेल्या माझ्या कलीगला माझा आवाज अगदी सहज ऐकू गेला. मी फोन ठेवण्याचीच जणू काही ती वाट बघत होती. ती पोट धरून खो-खो हसू लागली। मला कळेना, आत्तापर्यंत ही बरी होती, हिला अचानक झालं तरी काय? मी तिला खुणेनेच विचारलं, "काय झालं? एवढी फिदी, फिदी का हसते आहेस?"
हसणं थांबवून माझ्याजवळ येत ती म्हणाली, "कोण आहे हा जॉन? त्याला शिव्या का देत होतीस?" खरं तर तिला माहीत होतं मी कोणाला फोन केला होता आणि माझं काय काम होतं। पण माझ्याही लक्षात आलं की आपण काहीतरी मूर्खासारखं बोललेलं आहोत आणि या बाईसाहेब आपली फिरकी घेतल्याशिवाय रहाणार नाहीत.
खरंतर थोडेच दिवसात मी annual leave वर जाणार होते आणि बहारीन-मुंबई फ्लाईट बुकिंगच्या संदर्भात ट्रॅव्हल एजंटला मी फोन लावला होता। माझ्या तिकिटाची व्हॅलिडिटी मला वाढवून घ्यायची होती। 'JDDARY' असा काहीसा माझा PNR नंबर होता आणि ३-४ वेळा सांगूनही, बुकिंग करणार्‍या मुलीला तो काही ऐकू जात नव्हता. JDD च्या पुढे आमची गाडी सरकतच नव्हती. डी च्या ऐवजी सारखं तिला बी ऐकू जात होतं. शेवटी मी अक्षर कळावं म्हणून शब्दांचा आधार घेतला आणि "John, Dog, Dog......" असं जरा वरच्या पट्टीत बोलले. माझं काम एकदाचं झालं. पण त्यातून एवढं हसण्यासारखं काय घडलं मला काही सुधरेना.
माझ्या कलीगने मग खुलासा केला की जॉन हे त्या ट्रॅव्हल एजन्सीच्या मॅनेजरचं नाव होतं। मी कपाळावर हात मारून घेतला. आता मला काय स्वप्नं पडलं होतं हे माहीत असायला?? माझी कलीग आमच्या CFO ची PA असल्यामुळे आणि तो बरेचदा विमान प्रवास करत असल्याने तिला वरचेवर तिकिट बुकिंग करावं लागतं. त्यामुळे तिला या ट्रॅव्हल एजन्सी मधले लोक चांगलेच माहीत होते. त्यामुळे माझे शब्द ऐकून तिला हसू आवरेना.मग ती मला म्हणाली, "अगं, प्रत्येक गोष्टीचे काही संकेत असतात. तसे तिकिट बुक करतानाही असतात." मी म्हटलं, "तिकिट बुक करताना कसले आलेत संकेत? तिला अक्षरं कळत नव्हती, ती कळावीत म्हणून मी शब्दं वापरले! आता ह्यात काय चुकलं?" ती मला म्हणाली, "अगं, ही अक्षरं ने कळणं हे अगदी कॉमन आहे आणि त्यासाठी शब्दं वापरणं हे सुद्धा. म्हणूनच यासाठी कुठले शब्द वापरावेत याचे काही संकेत आहेत." असं म्हणून तिच्याकडे असलेली एक लिस्ट तिने मला दिली. आणि म्हणाली, "ही लिस्ट तुझ्याकडे ठेव आणि इथून पुढे कधी तुला बुकींग करायची वेळ आली तर ती वापर." बरं म्हणून ती मी माझ्याकडे ठेवली.
माझ्या मनात आलं खरंच, प्रत्येक वेळी कसं बोलावं, काय बोलावं, काय बोलू नये या सगळ्या गोष्टींचे काही नियम असतात. आणि ते जर आपल्याला माहीत नसतील तर माझ्या बाबतीत घडला तसे प्रसंग घडू शकतात. माझ्यासारखी बाकी कोणाची फजिती होऊ नये म्हणून ती लिस्ट तुम्हा सर्वांसाठी इथे देत आहे. बघा कधी उपयोगी पडली तर...................

A-Alpha B-Bravo C-Chairs D-Delta E-Echo F-Fox G-Gulf H-Hotel I-India J-Juliet K-King L-Lima M-Mother N-November O-Oscar P-Papa Q-Queen R-Rameo S-Sugar T-Tango U-Uniform V-Victory W-Wisky X-X-Ray Y-Young Z-Zoo

गुरुवार, १९ नोव्हेंबर, २००९

कहानी गुडिया की........

गुडिया..... एका सामान्य मुस्लिम कुटुंबातील सामान्य मुलगी. अगदी चारचौघींसारखी.....२०-२२ वर्षांची. भावी आयुष्याची स्वप्नं रंगविणारी.........तिचं लग्नं होतं सैन्यातील एका जवानाशी. मोठा दीर, जाऊ, सासू असं तिचं छान, सुखी कुटुंब असतं. लग्नानंतर जेमतेम १५-२० दिवसांत तिच्या नवर्‍याला सीमेवर रुजू होण्यासाठी बोलावलं जातं, युद्धाला तोंड फुटलेलं असतं.....तिचा निरोप घेऊन आणि लवकर परतण्याचं वचन देऊन नवरा जातो आणि........... आणि गुडियाचं आयुष्यं एक वेगळीच कलाटणी घेतं...... युद्धाच्या बातम्या रोज येत असतात. नवर्‍याची हाल हवाल तिला कळत असते. पण एक दिवस..........एक दिवस त्याची खबर येणं बंद होतं. त्याचा पत्ता काय... जिवंत आहे की मेला...काही कळेनासं होतं...आणि एक दिवस तो बेपत्ता असल्याचं सैन्यातून कळतं. गुडियाचं चित्तं थार्‍यावर रहात नाही.. पण गुडियाला आशा असते की तिचा नवरा आज ना उद्या नक्की सापडेल......पोलिस, सैन्यातील वेगवेगळे अधिकारी यांच्या ऑफिसचे खेटे घालणं सतत चालू असतं. पण कुठूनच तिच्या नवर्‍याचा काहीच पत्ता लागत नाही. असं करता करता ४ वर्ष जातात........तिचे आई-वडील आणि इतर नातेवाईक तिला दुसर्‍या लग्नासाठी सुचवू लगतात. पण तिचं मन तयार नसतं. पण शेवटी सगळ्यांचं ऐकून ती दुसर्‍या लग्नाला तयार होते. दुसरा संसार थाटते. त्यात रमते. घरातल्या सगळ्यांना आपलसं करते. थोडेच दिवसात ती आई होणार असल्याची चाहूल तिला लागते....पण नियतीला तिचं सुख मान्यं नसतं..... आत्ता कुठे खरर्‍या अर्थाने तिच्या आयुष्याची सुरुवात होत असते आणि तेव्हाच बातमी येते की तिचा आधीचा नवरा जिवंत आहे. त्याला युद्धकैदी म्हणून पकडलेलं असतं आणि ४ वर्षांनंतर पाकिस्तान सरकार त्याची सुटका करणार असतं......गुडीयाची मोठी विचित्र अवस्था होते. हसावं की रडावं तिला कळेनासं होतं. तिलाच काय तिच्या सासरच्या आणि माहेरच्या सगळ्यांपुढेच मोठं प्रश्नचिन्हं उभं राहतं. आता पुढे काय? आणि एक दिवस तिचा नवरा घरी परत येतो. गुडीयाच्या नावाने हाका मारून घरभर शोधू लागतो.. तो बेपत्ता झाल्याच्या धक्क्याने त्याच्या वॄद्ध आईचा मृत्यु झाला आणि बरेच दिवस त्याची वाट बघून गुडियाने दुसरं लग्नं केलं हे ऐकून त्याला धक्का बसतो. काहीही झालं तरी गुडियाला परत घेऊन येण्याचा तो चंग बांधतो. त्याचा भाऊ, वहिनी त्याला खूप समजावतात. तिचा सुखी संसार उद्ध्वस्त न करण्याची विनंती करतात. पण कशाचा काहीही परिणाम होत नाही.गावातले मुल्ला मौलवी यांची एक समिती नेमली जाते. कुठलाही निर्णय होई पर्यंत गुडियाला तिच्या आई-वडिलांकडे परत पाठवले जाते. आणि शेवटी तिने आपल्या पहिल्या नवर्‍याकडे परत जावे असा निर्णय दिला जातो. तेच धर्माला धरून असल्याचं सांगितलं जातं. गुडियाच्या मताला काडीइतकीही किंमत नसते. किंबहुना तिला ते कोणी विचारतच नाही. आणि शेवटी तिला हा निर्णय मान्य करावा लागतो. आपल्या मुलाला घेऊन ती आपल्या पहिल्या नवर्‍याकडे परत जाते. पण कशातच लक्षं लागत नसतं.या सगळ्याचा तिच्यावर मानसिक आणि शारिरीकही विपरीत परिणाम होतो. आणि एक दिवस आपल्या लहान मुलाला मागे ठेऊन ती य जगाचा निरोप घेते..... त्या मुलाला सांभाळण्याचा मोठेपणाही तिचा पहिला नवरा दाखवत नाही. आणि त्याच्या पालन-पोषणाची जबाबदारी गुडियाच्या म्हातार्‍या आई-वडिलांवर येते.यथावकाश तिचे दोन्ही नवरे दुसरी लग्नं करतात आणि आपापले संसार परत थाटतात.................गुडिया मात्रं धड कुठलंच सुख न उपभोगता समाजातल्या पुरुषी वर्चस्वाला आणि विचित्र रुढींना बळी पडते.............ही गोष्ट आहे 'कहानी गुडिया की......' या हिंदी चित्रपटाची. स्त्रीला एक माणूस म्हणून वागवण्याची, तिचं मन जाणून घेण्याची अजूनही या समाजातील काही जणांना गरज वाटत नाही हे हा चित्रपट बघून प्रकर्षाने जाणवतं.हा काही फार बिग बजेट चित्रपट वगैरे नाही किंवा फार मोठया कलाकारांना वगैरे घेऊन केलेलाही नाही. पण एका सत्यघटनेवर आधारित आहे. कुठे मिळाला तर जरूर बघा. फक्त गुडियाची गोष्ट जाणून घेण्यासाठी....................