गुरुवार, १८ जून, २००९

थांबावे कुठे???

टी-२० मधे भारताला इंग्लंडने हरवलं!! गेल्यावर्षीचा विश्वविजेता संघ उपांत्य फेरीपर्यंत देखील पोचला नाही! विविध माणसांच्या तर्‍हेतर्‍हेच्या प्रतिकिया कानावर पडू लागल्या आणि पुन्हा एकदा भारतीयांच्या क्रिकेटप्रेमाचे विचार माझ्या डोक्यात फेर धरू लागले।

आपली लोकं क्रिकेटसाठी एवढी वेडी आहेत हे बघून मला कधी कधी खूप आश्चर्य वाटतं। आपल्याकडे लोक क्रिकेटची मॅच अगदी तन-मन-धन अर्पून बघत असतात। तेंडुलकर, धोनी, युवराज यांची फलंदाजी तर लोकांच्या अधिकच जिव्हाळ्याची! हे खेळाडु नीट खेळले नाहीत तर लोक अगदी बेचैन होतात. आपण हरतोय असं वाटायला लागलं की देवाला नवस बोलणारीही कितीजणं असतात. काहीजणं मॅच संपेपर्यन्त देवाचं नाव घेत बसतात तर काहीजणं इतर काही अंधश्रद्धांचा आधार घेतात.

परवा एक माणूस रेडिओवर प्रतिक्रिया देत होता--आपण मॅच हरलो हे पाहून मला २ रात्री झोपच लागली नाही! मी मनात म्हटलं, की ही बोच जो संघ हरतो त्याला असायला हवी, हो कि नाही?? आपल्या देशात लोक क्रिकेटपटूंवर अतोनात प्रेम करतात। अगदी आपल्या सरकारने त्यातल्या दोघांना पद्मश्रीही बहाल केली होती, पण हा सन्मान स्वीकरायलाही त्यांना वेळ नव्हता!! असं असताना भारतीय लोक त्यांच्यासाठी एवढा जीव का टाकतात? विचार करण्यासारखी गोष्ट आहे.

एखादा खेळ किंवा खेळाडू आवडणं किंवा त्याचा फॅन असणं समजण्यासारखं आहे। पण ह्या आवडीचं रुपांतर वेडात झालेलं कितपत चांगलं?? या वेडात किती वहावत जावं याला काही सीमा?? आपल्याकडे क्रिकेट तर इतर काही देशांमधे फुटबॉल, हे खेळ, लोक जीवन-मरणाचा प्रश्न असल्यासारखे का बघत असतात? आपण मॅच हरलो की लोक एखाद्या खेळाडूचं घर जाळणे, त्याची मालमत्ता उद्ध्वस्त करणे असेही अनेक प्रकार करतात. वर्ल्डकप झाले की पेपरमधून बातम्या यायला सुरुवात होते-अमुक अमुक देशाचा पराभव पचवणे कठीण गेल्याने अमुक एका माणसाने आत्महत्त्या केली. मॅच कोण जिंकणार यावरून दोन मित्रांमधे वादावादी होऊन एकाने दुसर्‍याला सुर्‍याने भोसकले. या आणि अशा अनेक बातम्या आपण वाचतो.

हे सगळं बघून एकच विचार मनात येतो-आपलं आयुष्यं एवढं स्वस्तं आहे का कि एखादी मॅच हरलो म्हणून आपण त्याचा त्याग करावा? आपल्या आयुष्यात दुसरं काहीच लक्ष्यं नाही का कि फक्त एखद्या खेळामधली हार-जीत यावर आपल्या आयुष्याचा शेवट अवलंबून असावा?

आवड म्हणून विविध खेळ बघावेत, त्यांचा आनंद घ्यावा. त्यातल्या एखाद्या खेळात आपणही प्राविण्य मिळवावे. एखादा खेळाडू आपला 'रोल मॉडेल' सुद्धा असावा. त्यात काहीच गैर नाही. पण त्याला किती महत्त्व द्यावं, मानसिक रित्या त्यात किती गुंतावं हे ही आपलं आपण ठरवावं. थोडक्यात काय तर ' थांबावं कुठे?' याचा प्रत्येकाने आपल्या मनाशी विचार करावा!!!!

२ टिप्पण्या:

  1. लेख छान आहे, पण प्रश्नांना उत्तर सापडणं कठीण आहे. अंधश्रध्दाळु मी पण आहे. मॅच चालु असताना उगाच जास्ती जागचा हलत नाही, नेमकं आऊट झाला तर? किंवा एखादी मॅच जिंकलो तेंव्हा सोफ्यावर बसलो असेन तर दुसऱ्या मॅचलाही सोफाच लागतो. उगाच खुर्ची अनलकी ठरली तर?

    असो.. दर वेळेस मॅच बघायची, दर वेळेस आपली टिंम कित्ती फालतु आहे म्हणत दुसऱ्या टिम चा हेवा करायचा आणि परत नविन मॅचला नविन उमेद बाळगुन टिव्ही समोर ठाण मांडुन बसायचे.. चालायचेच...

    ये इंडिया का क्रिकेट है..!

    उत्तर द्याहटवा
  2. आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. माझं म्हणणं एवढंच की कुठल्याही गोष्टीत मानसिक गुंतवणूक किती करायची याला मर्यादा असावी. मग ती क्रिकेत मॅच असो किंवा एखादी सिरिअल!!

    उत्तर द्याहटवा