रविवार, २८ जून, २००९

'काळे स्पॉट्स'

२००८ मधे सुट्टीसाठी आम्ही माझ्या दीराकडे अमेरिकेला गेलो होतो। महिनाभरचा मुक्काम होता. एका वीकेंडला आम्ही न्यूयॉर्कला जाण्याचा बेत ठरवला. न्यूयॉर्कला गाडया एके ठिकाणी पार्क करून मनसोक्त हिंडायच ठरवलं. घरातून निघायच्या आधीच इंटरनेटवरून गाडी कुठे पार्क करायची वगैरे सर्व माहिती काढून ठेवली आणि ठरलेल्या दिवशी निघालो. न्यूयॉर्कला पोचलो आणि ठरलेल्या ठिकाणी गाड्या पार्क केल्या। दिवसभर हिंड हिंड हिंडलो. आणि परतीच्या वाटेला लागलो.

मी, माझी जाऊ आणि माझ्या सासूबाई एका गाडीत आणि आमचे better halves दुसर्‍या गाडीत असे बसलो होतो। गाडी पार्किंगमधून बाहेर काढताना माझी जाऊ आम्हाला म्हणाली, "हे बघा आपल्या गाडीवर काय आहे!" आम्ही दोघीही वाकून वाकून काय आहे ते बघायचा प्रयत्न करू लागलो. '२ काळे स्पॉट्स' आम्हाला गाडीच्या पुढच्या भागावर दिसले. काय असावं बरं हे? आम्ही विचार करू लागलो. घरातून निघालो तेव्हा गाडीवर असं काही पाहिल्याचं आम्हाला तिघिंनाही आठवत नव्हतं. तेव्हा आमची खात्री झाली कि गाडी जिथे पार्क करायला ठेवली होती तिथल्या लोकांचच हे काम असलं पाहिजे! आपल्याला ट्रॅक वगैरे तर करत नसतील? मनात नाही नाही त्या शंका येऊन गेल्या. बरं हया तिघांची गाडी आमच्या पुढे होती, त्यामुळे त्यांनाही विचारणं शक्य नव्हतं. शेवटी ठरवलं की जेवण्यासाठी गाडी थांबवली कि विचारायचं.

१-१:३० तासाने वाटेत आम्ही जेवण्यासाठी गाड्या थांबवल्या. पहिलं काय केलं तर आमच्या नवरोजींना हाका मारून आमच्या गाडीजवळ बोलावलं आणि ते 'काळे स्पॉट्स' दाखवले. "हे बघा ना आपल्या गाडीवर काय आहे?" आम्ही म्हटलं. "बघू काय आहे?" असं म्हणून तिघांनी गाडीकडे बघितलं आणि जे हसत सुटले, कि काही विचारू नका!! आम्हाला काहीच कळेना कि असे का हसत आहेत? आम्ही ते 'काळे स्पॉट्स' काय असतील याचा विचार करून करून थकलो होतो आणि हे तिघं आमच्याकडे बघून हसत होते. शेवटी न रहावून विचारलं, "आता हसणं थांबवा आणि सांगा एकदा हे काय आहे ते?" ज्या अर्थी हे हसत आहेत त्या अर्थी काहि विशेष नाही आणि आपली अक्कल निघणार आता हे कळून चुकलं होतं! शेवटी त्यांनी सस्पेन्स संपवला आणि म्हणाले, "गाडी पहिल्यांदा पाहिल्यासारख्या काय वागताय? वायपर वापरलाय का गाडीचा कधी? त्याच्यासाठी पाणी कुठून येतं? ते पाणी ह्या 'काळ्या स्पॉट्स' मधून येतं!!" हे ऐकून डोक्यात लख्खं प्रकाश पडला आणि आम्ही प्रदर्शित केलेल्या अज्ञानाचं हसू आलं. आणि त्याहीपेक्षा जास्त पश्चात्ताप झाला तो ते नवर्‍यासमोर केलं याचा! कारण त्यानंतर बायका आणि ड्रायव्हिंग यावरून किती चिडवा-चिडवी झाली हे वेगळं सांगायची गरज नाही!!!

४ टिप्पण्या:

  1. हेहे....मजा आली गं. या चिडवा-चिडवीतही गंमत असते नाही?

    उत्तर द्याहटवा
  2. खरंच. पण आपल्याला एवढी साधी गोष्ट लक्षात येवू नये याचं मला इतकं हसू आलं नंतर!

    उत्तर द्याहटवा
  3. जरा संशयास्पद गोष्टींविषयी मन काय काय तर्क काढेल, हे सांगणं कठिण आहे..आणि कुणाला सांगितल तर, ”तुम्ही मुली काय म्हणुन विचार कराल सांगता येत नाही ” हे तर ठरलेलच!
    मजेशीर आणि ओळ्खीचा प्रसंग आहे.

    उत्तर द्याहटवा